Monday, 7 January 2019

तीन प्रश्न



तीन प्रश्न
(एकांकिका)
 
लेखक
 चंद्रकांत निकाडे


 


एक


·© सौ. छाया चंद्रकांत
         9172994564

· लेखक : चंद्रकांत निकाडे
         9922314564

· हृदय प्रकाशन, पोहाळे, कोल्हापूर.
         9922314564

· Three Questions, Marathi,
  Ekankika
     201901175

· प्रथमावृत्ती: डिसेंबर,2018


· मुखपृष्ठ : चिन्मय ग्राफिक्स, पोहाळे.


· मूल्य:₹ 25 /-


ISBN -9-789388-589-11-6

दोन



अर्पण

माझ्या 
सर्व
एकांकिका
रंगमंचावर
समर्थपणे
सादर
करून
यश
प्राप्त
करणाऱ्या
बालचमूंना

------
चंद्रकांत निकाडे



तीन


प्रतिक्रिया

काही मित्रांचा हट्ट झाला की लिहावं लागतं. चंद्रकांत निकाडे, सर  यांनी तीन प्रश्न या एकांकिकेत चांगल्या विषयाची निवड करून, वर्तमान काळातील समस्या मांडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे आजच्या राजकीय परिस्थितीशी समांतर वाटचाल असणारी, प्रयोगशील एकांकिका झाली आहे. तशी ती मीडियाच्या माध्यमातून वाचली आणि आपल्या शाळेतील मुलांकडून सादर करण्याचा मोह झाला. यापेक्षा आणखी काय लिहावं !
                                       मिलींद यादव


श्री.चंद्रकांत निकाडे हे आमच्या नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फे आळते ता.पन्हाळा जि.कोल्हापूर या शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांनी बालकादंबरी, बालकथा, बालनाटिका , एकांकिका अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केलेले आहे. विशेषत: अर्धा शतक एकांकिका लिहिलेल्या आहेत. त्या मुलांवर संस्कार करणाऱ्या आहेतच आणि प्रयोगक्षमही आहेत. कुडतंसारख्या एकांकिकेला आंतरराज्य इंदौरचा लेखन पुरस्कार मिळाला आहे. विटाळ, माकडवाला पोर, झुलू, बिब्ब्याचं तेल, गृहपाठाची वही अशा एकाहून एक श्रेष्ठ एकांकिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. यामध्ये तीन प्रश्न या एकांकिकेचा समावेशाने मोलाची भर पडली आहे.
प्रधानाच्या सांगण्यावरून जनतेवर अन्याय करणाऱ्या  राजाला वठणीवर आणणाऱ्या बारीकरावची ही कथा आहे. वृद्ध माणसांची सेवा केली पाहिजे हा संदेश यातून लेखकांनी दिलेला आहे. एक संवेदनशील विषय हाताळण्यात लेखक यशस्वी झालेले आहेत. त्यांच्या पुढील लेखन कार्यासाठी मनापासून शुभेच्छा !!!

