नवे शिक्षण -- नवे शिक्षक
... व्याख्याते :- डॉ.सुनिलकुमार लवटे.
आजचे शिक्षण दोन विभागात विभागले आहे. त्यापैकी एक ... गरीब समाजातील मुले, जी जिल्हा परिषद शाळेत शकतात. दुसरा विभाग म्हणजे ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे, त्या पालकांची मुले समृद्ध शाळेत शिकत आहेत. गरीबांची मुले शिकवण्याचं काम आपण सर्व गुरुजन करता, असे म्हणून सरांनी सर्व शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. तसेच ज्यांची मुले समृद्ध शाळेत शिकतात, त्यांचा हेवा वाटण्याची मुळीच गरज नाही.
आपली मुले गरीब शाळेत शिकत आहेत. म्हणून स्वतःला दुषणे द्यायचीही गरज नाही. वास्तव परिस्थिती स्वीकारून तिला छेद देत शिक्षण देणे हीच सद्यकाळात सर्व देशांमध्ये शिक्षकांना करावी लागणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे आपण शिक्षक आहोत. मग ते कुठेही असू.
सरांनी पुढे सांगितले की, त्यांच्या वयाची पिढी स्वातंत्र्याबरोबर जन्माला आलेली पिढी आहे. दुसरी स्वातंत्र्यानंतर एका तपाच्या काळानंतर जन्मलेली, तर तिसरी पिढी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्माला आलेली आहे. आज हीच पिढी समाजाचे नेतृत्व करत आहे. आज तुमचे विद्यार्थी या शतकातले; म्हणजे या शतकात जन्मलेले आहेत आणि तुम्ही शिक्षकलोक मागच्या शतकात जन्मलेले आहात. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचे अंतर आहे. प्रत्येक काळात हे अंतर असतंच.
आज आपल्यापुढे नवनवीन आव्हाने उभी आहेत. एकीकडे श्रीमंत आणि इंग्रजीप्रचुर शिक्षण तंत्रप्रधान होतंय. आजही आपले सार्वजनिक शिक्षण... ज्याला आपण बहुजन समाजाचं शिक्षण म्हणतो.. ते पुस्तक, पाटी-पेन्सिल, वही, पेन यामध्येच अजूनही अडकून आहे. आपल्याकडचं शिक्षण अन् जगातलं शिक्षण यांमध्ये खूपच तफावत आहे. जगातलं सारं शिक्षण आज पेनमधून पेन ड्राईव्हमध्ये आलं आहे. आपण मात्र अजून पेनामधेच अडकून आहोत. पेनमधलं शिक्षण पेन ड्राईव्हमध्ये कसं आणता येईल, हे आज आपल्यापुढं असलेलं आव्हान आहे. ही फार जोखमीची, जिकिरीची किंवा क्रांतिकारी गोष्ट अजिबात नाही. तुम्ही सर्वजण स्वतःला आपण झेड.पी.चे शिक्षक आहोत असे समजत असाल तर सर्वप्रथम हा न्यूनगंड मनातून झटकून टाका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपण भारतातले शिक्षक आहोत. जगामध्ये भारत जसा आहे तसे आपण आहोत.
तुम्ही असे का आहात? साधी गोष्ट आहे... तुमचा देश असा आहे म्हणून तुम्ही तसे आहात. आपण भारतातले शिक्षक आहोत, असे जेव्हा तुम्ही म्हणायला लागाल, तेव्हाच तुमच्या मनातील द्वैतभाव आणि न्यूनगंड आपोआप कमी होईल. जोपर्यंत शिक्षण न्यूनगंडातून मुक्त होत नाही तोपर्यंत शिक्षणातला न्यूनगंड कमी होणार नाही. शिक्षण समृद्ध व्हायचे असेल तर पहिल्यांदा शिक्षकांची मानसिकता समृद्ध पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनीही काही तत्त्वं पाळली पाहिजेत. ती म्हणजे शिव्या देणं बंद केलं पाहिजे. फक्त स्वतःच्या मनाच्या आरशासमोर उभे राहा. स्वतःला मनापासून रोज एकदा पाहा. तुम्ही आरशात स्वतःला पाहता की नाही हे मला माहीत नाही; परंतु मी मात्र रोज स्वतःला पाहतो. मी असाच छान दिसतोय. तुम्ही आरशामध्ये माझ्यासारखे प्रसन्न दिसत असाल तर समजूया की, या देशाला काहीतरी उपयोगी आहे. जर तुम्हाला तुमचा चेहरा रडवेला दिसत असेल तर मात्र तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. आपला कायाकल्प झाला पाहिजे. शिक्षकाचा जोपर्यंत कायाकल्प होत नाही... मानसिक कायाकल्प होत नाही, तोपर्यंत परिवर्तनाची कोणतीही शक्यता कोणत्याही देशात शक्य नाही.
