कविता

*पावसा*

पावसा,
काल परवा कोसळलास मुंबईवर
तसा एकावेळी देशावर
किंवा जगावर कोसळशील धुवांधार ?


सर्व रस्ते-नाले
तुडुंब भरून
घराघरांत शिरले पाणी
तरच आम्ही माणूस होऊ.
लिंग जात धर्म पंथाचे
नकली मुखवटे बाजूला सारून
तेव्हा बातम्या झळकतील
*"धुव्वाधार पावसाने भारतीयांना झोडपले."*
किंवा
आम्ही कोणत्याही वर्ग-वर्णाचा
विचार न करता धवून जाऊ, एकमेकांच्या मदतीला.


*पावसा*

पावसा,
काल परवा कोसळलास मुंबईवर
तसा एकावेळी देशावर
किंवा जगावर कोसळशील धुवांधार ?

सर्व रस्ते-नाले
तुडुंब भरून
घराघरांत शिरले पाणी
तरच आम्ही माणूस होऊ.
लिंग जात धर्म पंथाचे
नकली मुखवटे बाजूला सारून
तेव्हा बातम्या झळकतील
*"धुव्वाधार पावसाने भारतीयांना झोडपले."*
किंवा
आम्ही कोणत्याही वर्ग-वर्णाचा
विचार न करता धवून जाऊ, एकमेकांच्या मदतीला.


    बळीराजाचे पसायदान

.      *आलाच हैस तर*
वाट बघून बघून
डोळं शिणलं
तरी बरं उशेरानं का हुईना आलास
आलाच हैस तर
दोन दिस ऱ्हावून जा बाबा
कळकळीची इनंती
इतकी वढ लावणं
तुला शोभतं आणि जमतं तरी कसं
डोळ्यांतलं पाणी आटंस्तोर
माझं घर भरून वाहुंदेत !
चार पैसं गाठीला पडुंदेत!
असं बिल्कुल म्हणणार नाही
हाय त्या धाब्याच्या सावलीत
समाधान हाय
आमाला नगं शिल्यापची माडी
फक्त जिवांत जीव असस्तोर
कच्च्या बच्चांच्या
हातातोंडाची गाठ पडूंदे
पोटभर नसंना का
जीव जगवायपुरता पाचोळा
गुराढोरांला मिळूंदे
आणि चिमण्या-पाखरास्नी
वरीसभर घोटघोटभर का असंना
तहाण भागवायला एखांदा ढू साठूंदे
इतकंच.
.           *रमेश कुरलीकर*
कालचा रविवार
वेळ सकाळी सातची
पोहाळे येथील स्टँडवर
एक गृहस्थ आले
त्यांच्या सोबत आणलेल्या
दुचाकीवरील पंक्चर काढण्यासाठी सर्व साहित्य
खाली उतरले
ATM समोर लावलेल्या एका दुचाकीचे मागील चाकाचे पंक्चर काढले
आपले साहित्य जमा करून जाऊ लागले इतक्यात पंक्चर झालेल्या गाडीचे मालक जोतिबा देवाचे दर्शन घेऊन खाली आले
आपल्या गाडीचे पंक्चर काढलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला.
त्यांनी पटकन पँटच्या खिशात हात घातला व पन्नासच्या दोन नोटा काढून नम्रपणे पंक्चर काढणाऱ्या सद्गृहस्थाना देऊ केल्या.
ते सद्गृहस्थ त्यांच्याकडे पाहातच राहिले.
त्यांनी पैसे घ्यायला नकार दिला.
गाडी मालक ओशाळून म्हणाले, "घ्या की राव, कमी वाटतात काय? पण माझ्याकडे आता एवढेच आहेत."
ते सद्गृहस्थ म्हणाले,"माऊली आज रविवार. जोतिबा यात्रेकरुंसाठी मोफत पंक्चर सेवा."
इतके मोजके बोलून नमस्कार करून त्यांनी मागे न पाहता गाडीला किक मारली.
त्या गाडी पंक्चर झालेल्या यात्रेकरूंचे डोळे भरून आले.
"असं कुठं असतं का! काम करायचं, अडचणीत मदत करायची आणि मोबदलाही घ्यायचा नाही."
पण त्यांचे हे उद्गार ऎकायला हजर होते कोण?
आम्ही सकाळी फिरायला जाणारे दोन चार लोक.
अधिक चौकशी करता समजले की,
भुयेवाडी ता.करवीर येथे राहणारे *कृष्णात नारायण पाटील* हेच ते सद्गृहस्थ.
गेली अनेक वर्षे केवळ फोन करून गाडीचा नंबर व ठिकाण सांगितले की,  परिसरातील १५/२० किमी परिघ अंतरावर जागेवर जाऊन किमान मोबदल्यात पंक्चर काढून देतात.
अगदी दोन चार प्रकारच्या ट्यूब्ज ही सोबत घेऊन येतात.
आणि रविवारी यात्रेकरूंना तर ही सेवा पूर्णपणे मोफत.
💐💐💐💐🙏🏼💐💐💐💐
तेव्हा जोतिबा परिसरात असा प्रसंग गुदरला तर गडबडून जाऊ नका. *9765654369*  या नंबरला फक्त काॅल करा. आणि भेटा या देवमाणसाला.
💐💐💐💐💐💐💐💐
माणसांतील या देवत्वाला लाख सलाम🙏🏼... ... ...