                                           परशराम आंबी

चार
मनोगत
     प्रत्येक वर्षी आंतरशालेय एकांकिका स्पर्धा जवळ आल्यावर हमखास एकांकिका शोधण्याची लगबग सुरू होते. एकांकिकेची व पात्रांची निवड हे तसं कठीण काम. ते झालं की जोमाने सराव सुरू होतो.तीन प्रश्न ही तशी कथा. या कथेचे कथाकथन अनेकदा केलं. मुलांना खूप भावलं म्हणून माध्यमांतर करण्याच्या उद्देशाने एकांकिका लेखन केलं. स्पर्धेच्या निमित्ताने अलीकडे लेखन होऊ लागला आहे. थोड्याशा वगनाट्याच्या अंगाने जाणाऱ्या प्रधानजी, राजा, राजवाडा, मंत्री या फॉर्ममध्येच ही एकांकिका लिहिली आहे.
     या कथेचा नायक हा शेतकरी आहे, पण चांगला शिकला सवरलेला आहे. शिक्षण घेतलेल्या माणसांनी श्रम करायचे नसतात. हा गैरसमज मोडून काढायचं काम हा कथानायक करेल. शिवाय आजच्या काळात वृद्धाश्रमांची संख्या जोमानं वाढत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत, पण लोक जाणूनबुजून कानाडोळा करत आहेत. काही प्रश्न बाल मनावर ठसवण्याचा प्रयत्न या एकांकिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. खरंतर स्पर्धेच्या निमित्ताने आजवर एकांकिकांचं लेखन झालं. पूर्वी काही काळ प्रत्येक वर्षी मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशा प्रतिवर्षी दोन-दोन एकांकिका लिहाव्या लागायच्या. सहकाऱ्यांनी लेखनास सुरुवात केल्यामुळे तो भार थोडा हलका झाला. तरीही बाजारात खपवल्या जाणाऱ्या एकांकिका पाहिल्या की, हात शिवशिवत आणि लेखन करायला सरसावतात. लेखन होतं, आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत एकांकिका सादर होते, हाच मुळी आनंद आहे. पुस्तक रुपांतर करण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागतो. लेखन संस्कार करावे लागतात. या प्रवासात ज्यांनी ज्यांनी सहकार्याचा हात पुढे केला त्या सर्वांना धन्यवाद. हृदय प्रकाशन हे घरचं असलं तरीही त्यासाठी आरोही ग्राफिक्स, चिन्मय ग्राफिक्स यांच्या कष्टातून निर्मिती होत झाली.
     याची मुद्रणप्रत तयार करत असताना ती अधिक निर्दोष व्हावी यासाठी श्री परशराम आंबी, श्री संजय नवाळे, मिलिंद यादव यांनी काही मौलिक सूचना केल्या. त्यांना धन्यवाद. संजय नवाळे यांच्या दिग्दर्शनाने ही एकांकिका स्पर्धेत सादर होते आहे. मुले उत्साहाने सहभागी झाली आहेत त्यांना यश तर नक्की मिळणार पण साहित्यिकास मोठा आनंद आपण आपल्या मुलांसाठी लिहिल्याचा आहे. मुलांप्रमाणेच वाचकही स्वागत करतील आणि एक नवा संदेश नव्या पिढीला द्यायचा माझा मानस पूर्ण होईल. ही अपेक्षा. धन्यवाद !                                                                                  चंद्रकांत निकाडे
पाच


पात्रे
बोका : निवेदक-1
खोका : निवेदक-2
पहारेकरी:
महाराज  :
प्रधानजी :
महामंत्री :
दवंडीवाला :
वाटसरू-1 :
वाटसरू-2 :
विद्वान :
बारीकराव :
आजोबा :
दरबारी 



सहा

प्रवेश पहिला
 (स्थळ: रंगमंच. पात्रे: बोका आणि खोका निवेदक प्रवेश करतात.)
दोघे : राम राम मंडळी,
बोका : मी बोका आणि हा खोका. आता तुम्ही म्हणाल. ही काय नवीन नावे ? त्याचं झालं असं. लहान असताना मला दूध खूप आवडायचं. सकाळ-दुपार-संध्याकाळ मी दूधच प्यायचो. दुसरं काहीच खायचं नाही. दिलं तरी दूध प्यायचं, मागून घेऊन दूध प्यायचं आणि चोरूनसुद्धा दूधच प्यायचं. म्हणून शेजाऱ्यांनी माझं नाव बोका ठेवलं.
खोका: माझ्या नावाची अशीच गंमत. मला ऐकायला कमी येतं.
बोका: आणि बडबडायला जास्त येतं.
खोका: लोक सांगायचे एक आणि मी करायचं दुसरंच त्यामुळे सगळे म्हणू लागले याचं डोकं नाही खोकं आहे. तेव्हापासून माझं नाव खोका पडलं.
बोका: बरं झालं ठोका नाही पडलं. नाहीतर सगळ्यांना ठोकत सुटला असतास.
दोघे: तसे आम्ही दोघे जानी दोस्त लंगोटी यारच म्हणा ना !
खोका: तर आम्ही आज तुम्हांला एक गंमत दाखवणार आहोत. कसली? कसली गंमत ? कसली ऽऽऽ. अहो जरा धीर धरा. सांगतो, सांगतो. तुम्हाला ही गंमत सांगायलाच आलो आहोत.
बोका: तर ही आमची विश्राम नगरी आणि या नगरीचे महाराज सदा विश्राम म्हणजे सदानंददेव  दादासाहेब विश्राम.
खोका: विश्राम नगरीचे महाराज  म्हणजे नावासारखेच. सगळा भरवसा