वाचनाबद्दल बोलताना सर म्हणाले, " मित्रांनो कोणतेही पुस्तक चुकून वाचू नका, तर ते मनापासून वाचा. प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते. नवा संदेश देत असते. "
प्राथमिक शिक्षकाचं घर कसं ओळखायचं, याचा त्यांनी छान किस्सा सांगितला. ज्या घराच्या पुढे ' इथे पिको फॉल करून मिळेल ' अशी पाटी लावलेली दिसेल, तेव्हा ते प्राथमिक शिक्षकाचे घर समजावे. ' येथे प्लॉट पाडून दिले जातील ' असे जेव्हा घरासमोरील पाटीवर लिहीलेलं असतं तेव्हा ते घर प्राध्यापकाचं आहे असं समजावं. मित्रहो, आपलं चरित्र समाजाच्या लेखी असलं पाहिजे. शिक्षकाचं घर वाटायचं असेल तर त्या घरात भरपूर पुस्तकं असावीत.
शिक्षकांच्या घराचं लक्षण काय?याबद्दल सर मार्मिक बोलले. ते म्हणाले, आपल्या घरी किमान पाठ्यपुस्तक तरी असलंच पाहिजे ... स्वतःच्या पैशाने विकत घेतलेलं! आपल्या विषयाची डिक्शनरी असली पाहिजे. घरी विश्वकोश असणं, विश्व कोशाचे सर्व खंड असणं, साहित्य अकादमीप्राप्त लेखकांच्या साहित्यकृती असणं, ज्यांना ज्ञानपीठ मिळालेला आहे अशांची किमान नावंतरी माहीत असणं, हे शिक्षकाचं वर्तमानातलं सामान्य ज्ञान आहे. वाईट वाटून घेऊ नका. आपणच आपल्यापासून सुधारणा करूया. जर बंगालमधील शिक्षक आपल्या मासिक पगाराच्या दहा टक्के रक्कम पुस्तकांवर खर्च करत असेल तर महाराष्ट्रातील शिक्षक का करू शकत नाही? महाराष्ट्र पुरोगामी व्हायचा असेल तर आपण सुद्धा आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. बंगालमध्ये शिक्षण कसे घडते, याचे एक छान उदाहरण सरांनी दिले. एक मुलगी होती. लग्नाची. लग्न ठरवण्याचा कार्यक्रम सुरू होता. बायकामंडळी स्वयंपाक घरात होती. पुरुष मंडळी हॉलमध्ये होते. सर्व बायका कांदा-पोहे करण्याच्या तयारीला लागल्या होत्या. देण्या-घेण्याचा विषय सुरू होता. लग्नाची मुलगी मात्र कंटाळली होती. तिने एका लहान मुलीला जवळ बोलावलं आणि विचारलं, वाचायला काय आहे का ?लहान मुलीने तिला अंगठा दाखवला. आमच्याकडे काय वाचायला नसतं. तिने अंगठा पहिला. ती आपल्या वडिलांना म्हणाली, "बाबा ज्या घरात मला अर्धा तास काढता येत नाही. त्या घरात मला आयुष्य काढायची शिक्षा देऊ नका." त्या मुलीने ते स्थळ नाकारलं होतं.
