Tuesday, 2 October 2018

जगद्पिता : बापूजी

तू
नाहीस केवळ
आमचा राष्ट्रपिता

तू आहेस

अहिंसेने
अखिल भारत वर्षाला
शेकडो वर्षांच्या पारतंत्री शृंखलेच्या
बंधनातून सोडविणारा मुक्तीदाता

नैतिकतेच्या बळावर
रंगभेदाच्या साम्राज्यांना
हादरवून
अखिल मनुष्यजातीला
मानवतेचे मोकळे आकाश
देणारा प्रदाता

सत्याग्रहाचे नवे शस्त्र 
उचलणारा महामानव
वंदनीय जगद्पिता

पण...

झोळ्या आमच्याच फाटलेल्या
सामूहिक स्वार्थासाठी
मूठभर लोकांनी
तुझ्या आचार-विचारांना तिलांजली देऊन
आमच्या माथी मारला
पूर्वग्रहदूषित इतिहास
बनविले शोषित
दीन-दुबळे

मात्र
आज जेव्हा जेव्हा
आम्ही वाचतो ती अस्सल सोनेरी पाने

शुद्रबुद्धीची कीव करावी वाटते
आणि जेव्हा जाणतो
तुझे नेणतेपण

नक्कीच तू
जगद्पिता असल्याचा
होतो साक्षात्कार
आम्हाला
आजही.

              *रमेश*

No comments:

Post a Comment