7

प्रधानजींच्यावर. ते सांगतील तेच खरं.ते बोलतील तसंच वागणं.
बोका: ते ठरवतील तोच कायदा.
खोका: तर अशा ह्या रिलॅक्स म्हणजे विश्राम महाराजांच्या नगरीतली ही गोष्ट तुमच्यासाठी.
बोका: पाहूया, तुम्हांलाही आवडते का ?

प्रवेश दुसरा
(स्थळ:राजवाडा. पात्रे:पडदा उघडताच पहारेकरी आरोळी देतो.)
पहारेकरी: होशियार, बाआदब, बा मुलाहिजा, आपल्या विश्राम नगरीचे महाराज  सदानंददेव दादासाहेब विश्राम दरबारात हजर होत आहेत हो ऽऽऽ (महाराज , प्रधानजी व महामंत्री  प्रवेशतात.)
महाराज : प्रधानजी काय खबर आहे आपल्या राज्याची.
प्रधानजी: महाराज समदं काही ठीक आहे पण आपल्या राज्यातल्या लोकांचे दरडोई उत्पन्न कमी झाले आहे.
महाराज : प्रधानजी, ते कशामुळे?
प्रधानजी: महाराज, आपल्या राज्यात लहान मुलांचे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हाताऱ्या माणसाचे प्रमाण वाढलेले आहे. ही मुलं आणि म्हातारी माणसं काहीही काम करत नाहीत. मुलांचे ठीक आहे ती लहान असतात, पण ही म्हातारी माणसं बिनकामाची. त्यांचा काही उपयोग नाही त्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे दरडोई उत्पन्न खूपच कमी झालं आहे.
महामंत्री: होय महाराज ही म्हातारी माणसं म्हणजे नुसता खायाला कार नि धरणीला भार.

8

महाराज :असं म्हणता,मग याच्यावर काही तरी उपाय असेलच की; ज्यामुळे आपल्या राज्यातल्या लोकांचे दरडोई उत्पन्न वाढून जाईल.
प्रधानजी:आहे तर ! एकदम जालीम उपाय आहे.
महाराज : काय उपाय आहे ? सांगा तर आम्हाला.
प्रधानजी: यावर उपाय म्हणजे... ...
महाराज : तुम्ही सांगा हो, बिंधास्त सांगा. लगेच म्हणजे आजच अंमलबजावणी  करतो.
प्रधानजी: उपाय असा की, नगरात साठ वर्षांच्या वरील एकही माणूस राहता कामा नये.
महाराज : मग करायचं काय त्यांचं ?
प्रधानजी: हा ज्याचा त्याचा प्रश्न. आपण फक्त हुकुम करायचा.
महाराज : पण मग त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढेल ना ? काही आफत तर येणार नाही ना ?
प्रधानजी: वाढेल म्हणजे काय वाढलंच पाहिजे. हेच बघा. जेव्हा शंभर रुपये उत्पन्न होईल आणि 50 माणसं असतील तेव्हा प्रत्येकाचे उत्पन्न किती ?
महामंत्री: दोन रुपये.
प्रधानजी:आणि त्या 50 पैकी म्हातारीकोतारी  25 माणसं  हाकलून दिली  तर ?
महामंत्री:तर 25 चोक 100 प्रत्येकी चार रुपये उत्पन्न .
प्रधानजी: मग पटलं ना ! महाराज, करा हुकुम दवंडी  पिटायला.
महाराज : महामंत्री, आमच्या हुकुमाची तामिली करा. नगरात दवंडी

9

पिटा. आजपासून एक महिन्याच्या आत नगरातली सगळी म्हातारीकोतारी माणसं नगरात राहता कामा नये. ज्याने त्याने आपापल्या परीने विल्हेवाट लावावी.
महामंत्री: होय  महाराज, आजच  दवंडी  पिटायला  सांगतो.
प्रधानजी: चला महाराज, दरबाराचे कामकाज सुरु करू या. लोक येऊन  थांबलेत  बरेच.     (सर्वजण जातात.)

