Sunday, 16 December 2018

आई, मला खेळायला जाऊ दे ना!

*आई,मला खेळायला जाऊ दे ना!*
अभ्यास! अभ्यास !! अभ्यास !!!
सारखा अभ्यासच !!!!
सकाळी शाळेत अभ्यास, दुपारी क्लासमध्ये अभ्यास,
संध्याकाळी घरीही अभ्यासच,
अगदी रात्री झोपेतसुद्धा अभ्यास.
मराठीचा अभ्यास
इंग्रजीचा अभ्यास
गणिताचा अभ्यास
आणि कशा कशाचा अभ्यास
आई किती करायचा गं अभ्यास ?
या अभ्यासानं माझं डोकं दुखायला लागतं.
आणि मग तुलाच त्रास होतो.
एक सारखा अभ्यास करून
पुस्तकातला किडा होशील  असं म्हणतात ना आजोबा !
जरा माझा ऐक ना!
आई मला खेळायला जायचंय
अभ्यासाबरोबर जरा खेळू दे ना!
खेळामुळे तब्येत चांगली राहते,
शक्ती वाढते,
असंही आजोबा म्हणतात.
आणि तो टीव्ही मधला लाडू बघ ना
किती गुटगुटीत आहे
तो तालमीत खेळतो
मैदानावर खेळतो
म्हणूनच ना
आणि मी ?
एवढा एवढासा
उंदरा एवढा, पिटुकला.
व्यायाम नाही,
खेळ नाही,
फिरणं नाही
चालणं नाही
वेळ वाया जातो म्हणून शाळेला जायलाही रिक्षा
काय म्हणतेस ?
खेळाच्या नादानं अभ्यासात मागे पडेन!
नाही गं, मुळीच नाही!
दररोज थोडाच वेळ खेळेन
मैदानावर गेलो तर
माझी तब्येत चांगली होईल खरं ना ?
मग देना वेळ मला खेळायला
आणि एक गंमत सांगू का?
शाळेतल्या मॅडम ना पण सांग.
आम्हाला मैदानावर खेळायला सोडायला.
सारख्या मागे लागलेल्या असतात.
पहिला तास पाढे काढा चला दुसरा तास शुद्धलेखन लिहा
तिसरा तास गणित करा चौथा तास इंग्रजी बोला लेखन करा, पाढे लिहा, गणित सोडवा, प्रश्न उत्तरे लिहा.
What is this ?
Who are you ?
Where are you going ?
When is your paper ?
अगदी नको नको झालाय जीव
त्याही सारखा,अभ्यास, अभ्यासच करा म्हणत असतात.
बाबा म्हणतात इंजिनिअर  हो
भरपूर पैसे मिळतील.
आत्या म्हणते वकील हो
सगळ्या कटकटी मिटतील
तर आजी म्हणते
त्यापेक्षा डॉक्टर हो
मग औषधांसाठी
दवाखान्यात जायला नको
मला तर कळतच नाही
मला काय व्हायचं
याचा विचार कोणीच करत नाही
खरंय ना!
मग मी शेतकरी
किंवा पैलवान झालो
तर कुठे बिघडलं नाही ना
म्हणूनच म्हणतोय
आई मला मैदानावर जाऊ दे ना!
अगदी थोडा वेळ
अस्सा जातो नि
अस्सा येतो
आणि मग भरपूर वेळ अभ्यासही करतो बरं
चालेल ना?
हो .....म्हणतेस

थँक्यू यू आई.

   *©चंद्रकांत*

No comments:

Post a Comment