. *कळत नाही*
एकाही झाडाने
दुसऱ्यावर शस्त्र उगारल्याचे,
बळजोरी, खून वा बलात्कार
केल्याचे ऐकिवात नाही.
घरादाराच्या भिंतीसाठी,
शेतीवाडीच्या बांधासाठी
पाखरे भांडल्याचेही नाही
ऐकले कधी
सूर्य, चंद्र, वीज, वारा,
पावसानेही नाहीच कधी
कोणाच्या पाचोळ्याची
चोरी केली
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
मुंग्या, वाळवी, मधमाशांनी
नाहीच केले उपोषण
अथवा काढले मोर्चे की
नाही केले आंदोलन
कुत्र्यामांजरांनी
चाकूचा धाक देऊन
केले नाहीत हप्ते वसूल
कधीच लुटले नाही
समोरच्या हतबल सामान्याला
सारे आपापल्या
जीवनधर्माला जागतात
मग माणसेच तेवढी
अशी का वागतात?
आता उत्तर शोधायला हवे
पार आतून पेटायला हवे
असंगाशी भिडायला हवे
थोडेतरी चिढायला हवे
नाहीतर ...
नाहीतर षंढ म्हणून
रोज इथे जगावे लागेल
अन्यायाचे सत्र उघड्या
डोळ्यांनीच बघावे लागेल
मानवातली माणुसकी
आता जागी केली पाहिजेत
मशाल नव्या तेजाची
घराघरांत नेली पाहिजे
विझत चालल्या फुणगीमधुनी
ज्वाला वेळीच भडकली पाहिजे
माणूस म्हणून घ्यायचे तर
अस्मितेला धडकली पाहिजे
कोमल कोवळ्या रोपांसाठी
आणि नाजूक कळ्यांसाठी
कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी
शेतकऱ्यांच्या मळ्यासाठी
वादळ वारा रोखून दादा
केला पाहिजे एकच वादा
आडोशाचा देऊन हात
पणती तेवत ठेवायची
नवी ज्योत लावायची
नवीव ज्योत लावायची
. *रमेश*
No comments:
Post a Comment