एका बंधूंनी एका प्रवचणकाराला प्रश्न विचारणाऱ्या मुलीचा व्हिडिओ पाठवला होता.
प्रतिक्रिया  द्या असे म्हणाले होते.
तरीही बाब धार्मिक असल्याने
विचारपूर्वक लिहिले पाहिजे.
चार दिवस वाट पाहिली.
कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.
याचा *एक* अर्थ
क्लिप पाहिली नसावी.
*दुसरा* अर्थ
पाहिली, प्रवचणकाराचे विचार पटले. म्हणून बोलणे/लिहिणे आवश्यक वाटले नाही.
*तिसरा* अर्थ
पाहिली, प्रवचणकाराचे विचार पटले नाही पण  त्या मुलीचे विचार योग्य होते हे बोलण्याचे धाडस झाले नाही.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
माझे विचार... ... ...
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
१)त्या मुलीने चांगले (विचारांती) प्रश्न विचारले होते.
२)प्रवचणकारांनी मात्र त्या विचारांचे योग्य समाधानकारक उत्तर दिले नाही.
३)प्रवचणकारांची भावमुद्रा अतिशय गंभीर तर होतीच पण जितक्या सहजतेने त्या मुलीशी बोलायला हवे होते ते त्यास जमले नाही.
*४)देवाला वस्तू अर्पण केली असता ती पवित्र होते. या त्याच्या उत्तरातच समजते की अर्थातच अर्पण करण्यापूर्वी ती वस्तू अपवित्र होती.*
५)दूध, तेल, तूप याची नासाडी तर होतेच. पण कष्टाने मिळविलेल्या एका पैशाचाही विनियोग कष्टकरी विचारपूर्वक करतो.
६) प्रवचणकाराच्या बोलण्याचा आणखी एक अर्थ असा होतो की ज्यांच्याकडे अपवित्र धन-संपत्ती आहे त्यांनी ती तथाकथित देवांना अर्पण करावी म्हणजे *ती पवित्र* होते.
७) कोणत्या देव व सत्पुरुषाने भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तूचा भोग स्वता घेतला आहे ?
८)देवधर्माच्या नावाखाली भावनिक दडपणाखाली लुटण्याचेच काम चालेले असते.
९)म्हणूनच *पापी आत्मा भित्रा असतो* हे विवेकानंदांचे वचन पटते.
१०) देवा,देवऋषांना धन अर्पण करणारे ठगांचे वैभव पाहून कष्टकऱ्यांना वाटते, देवाला हे लोक काही अर्पण करतात म्हणून समृद्ध आहेत. तो त्यांची भाबडेपणाने नक्कल करतो. आणि लुबाडला जातो.
११) देव असलाच तर तो
*दगड,माती,लाकूड अशा निर्जीव वस्तूचे ठिकाणी नाही.* तो सजीवांच्या ठायी असावा.
म्हणून *जनसेवा हीच ईश्वर सेवा* हे वचन योग्य वाटते.
आणि सर्वांत. महत्वाचे भक्तीत एजंट कशाला.
१२) त्या मुलीने आपली बाजू मांडताना म्हटले  *"वस्तू अर्पण करायला, देव भिकारी आहे का?"* तिचे विचार अत्युत्तम होते. ते दबाव तंत्राने खोडण्यात आले.
असो,
चिकित्सा करावी !
कार्यकारणभाव शोधावा !!
अंधभक्ती व अंधविश्वास घातकच असतात!!!
अाणि त्यास बळी पडलेल्यांना फार उशिरा हे समजते.
*धन्यवाद*
@1@
*भ्रमनिरास*