मित्रहो आपली आपल्यावरील जबाबदारी ओळखली पाहिजे. आपल्याला काय घडवायचं आहे, याचा विचार केला पाहिजे. रेसमधल्या घोड्यांमध्ये केवळ जिंकणाऱ्या घोड्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि हरणाऱ्या घोड्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हा आपल्या शिक्षणाचा पराभव आहे.
सर २००५ साली महावीर कॉलेजला सर प्राचार्य असतानाची गोष्ट... त्यावेळी महावीर कॉलेज शेवटच्या नंबरचे कॉलेज होते. जेव्हा कुठेच प्रवेश मिळत नसे, तेव्हा महावीर कॉलेजमध्ये मिळायचा. सर्वांचे प्रवेश जूनपासून सुरू व्हायचे. महावीरचे प्रवेश मात्र ऑगस्टला सुरू व्हायचे. प्रवेश घ्यायला येणाऱ्या मुलांची मार्कलिस्ट तीन - तीन, चार -चार असायची. ' किमान गुणवत्तेचे कमाल विद्यार्थी ' हे महावीर कॉलेजचं ब्रीदवाक्य होतं. ३५ झिंदाबादचेच सर्व विद्यार्थी. १०० % निकाल. एकही विद्यार्थी नापास नाही.
आपण नेहमी गुणवत्ताधारक ...
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांबाबत बोलतो, पण अप्रगत विद्यार्थ्यांविषयी मात्र कुणीही बोलत नाही.
आपल्यासारख्या लोकांनी ... समाजाचा आदर करणाऱ्यांनी अप्रगत विद्यार्थ्यांबद्दल बोललं पाहिजे. जे शिक्षक अप्रगत विद्यार्थी प्रगत करतात, अशा शिक्षकांचा सत्कार झाला पाहिजे. बदलत्या काळात शिक्षणाची परिमाणे बदलली आहेत.
मॉरिशस हा एक छोटासा देश. ऐंशी टक्के लोक भारतीय. पूर्वी म्हणजे दिडशे वर्षापूर्वी आपल्या देशातील ... सर्व प्रांतातील लोक तिथे गेले. सर्वच बाबतीत काटेकोर नियोजन केल्यामुळे आज तो देश यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे.
तुम्ही कोणत्या भाषेत शिकवता यापेक्षा काय शिकवता याला खूप महत्त्व आहे.
आपण सारे एक झालो तरच उभे राहू शकतो,
विभागलो तर मात्र फक्त उध्वस्तच होऊ शकतो. आपण सर्वांनी मिळून देशाचं चित्र बदलायचं ठरवलं
तरच देश बदलेल.
आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे. आपल्या देशातले साहेब जाऊन सत्तर वर्ष झाली. आपले सहकारी ...आपण सर्वजण समान आहोत. आपल्या देशाचं दुर्दैव हे की, देश स्वतंत्र झाला तरी, इतकी वर्ष होऊनही आपल्याला अजून मुकादम लागतो. मैलकुलीला सुपरवायझर जेव्हा सांगेल तेव्हाच अन् तेवढंच काम करत असतो .
शिक्षकांनी वर्गात देहभान हरपून शिकवलं पाहिजे. आपल्या शिकवण्यामध्ये एक दोष असावा.
आपल्याला बेल झालेली ऐकू येऊ नये.
ज्या शिक्षकाला आपल्या मोबाईलचा वापर शिक्षणात ... शैक्षणिक साधन म्हणून करता येतो, ते शिक्षक वर्तमानातले.
आपल्या मोबाईलमध्ये तीनशे पुस्तके मावतात.
आपल्या मोबाईलमधून विद्यार्थ्यांसाठी पालकांना पत्र पाठवू शकतो, गृहपाठ देऊ शकतो. आपण मुलांना शिकवत असतानाची कथा पालकांना पाठवू शकतो. एखादी शैक्षणिक लिंक पाठवू शकतो. एकमेकांशी संवाद साधू शकतो. आपण जर मोबाईलवरून रजा चिठ्ठी पाठविली तर आपले कितीतरी कागद वाचतील. साधनांचा सहज वापर हे शिक्षणाचे पहिले तत्त्व आहे. जी साधने वेळ, शक्ती, व श्रम वाचवणारी आहेत त्यांचा वापर मुलांसाठी कसा करता येईल, हे आपण पाहावे.