प्रवेश तिसरा
(स्थळ:रस्ता. पात्रे:दवंडीवाला हलगी वाजवून दवंडी देत-देत प्रवेशतो.)
दवंडीवाला: ऐका हो ऐका...आजपासून ... एक महिन्याच्या आत ... नगरात साठ वर्षांच्या वरील ...एकही  माणूस राहता कामा नये... असा आपल्या महाराजांचा... हुकुम आहे हो ऽऽऽ ...
(वाटसरू-1 व वाटसरू -2 प्रवेश करतात.)
वाटसरू-1 : अहो काय म्हणताय काय ?
दवंडीवाला: मी नाही म्हणत खुद्द महाराजांचा आदेश आहे. त्यांच्या हुकुमाप्रमाणं तर मी दवंडी देत आलो‌ आहे. काय माझ्या मनाचं सांगतो का ? (दवंडीवाला हलगीचा आवाज करत पुढे जातो.) ऐका हो ऐका. एक महिन्यानंतर नगरातील कोणाच्याही घरात शिपाई पाहणी करायला जातील. तेव्हा जर एखादा 60 वर्षावरील मनुष्य सापडला तर त्या घरातील कारभाऱ्याला सहा महिन्याची कैद आणि एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल होSSSS(दवंडीवाला दवंडी  देत  निघून जातो.)
वाटसरू-1: आता याला काय म्हणायचं?

10

वाटसरू-2: काय म्हणायचं म्हणजे ? राजांचं बरोबर आहे. अरे, कशाला लागतात म्हातारी माणसं. ना कामाची ना दामाची. त्यापेक्षा ती  नसलेलीच  बरी.
वाटसरू-1: असं का म्हणता बुवा ? ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपले आई-वडील असतील ना म्हातारेकोतारे ! त्यांना आपण घराबाहेर काढल्यानंतर कुठे जातील ते ?
वाटसरू-2: जातील कुठेही, वृद्धाश्रमात.
वाटसरू-1: कसे जातील ? अहो आपल्या राज्यातले वृद्धाश्रम सहा महिन्यापूर्वीच महाराजांनी बंद केलेत.
वाटसरू-1: मग जातील आपल्या पाहुण्यांच्या गावाला.
वाटसरू-1: अरे, घरचे लोक सांभाळायची मारामार. मग पाहुणे तर परके. कोणाचे कोण ! कसे सांभाळतील त्यांना ?
वाटसरू-2: अरे, हा राजाचा हुकुम. त्याला कोण काय करणार ? त्या हुकुमाप्रमाणे वागलेच पाहिजे. नाहीतर सहा महिन्याची कैद भोगावी  लागेल आणि  वर हजार रुपये दंड भरावा लागेल.
वाटसरू-1: मला वाटतं  हा आपल्या महाराजांचा निर्णय नसावा. ते तसे दयाळू आहेत. हे कोणी बरं त्यांच्या मनात भरवलं असेल ?
वाटसरू-2: कोणी म्हणजे काय ? आपले प्रधानजी आहेत ना. त्यांना दुसरं काय काम ? सारख्या लावालावी करत असतात. त्यांनीच भरवलं असणार महाराजांच्या मनात.
वाटसरू-1: पण हे खूपच वाईट झालं. आता काय करायचं ?
वाटसरू-2: काही नाही करायचं. आपल्या हातात काही नाही.
वाटसरू-1: ठीक आहे. बघू काय घडतंय ते. आपण खबर घेऊ.

11

प्रवेश चौथा
(स्थळ:रंगमंच. पात्रे:बोका व खोका निवेदक प्रवेशतात.)
बोका: तर मंडळी, असे आमचे महाराज  आणि धन्य ते त्यांचे प्रधानजी. त्यानी निर्णय घेतला, दवंडी  पिटली आणि अंमलबजावणीला  सुरुवातही  केली .
खोका: या आदेशानुसार कोणी आपले म्हातारे आईबाप मुलीकडे पाठवले, कोणी आजोळी पाठवले, कोणी बहिणीकडे पाठवले तर कोणी  पाहुण्यांच्याकडे  पाठवले .
बोका: एक बहाद्दर मात्र खूपच हुशार होता. बारीकराव  नाव त्याचं. लहानपणीच त्याचे आई-वडील वारले होते. त्याच्या आजोबांनी त्याचा लहानपणापासून सांभाळ केला. त्यांना असे राज्याबाहेर  हाकलून  देणे  त्याला मुळीच  पटले  नाही .
खोका: अहो  पण  त्यांने  काय  केलं ?  हे तरी सांगा ना !
बोका: या बहाद्दराने आपल्या घरात एक तळघर तयार केलं. त्याला शिडी लावून घेतली.  सुंदर झाकण तयार केलं.
खोका: मग ? मग काय झालं ?
बोका: दररोज  सकाळी  आजोबांना आंघोळ पाणी झालं की, तो खाऊ-पिऊ घालायचा आणि तळघरामध्ये नेऊन सोडायचा. दिवसभर आपल्या शेतातली कामं करायचा. संध्याकाळी घरी परत आल्यावर घराचे दरवाजे खिडक्या पक्क्या लावून घ्यायचा आणि मग तळघराचा दरवाजा उघडून आजोबांना वरती घ्यायचा. पुन्हा त्यांची सेवा करायचा खाऊपिऊ घालायचा. रात्री ते दोघेजण एकमेकाशी गुजगोष्टी करायचे आणि  झोपी  जायचे.

12

प्रवेश पाचवा
(स्थळ:राजवाडा. पात्रे:विद्वान राजवाड्यासमोर प्रवेश करतात. पहारेकरी पहारा देत आहे.)
विद्वान: वा ! खूप सुंदर राजवाडा ! या राजवाड्यात आपली विद्वत्ता दाखवायला हरकत नाही. खूप धन मिळेल आपल्याला. (आत जाऊ लागतो.)
पहारेकरी: (अडवत.) महाराज, कोण आपण ? कुठे चाललात ?
विद्वान: मला ओळखलं नाही आपण ! मी एक परदेशी  विद्वान आहे.
पहारेकरी: मग इकडे कुठे फिरकलात ?
विद्वान: आलो होतो नशीब आजमवायला तुमच्या राज्यात. महाराजांना भेटायचं आहे.
पहारेकरी: परवानगीशिवाय नाही भेटता येणार तुम्हाला.
विद्वान: मग घ्या परवानगी. कुणी एक परदेशी विद्वान आला आहे. तुमची भेट घेऊ इच्छितो म्हणावं.
पहारेकरी: मी परवानगी घेऊन येतो महाराजांची. तोवर तुम्ही इथेच थांबा.(आत जाऊन.) महाराज, आपल्याला भेटायला कुणी परदेशी विद्वान आले आहेत.
महाराज : परदेशी विद्वान आलेत का ! द्या पाठवून आत.
पहारेकरी: चला,महाराजांनी आपल्याला आत बोलावले आहे.
विद्वान: (आत जाऊन.)महाराजांचा विजय असो !
महाराज : आपला परिचय ?
विद्वान:आम्ही परदेशी विद्वान आहोत. जगातल्या मोठ-मोठ्या राजदरबारात जाऊन आपल्या विद्वत्तेची चमक दाखवत असतो

13

आणि  विद्वानांना  भेटत  असतो.
महाराज : वाह ! फार छान ! मग दाखवा येथेही आपल्या बुद्धिमत्तेची चमक. आम्ही  आमच्या  विद्वानांना  सभेत  बोलावतो.
विद्वान: आम्ही तीन प्रश्न घेऊन आलो आहोत. पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपल्या विद्वानांनी दिले तर, त्यांना शंभर सुवर्णमोहरा आणि आपल्याला शंभर सुवर्णमोहरा बक्षीस मिळेल; मात्र उत्तर नाही मिळालं, तर तुम्ही 200 मोहरा द्यायला हव्यात आम्हाला .
महाराज : मंजूर .
प्रधानजी: मग आमचे विद्वान काय कमी आहेत का !  होऊन  जाऊ द्या
मुकाबला.
विद्वान: काही  हरकत  नाही  केव्हा  सुरू  करायचा  मुकाबला ?
महामंत्री: चांगल्या कामाला वेळ कशाला . उद्या सकाळीच आम्ही आमची  विद्वान  सभा  बोलावतो.
विद्वान: ठीक आहे.
महाराज : प्रधानजी  या  पाहुण्यांची खानपानाची आणि राहाण्याची उत्तम  व्यवस्था  करा.
प्रधानजी: होय  महाराज.
विद्वान: धन्यवाद ! महाराज.

प्रवेश सहावा
(स्थळ:रंगमंच. पात्रे:बोका व खोका प्रवेश करतात.)
बोका व खोका: नमस्कार ! नमस्कार  !! नमस्कार!!!
बोका: तर मंडळी विद्वानांचा राजवाड्यात प्रवेश झाला. त्यांनी आपले

14

प्रश्न विचारले. राजवाड्यातील एकाही विद्वानाला त्या प्रश्नाची उत्तरे सापडली नाहीत आणि सांगताही आली नाहीत .
खोका: मात्र बारीकराव  नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोराने या तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिली आणि बक्षिसे पटकावली. त्यांना उत्तर काय दिली ? कशी युक्ती केली ? हे पाहण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष राजवाड्यात जायला हवं.
बोका: चला तर मग. पाहू या काय काय घडतंय.

प्रवेश सातवा
(स्थळ:राजवाडा. पात्रे:बारीकराव   नावाचा  शेतकरी  शेताकडे  जाता - जाता  पहारेकऱ्याकडे चौकशी  करतो.)
बारीकराव  : राजवाड्यावर खूप गर्दी  दिसते आज ?
पहारेकरी: एक परदेशी  विद्वान आले आहेत.
बारीकराव :असं का ! काय म्हणणं आहे त्यांचं ?
पहारेकरी: ते आपल्या दरबारातील विद्वानांना प्रश्न विचारणार आहेत.
बारीकराव  : हो का ! काय म्हणतात ते ? आत जाऊनच पाहातो.
महामंत्री: महाराज, दरबार पूर्ण भरलेला आहे विद्वानांबरोबरच अनेक बुद्धिमान  जमा  झाले आहेत.
प्रधानजी: तेव्हा चर्चा करायला परवानगी द्या.
महाराज : समस्त विद्वजन हो ! या परदेशी विद्वान महाराजांबरोबर चर्चेला सुरुवात होत आहे. ते एक प्रश्न विचारतील. त्याचे उत्तर तुम्ही द्यायला हवं.
महामंत्री: लक्षात ठेवा. प्रश्नाचे उत्तर दिलं तर बक्षीस मिळेल पण नाही

15

दिले तर… महाराजांना दुप्पट दंड सोसावा लागेल .
महाराज : हो, आपल्या राज्याची लाज राखणं. आता तुमच्या हातात, परदेशी  विद्वान  महाराज, सांगा  तुमचा  पहिला प्रश्न.
विद्वान: हे पहा, माझ्या हातात एक छोटीशी  बांबूची काठी आहे. तिचा अर्धा भाग लाल रंगाने रंगवलेला आहे आणि अर्धा हिरव्या रंगाने. या काठीचा बुडका कोणता ? आणि शेंडा कोणता ? हे तुमच्या  विद्वानांनी  ओळखून दाखवायचे आहे.
महामंत्री: फारच सोपा प्रश्न. आमचे विद्वान चुटकीसरशी सोडवतील.
विद्वान: तसे झाले तर आम्हाला खूप आनंद होईल, पण लक्षात ठेवा. आजवर अनेक देश फिरून आलो. एकाही देशातील विद्वानाने तिन्ही  प्रश्नांची अचूक उत्तरे  दिलेली  नाहीत.
प्रधानजी: हो  पण आमचे  विद्वान  तुमच्या  प्रश्नांना  उत्तरं  शोधतील.
महाराज : नक्की  शोधतील.
महामंत्री: आणि  बक्षीसेही  मिळवतील.
महाराज : बोला, आपला  पहिला  प्रश्न  पुन्हा  एकदा सांगा.
विद्वान: हे पहा माझ्या हातात एक छोटीशी  बांबूची  काठी आहे तिचा
अर्धा भाग लाल रंगाने रंगवलेला आहे आणि अर्धा हिरव्या रंगाने. या काठीचा बुडका कोणता ? आणि शेंडा कोणता ? हे तुमच्या  विद्वानांनी  ओळखून  दाखवायचे आहे.
(दरबारी, मंत्री, महाराज त्या काठीची  पाहणी  करतात. दरबारी  विद्वानांना काठी  दाखवून विचारतात.)
दरबारी: तुम्ही पाहा… नाही ओळखत…! तुम्ही पाहा… तुम्हाला नाही ओळखत…!! तुम्ही पाहा… तुम्हाला पण नाही ओळखत…!!!