गोऱ्यांनी काळ्यांना
काळ्यांनी काळ्यांना,
काळे म्हटले
किंवा काळ्यांनी गोऱ्यांना
गोऱ्यांनीच गोऱ्यांना
गोरे म्हटले किंवा नाही म्हटले
तरीही
राग येतो, चिडचिड होते.
कधी कधी
बोलणाऱ्यांनी न बोलणाऱ्यांना
किंवा न बोलणाऱ्यांनी
बोलणाऱ्यांना
अथवा न बोलणाऱ्यांनी
न बोलणाऱ्यांना आणि
बोलणाऱ्यांनी बोलणाऱ्यांना
बोलले अथवा न बोलले
तरी राग येतो.
राग येणाऱ्यांनी अथवा न येणाऱ्यांनी राग येणाऱ्यांना अगर
राग येणाऱ्यांनी अथवा न येणाऱ्यांनी राग न येणाऱ्यांना
रागावले अथवा न रागावले
तरी रूसवा धरला जातो
हे चमत्कारीक नाही काय?
की चमत्कारीक आहे ?
असेल नसेल
ते नाही महत्वाचं
किंवा आहेही
अशावेळी माझी भूमिका काय असते ?
तटस्थ राहून वा न राहून   !
केव्हा कळणार मला
ज्या कालात ज्यांची
असते गरज समाजाला
तेव्हा
ते संत, सत्पुरुष, राज्यकर्ते,
हुकुमशाह, शास्त्रज्ञ, कवी, लेखक,
कलाकार म्हणून
जन्मले होते/
जन्मत आहेत/
जन्माला येतीलही !
निर्मिकाने ही पृथ्वी
आंदण म्हणून
आपल्यालाच ताम्रपटावर
लिहून दिली असल्याचा
माझा भ्रम
कसा? कधी? कुठे? कितपत?
नाहीसा होणार
की नाही ?
.**** *रमेश कुरलीकर* *****

@2@
.     *गुरू पौर्णिमा*
ज्यांनी मला घडवलं,
घडवताना बडवलं
कधी कधी रडवलं
गुणरत्नांनी जडवलं
जगायला शिकवलं
लढायलाही शिकवलं
पाठीशी उभे राहून
सन्मार्गी वळवलं
यशाच्या शिखरापर्यंत
सोबत देत पळवलं
न्यून सारं दाखवलं
ज्ञानामृत चाखवलं
तो तात तोच माता
तो भगिनी तो भ्राता
तो दाता तोच त्राता
चरणी त्यांच्या नम्र माथा
.            *रमेश कुरलीकर*
@3@
मणी मोडला मानंचा

मणी मोडला मानंचा
आभाळाकडं पाहून
वाती विझल्या डोळ्यांच्या
आसू वाहून वाहून
वाटलंतं अौंदातरी
वेळेवर बरसेल
घात साधून पेरणी
पीक जोमात पोसेल
नक्षत्रांच्या सावलीनं
तरवा कोमेजून गेला
वाट बघून कितीदा
गुठ्ठा सपनात केला
एवढासा तरी येरे
थोडी विहीर भरूदे
हात पाय न मोडता
त्याला सुखानं मरूदे
फास टाकाया पुरती
फांदी झाडाची पोसूदे
भार त्याचा सारा त्याला
एकट्यालाच सोसूदे
आता निर्वाणीचा एक
प्रश्न आहे तुझ्यासाठी
'शेतकऱ्याचा मागावा
जन्म कोणी कशासाठी ?'
*रमेश कुरलीकर*
पन्हाळा, कोल्हापूर.
                               @4@
*आजीच्या गोष्टी*