आज प्रत्येकाकडे संगणक असला पाहिजे. निदान भारितला मोबाईल तरी असावा. आपल्याला नव्या काळातलं शिक्षण द्यायचंय ! बदल करायचाय ना ? शिक्षणात नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करा. दिवसातला अर्धा तास इंटरनेटचा वापर करा. यू ट्यूब ओपन करून पाहा.
यू ट्यूबवरील ' खान अॅकॅडमी --- एक नवं शैक्षणिक विद्यापीठ ' ... यावर आधारित सरांनी एक छान किस्सा सांगितला.
ते म्हणाले , I wanted to encourage you! I wanted to inspire you... nice way, in conceptive way!
तुमची मुले व तुम्ही यातला फरक ...
आपण संगणकाबद्दल काही माहिती घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अन् आजची पिढी मात्र Physical Native -- उपजत संगणक तंत्रज्ञान घेऊन जन्माला आलेली आहे.
येत्या पाच वर्षांत शिक्षकांचं काही कामच राहणार नाही, इतक्या गतीनं आजचं शिक्षण बदलत आहे. शिक्षकांची गरजच उरणार नाही. मुले स्वतःच ज्ञान आत्मसात करतील. यावेळी सरांनी मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स व सर खान यांच्या भेटीतला किस्सा सांगितला.
MOOCS = Mass Online Open Cources - या संस्थेविषयी माहिती सांगितली. या संस्थेनं शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांचं अस्तित्वच संपवण्याचं काम सुरू केलंय.
सरांनी MKCL विषयीसुद्धा माहिती सांगितली.
पूर्वी ऐंशी रुपये पगार मिळायचा. शेवटचा पगार ऐंशी हजार रुपये इतका मिळाला. आज मुलाचा पहिला पगार ऐंशी हजार रुपये आहे. जग फारच झपाट्याने बदलत आहे.
आजची नवी पिढी म्हणजे स्वयंभू गणपती आहे. आज त्यांना काही सांगायची गरज भासत नाही. शिक्षणात लवचिकता असावी. मुलांना त्यांची इच्छा होईल तेव्हा खेळायला दिले पाहिजे. त्यांना मनापासून खेळायला, जेवायला, झोपायला दिले पाहिजे. त्यांना स्वावलंबी बनविले पाहिजे. मुले शाळेत आल्यानंतर परत जाताना बदलली पाहिजेत.
आज श्रमापासून शिक्षणाची फारकत होत आहे. हा शिक्षणातील दोष आहे. शिक्षणातून असा माणूस घडवूया की, या शिक्षणामुळे त्याच्या अंगी श्रमप्रतिष्ठा येईल, स्वावलंबन येईल. मूल्यवान समाज निर्माण करणे, हे आपलं स्वप्न आहे.
शिक्षणातून बदल घडवायचा असेल तर ..
दाखल्यातून जात-धर्म काढून टाकली पाहिजे.
मुलाची जात-धर्म या नावाने वर्गवारी केल्यामुळे शिक्षणाची अधोगती होत आहे.
व्याख्यानाचा समारोप करताना सरांनी एकविसाव्या शतकातील शिक्षणाची उदिष्टये स्पष्ट केली. ती अशी -
(१) सर्व समाज एकत्र(सममूल्य असलेला)घडवा.
(२) शिक्षणातून जात -धर्म काढून टाका.
(३) ' कुणापैकी ?' हा प्रश्न कायमचा घालवा.
(४) नापास मुलांचा आदर करा.
(५) मुलांना गोळ्या -बिस्किटे द्या.
(६) शहाणपण, कॉमन सेन्सला महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा.
(७) आपलं शिक्षण जोपर्यंत उपचारात्मक होणार नाही, तोपर्यंत ते खरे शिक्षण होणार नाही.
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
Wednesday, 10 October 2018
Sunilkumar Lavate
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment