Tuesday, 9 January 2018

साबीर हाका

साबीर हाका .
तेहरान - ईराणमधला . जन्म १९८६ चा.  ईराणमधल्याच  करमशाहमधे .  कविता करून पोट भरत नाही म्हणून इमारत बाधकामांवर मजूरी करतो .
एका मूलाखतीत साबिर म्हणतो , ' मी जन्मल्यापासून मजूर आहे . आईच्या पोटात असल्यापासून मजूरी करतोय . आईही हेच काम करत होती . तीचा थकवा माझ्या हाडांमधे अजूनही रूतून गोठून बसलाय .... '

तेहरानमधे त्याला रात्र काढायला ,  झोपायला जागा नव्हती . रात्र रात्रभर  तो भटकत रहायचा . आणि  तेव्हा तो कविता करायचा . पोटपाण्याशी होत असलेल्या भांडणात गेली बारा वर्षं त्याला त्याची कादंबरी लिहायला सवड झाली नाहीय .
ईराणामधे  त्याच्या लिखाणावर सेंसॉरशिप आहे . त्याच्या कवितांमधले काही शब्द , ओळी मधूनच कापल्या जायच्या  ....त्या तश्याच अर्धवट छापल्या जायच्या / गेल्यात .

विख्यात Modern Poetry In Translation (MPT ) च्या जानेवारी २०१५ च्या अंकात त्याच्या या कविता आल्यात .
नसरीन परवेझ आणि ह्यूबर्ट मूर यांनी या कविता फारशीतून इंग्रजीत आणल्यात .
इंग्रजीतून या कविता ' world poetry च्या हिंदी ' सदानीरा ' च्या अंकात  आल्यात .
--°°--

साबिरच्या काही कवितांचा अनुवाद -

१)
तूम्ही कधी तूती पाहिलीय
तूतीची फळं?
झाडावरून  गळून पडताना ?
जिथं कूठे पडतात नं ती
एक डाग उमटतो लालभडक . ...

गळून पडण्याइतकं भयानक  काही नसतं
त्रासदायक काही नसतं .
मी पाहिलेत
बांधकामावरचे मजूर
इमारतींवरून खाली पडताना
तूतीची फळंं होताना !
----°---
२)
जर त्यांना बंदूकांचा शोध लागला नसता
तर खूपकाही सेापं झालं असतं .
कितीतरी लोक मरता मरता वाचले असते
कितीतरी लोक जगले असते ....

त्यांना कामगारांची ताकद दाखवणं
खूप सोपं गेलं असतं .
--°---
३)
आयूष्यभर
मी विश्वास ठेवलाय
की खोटं बोलणं पाप असतं
आणि दूसऱ्यांना त्रास देणं चुकिचं असतं .

आयुष्यभर मी विश्वास ठेवलाय
की मृत्यू म्हणजे दूसऱ्या जीवनाची सूरूवात .

तरिही मला मरायची भिती वाटते
खूप भिती वाटते ,
दूसऱ्या जगात
कामगार म्हणूनच जगायला लागण्याची .
--°---
४)

मी
कधी बॅंकेतला फडतूस कारकून होऊच शकत नव्हतो. .
मी
एखाद्या मॉलमधला सेल्समन् होऊ शकत नव्हतो .
मी
एखाद्या पक्षाचा पूढारी होऊ शकत नव्हतो .
मी
टॅक्सी ड्रायव्हर होऊ शकत नव्हतो .
मी
मार्केटिंग एजंट होऊ शकत नव्हतो .

मला
या शहरातल्या
सगळ्यात उंच ठिकाणी उभं राहून
खालच्या इमारतींच्या गच्च गर्दितलं तीचं घर पहायचं होतं .
तीचं घर , जिच्यावर मी प्रेम करतो .
म्हणून मी बांधकाम मजूर झालो !
--°--
५)

मी
जर माझ्या वडलांबद्दल छाती ताठ करून
काही सांगायला लागलो
तर विश्वास ठेऊ नका माझ्या बडबडण्यावर .
खरंतर खूप कमी मिळालेत त्यांना
आयूष्यात समाधानाचे क्षण .

त्या  माणसानं
आपल्या कुटुूंबांच दारिद्र्य दूर करताना
स्वत:चं अख्खं आयूष्य कठोर आणि निरस केलं .

आणि आता
माझ्या कविता छापून घेताना
मला अवघडून येतय
की माझे वडिल वाचू शकत नाहीत .
--°--
६)
माझे वडिल बांधकाम मजूर होते
एक श्रद्धाळू माणूस होते
ते
जेव्हा नमाज पढायचे नं
तेव्हा
त्यांच्या हातांवर पडलेले घट्टे पाहून
अल्लाला लाजल्यासारखं व्हायचं .
--°--
७)
माझं आणि देवाचं पटत नाही .
अजिबात पटत नाही .
खूप जूनं भाडण आहे आमचं
माझ्या लहानपणापासूनचं .
जेव्हा सहा माणसांच आमचं कूटूंब
खिडकी नसलेल्या त्या अंधाऱ्या खोपटात रहात होतं
तेव्हा त्याचं भलं मोठं घर होतं .
तिथे एकटाच  रहात होता .- निवांतपणे .
--°--
८)
घर
- सगळ्या जगासाठी मी हा शब्द वापरू शकतो .
कूठल्याही देशासाठी मी हा शब्द लागू करेन .
ब्रम्हांडालाही घर म्हणेन .

पण तेहरानमधल्या
या बिन खिडकीच्या भाड्याच्या खोलीला
मी घर म्हणू ककत नाही .
--°--
९)
जेव्हा मी मरेन ,
माझी आवडती पूस्तकं
माझ्या कबरीत भरून घेइन .
आवडणाऱ्या तस्विरी , चीत्रं बरोबर घेइन .
या नव्या घरात मला भविष्याची काळजी नसेल ...

लोळत पडेन मी
सिगारेट ओढत आरामात
येतील नजरेसमोर त्या स्रिया
ज्यांना कधी मीठीत घ्यायचं होतं मला
डोळे पाणवतील त्यांच्या आठवणींमूळे ....

या सगळ्या शांत समाधानात
एक भिती कूरतडतेय मला
की कधीतरी एखाद्या पहाटे
कूणीतरी अचानक
उठवेल गदागदा गाढ झोपेतून
खांदे हलवून
म्हणेल -
' उठ रे  सबीर ,
कामावर जायचय साल्या , उठ ! '
--°--
१०)
कफन प्रेताला झाकतं
तसच हा बर्फ सगळं झाकून टाकतो .
बर्फ झाकतं इमारतींच्या सांगाड्यांना .
झाडांना , कबरींना बर्फाची चादर पांढरंशूभ्र करते .

बर्फच आहे
जे देशाच्या सिमा
पांढऱ्या रंगात लपवून टाकतं .
--=--
११)
मोठमोठे बदलसूद्धा किती सहजपणे
केले जातात !
हातोडा फावडं घेतलेल्या मजूरांच
राजकिय कार्यकर्त्यांमधे बदलत  जाणं
किती सोपं आहे !
या अजस्स्र क्रेन्स् हा बदल टिपतात
आणि मजूरांना मरणाकडं ढकलतात ....
--°--
१२)
बराच काळ
पोलिस माझ्या शोधात ३हेत .
मी कूणाचाही खून केला नाहीय
किंवा एखादा लेखही लिहिला नाहीय
सरकारच्या विरोधात .

फक्त तूला माहीतीय मैत्रीणी
की लोकांना किती त्रासदायक वाटेल
की मी फक्त एक मजूर आहे .

जर
मी क्रांतीकारी किंवा बंडखोर असतो तर
काय झालं असतं ?

तरिही
माझ्यातल्या या लहान मूलासाठी
हे जग फारसं बदललेलं नाहीय
ज्याच्या शाळेच्या सगळ्या पूस्तकांवर
आपलं स्वत:चं  चित्र छापलेलं पहायचं हाेतं .
--°--
- श्रीधर चैतन्य
--°°---°°°---

No comments:

Post a Comment