आजी आमची रोज सांगतो
गोष्ट मजेची नवी नवी
दह्यामध्ये घालून पाणी
घुसळत बसते रवी रवी
गोष्टीत एका असतो हत्ती
माणसासारखा बोलणारा
आणि घोडा ठगडगठगडग
वाऱ्यासारखा पळणारा
मोर देखणा मऊ पिसांचा
थुईथुई थुईथुई नाचणारा
अवखळ कुत्रा मोती कधीतरी
आमच्यावरतीही भुंकणारा
गोष्टीत एक परी असते
जादूची छडी देणारी
दृष्ट भलतीच एक चेटकीण
खदाखदा हसणारी
चांदोमामा ढगाआडून
लपाछपी खेळणारा
आणि राक्षस काळाकुट्ट
चिल्यापिल्यांना छळणारा
हसू येते, भीती वाटते
सारे घाबरून जातात
गोष्ट सांग रोज नवी
तरी अाजीला म्हणतात
*अनुतनय*
@5@
मीही तुझ्याच गावाचा

मीही तुझ्याच गावाचा
नको खेद करू राजा
बहिणाईस साष्टांग
आहे दंडवत माझा
कवी जन्माचा लागतो
मातीतून घातीतून
लख्ख प्रकाश तेव्हाच
देतो अनुभूतीतून
बाकी अळंबी हंगामी
असे नका म्हणू कोणी
ज्याची-त्याची वेळ आहे
मोती अळवावरलं पाणी
ममत्वाने समजावा
बोल गोड अंतरात
वर धपाटा घडाया
आत आधाराला हात
नाही कुणीच जन्मला
सारे शिकून पोटात
थोडे हसू आणि अासू
मन भरल्या ओठात
.              रमेश कुरलीकर
@6@
*जगाचा पोशिंदा*

नको असा अविचार
फिर माघारी रे, राजा
लाख मोलाचा हा जन्म
फुकासाठी नाही तुझा
दावणीला सर्ज्या-राज्या
अन् गोठ्यातली गाय
तुझ्या माघारी अनाथ
सांग करतील काय ?
तुझा हात पाठीवर
फिरताच घडी घडी
मूठभर चारा त्यांना
माया डोंगराएवढी
दोन पोरं हिरा मोती
परदेशी रे होतील
सांग तुझ्या मागे तीही
कोणाकडे पाहतील ?
तुझ्या नावाचं रे कुंकू
लेते भरून कपाळ
तिला सोडून एकटी
नको उजाडूस भाळ
गुन्हेगाराची तू मौत
का रे मागून घेतोस !
साऱ्या जगाचा पोशिंदा
दीन,भिकारी होतोस
नको असा धीर सोडू
लाज त्यालाही वाटेल
बरसेल कधीतरी
पांग जन्माचा फिटेल
*रमेश कुरलीकर*
पोहाळे, पन्हाळा, कोल्हापूर.
@7@
        डोंगराच्या कड्यावर

डोंगराच्या कड्यावर
आलं  आभाळ भरून
करू भाताची लावणी
गुठ्ठा रानाचा करून
कवा येईल पाऊस
अजिबात नेम नाही
पैरेकऱ्यांनो जराशी
अाता हाता करा घाई
घात साधावी अशीही
वेळ  आलीया चालून
सारं शिवार नटू दे
हिरवा गजरा माळून
डोंगराच्या पायथ्याला
बांधाबांधावर घाई
सोबतीला आहे सदा
उभी माझी रखुमाई
अशी पेरणी झोकात
पीक फुलारून यावं
घास मिळून वेळेला
गाव आनंदात न्हावं
रमेश कुरलीकर.
@8@
*प्रतीक्षा*

कालही तुझ्या नयनात
अश्रू होते
वाट पाहून थकलीस तेव्हा
असं काय करतेस वेडे!
दिलं ते दु:ख तरी
थोडं आहे का?
म्हणून निदान
गळा तरी
मोकळा केलास
समज तुझा माझा
नव्हता ऋणानुबंध
पण लक्षात ठेव
पुढच्या जन्मी मुकी होऊ नकोस
एक थांबा अगोदरच
साद घाल
ओळखणं सोपंच आहे
या आत्म्याचा कण नि कण
तेव्हा सुद्धा
तुझेच गीत गात असेल.
रमेश कुरलीकर
@9@
तो फुले पाठवत होता

तो फुले पाठवत होता
अनोळखी समजून
तिने ती  नाकारत होती
तो फुले पाठवतच राहिला
कंटाळून तिने दारच बंद केले
त्याच्यासाठी
तरीही
तो पाठवतच राहिला
अविरत,नित्यनेम
काही दिवसांनी तिच्या दारात
फुलांखाली कचऱ्याचा ढीग
लोक म्हणत
वेडीला कळत नसेल का ?
आजची फुले उद्यासाठी कचराच असतात
फुलांचा अपमान सहन न होऊन त्याने आत्महत्या केली
'अंत्ययात्रेत कोणीही फुले वाहू नयेत' अशा मजकुराची चिठ्ठी लिहून
ती
तो ढीग उचलून घेऊन
स्मशानात गेली
उधळण्यासाठी
वाऱ्याबरोबर
काही पडली
शेजारच्या चितेवर
त्याबरोबर
तिने ऎकला अावाज
थँक्यू
आजकाल
ती म्हणे वेड्यांच्या इस्पितळात मुक्काम ठोकून आहे.
                  रमेश कुरलीकर
@10@
*आठवणी*

मधाच्या पोळ्यावर दगड मारल्यावर
जशा उधळतात माशा
तशा आठवणी
रुतलेल्या काट्यासारख्या
कचणाऱ्या, सलणाऱ्या
भळभळून वाहणाऱ्या
ठसठसणाऱ्या, बोचणाऱ्या
काही
गोड, हळव्या, कळीसारख्या
अलगद उमलणाऱ्या
तुझी मात्र
या साऱ्या पलीकडे
त्याच पोळ्यातून
ठिबकणाऱ्या मधासारख्या
                 *रमेश कुरलीकर*
@11@
*अनाहूत*

मी उद्गारलो
'तुमचं बाळ !
(खूपच छान आहे.)
... ... ...
फक्त त्याच्या सदऱ्याच्या         खाली-वर झालेल्या गुंड्या सरळ करा.'
ते टरकलेच
माझा नंबर काढून टाकला यादीतून.
तरी
माझी आपली
सवय काही सुटत नाही.
(कदाचित वाढत्या वयाचाही दोष असेल.)
खरंच आहे
मागितल्याशिवाय फुकटचा सल्ला कधी, कोणाला देऊ नये.
हा मात्र
हल्ली मी तोच सल्ला
हळूच कानात सांगतो
ज्याच्या-त्याच्या.
त्यांचंही
बरोबरच आहे म्हणा.
'दूध भाजल्यावर
ताकही फुंकूनच प्यावं.'
असाही सल्ला कुणीतरी-कधीतरी
दिला असेल त्यांना.
अनाहूत असेल
पण
एखाद्याचं बाळ आलं
भेटायला तर
एवढीही कृतज्ञता
मी दाखवूच नये का ?
रमेश कुरलीकर.
@12@
     *बहरला  पारिजात*
आज पहाटे दवांत
बहरला पारिजात
सडा सुगंधी फुलांचा
पसरला अंगणात
            तिने नाजूक हाताने
            रोपे लावियली दारी
            वाऱ्यावर ती डोलता
            गेली आनंदून स्वारी
पारिजात माहेरात
कन्या लावूनिया गेली
फुले सांगतात का हो
आता तिचीच खुशाली ?
              खूप आवडले कोणा
              नेले त्यातलेच एक
              तेव्हा रडली हळवी
              आमची लाडावली लेक
ज्याने नेले एक रोप
आम्हा सर्वांच्या माघारी
सडा असाच पडला
असेल का त्याच्या दारी ?
               *रमेश कुरलीकर*
@13@

     *महा(भाग)कवी*

काही महा(भाग)कवी
एखादी कविता
तिच्या बापाचे श्राद्ध घालून
फिरवतात दारोदारी/घरोघरी
बेवारस अवस्थेत
तरीही ठीक.
पण
कधीतरी अशी
नाव खोडलेली कविता
फिरत फिरत येते
बापाकडेच अजाणतेपणे
तेव्हा खूप वाईट वाटतं
क्षणभर
मात्र लगेचच
आपली कविता लोकांना आवडते
या विचाराने मन हुरळून जाते
हो!
पण मला एक प्रश्न पडतो
तिला बाप भेटल्याचा आनंद
होत असेल का ?
.               *रमेश कुरलीकर.*
@14@

     *श्रावणसखा*

रिमझिम बरसणारा
श्रावण जीवाचा सखा
सकल जीवांसाठी
हिरवा  पाठीराखा
सप्तरंगी इंद्रधनु
श्रावण  स्वप्न सृष्टीचे
नितळ निरागस
सुख दृष्टीचे
उ:शाप वसंताचा
श्रावण बहर मनाचा
गुंतलल्या भावाचा
कर्दळी बनाचा
राजबिंडा भारदस्त
श्रावण महिन्यांचा राजा
हृदयांतरीचे गूज
कर्णमधुर गाजा
सणांचा सुकाळ
श्रावण संगीताचा खजाना
हृदयांतरीचे गूज
धरित्रीला नजराणा
नववधुचा शृंगार
श्रावण हळवा चित्तचोर
लाजत मुरडत हसा
नाचरा मनमोर
          *रमेश कुरलीकर*
nikade64@gmail.com
@15@

*जीवनगाणे*

बिगी बिगी चाल सये
दिस माथ्यावर आला
तान्हुल्याची आटवण
जीव टांगणी लागला
पोटासाठी राबायाला
करू शेतात चाकरी
लाज कशाची धरावी
मिळो कष्टाची भाकरी
उन्हातानात राबून
सेवा धरित्रीची करू
भांगलणी कोळपणी
नको कुठे मागे सरू
घाम गाळून शेतात
चला पिकवाया सोनं
ठेवू इमान मातीशी
गाऊ आनंदानं गाणं
चोच दिली दिले हात
आणि काय मागू नको
दिले सुख भोगायचे
दु:ख कोणा सांगू नको
नशिबात लिवलेले
घ्यावे सुखे समाधाने
अाणि राबावे खुशाल
रोज नव्या आनंदाने
जन्म उजळाया कधी
भीक मागणार नाही
लाख संकटे येतील
मागे हटणार नाही
             *रमेश*
@16@
आल्या चांदण्या वस्तीला

काल स्वर्ग होता दारी
गंधातून पाझरली
माझी जुनी स्वप्ने सारी
सये तुझे डोळे कोठे
होते सांग ना कानात
आणि अजून अबोला
का गे राखून मनात
बघ किती हा शृंगार
जिणे फक्त अर्धा दिस
अन् तू ही मुकी राधा
जीला वावडा पाऊस !
        *रमेश कुरलीकर*
@१७@
*मनीषा*

भिंत बांधताना गवंड्याने
रचावी एक एक वीट
एकमेकीवर आणि
मध्ये सिमेंट घट्ट राहण्यासाठी
तशी जोडावी माणसं
पेरत मैत्रीचं नातं
घट्ट व्हावेत बंध म्हणून
एक एक विचार
विश्वासाने पेरत जावे आणि
स्वीकारावे गुणदोषांसह
तेव्हाच गळून पडतील
मी-माझेपणाचे तकलादू पंख
अोझे आयुष्याचे उचलावे
कुणीतरी, कधीतरी
नसतेच अपेक्षा
फक्त आधाराचा हात मात्र हवा
मित्रांनो!
त्याशिवाय पुढील प्रवासास
जाणेच अशक्य
ही एवढी एकच मनीषा
अाज,उद्या आणि
परवाही
        *रमेश कुरलीकर*
@18@
*तुझा होकार*

मन मोकळं करून
आज घेतला गं श्वास
माझ्या स्वप्नांचा आकांत
आणि संपला गं भास
फुलासारख्या कोमल
आठवणी ज्या कुपीत
नभ साक्षीला ठेवून
कसे जपले गुपीत !
मनातले अोठावर
येता काळीज हलले
तुझ्या अत्तरशब्दांना
तळहाती मी झेलले
भावनांचा गुच्छ असा
फुलारल्या वेलीवर
पडे नाजूक मोहक
एक खळी गालावर
तुझ्या याच होकाराची
आजवर होती आस
आणि संपली प्रतीक्षा
गंधाळला मंद श्वास
*रमेश कुरलीकर*

No comments:

Post a Comment