16

प्रवेश आठवा
(स्थळ:बारीकरावाचे घर. पात्रे: बारीकराव व आजोबा)
बारीकराव : आजोबा, तुम्हाला काही त्रास नाही ना झाला ?
आजोबा: नाही बाळ. काही त्रास नाही  झाला. मात्र महाराजांचे शिपाई एकदा येऊन फेरी मारून गेले असावेत. असं वाटतंय.
बारीकराव:शिपाई हजार फेऱ्या मारू देत.त्यांना काहीच कळणार नाही.
आजोबा: शेतातली  काही  खबर ?
बारीकराव : हो आहे ना ! आपल्या शेतातील ज्वारी तयार झाली आहे असं मला वाटतं.
आजोबा :  उद्या   येताना   ज्वारीची   दोन   कणसं   ये   घेऊन.  मी
बघितल्याबरोबर सांगतो. कापणीला अजून किती अवकाश आहे  ते.
बारीकराव : बरं, येईन घेऊन. आजोबा आज किनई राजवाड्यासमोर खूप गर्दी  दिसत  होती.
आजोबा: कशामुळे गर्दी  दिसत  होती ?
बारीकराव:मी पाहिलं आत जाऊन.तिथं एक परदेशी विद्वान आले होते.
आजोबा: परदेशी  विद्वान आले होते ? ते कशासाठी ?
बारीकराव : आपल्या राज्यातील विद्वानांची  परीक्षा घ्यायला.
आजोबा: मग काय झालं ?
बारीकराव : त्या विद्वानांनी  एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देईल त्यास 100 सुवर्णमोहरा आणि महाराजांना 100 सुवर्णमोहरा देणार होते ते विद्वान.मात्र आपल्या  महाराजांकडील एकाही  विद्वानाला  त्या  प्रश्नाचं  उत्तर  देता  आलं  नाही.

17

आजोबा: तू ऐकलास का प्रश्न ?
बारीकराव : हो ऐकला.
आजोबा: काय होता प्रश्न ?
बारीकराव : त्या विद्वानांनी  महाराजांकडे एक छोटीशी  बांबूची काठी दिली होती . काठीचा अर्धा भाग लाल आणि अर्धा भाग हिरवा होता.त्या काठीचा शेंडा कोणता ? आणि बुडका कोणता आहे ? ते ओळखायचे होते. मी  म्हणालो, ‘या प्रश्नाचे उत्तर मी देईन, पण उद्या सकाळी.’
आजोबा: मग देणार उत्तर ?
बारीकराव : आजोबा, माझी चेष्टा करता काय ! मी  तुमच्या भरवशावर  उत्तर  द्यायचं  कबूल  केलंय.
आजोबा: अस्सं  होय.
बारीकराव : सांगा  ना ! या  प्रश्नाचे  उत्तर.
आजोबा: हो, पण कानात. भिंतीला सुद्धा कान असतात. (कानात उत्तर सांगतात.)
बारीकराव : हो हो आजोबा. अगदी  तसंच सांगतो. चला जेवण आटोपून घेऊ. रात्र बरीच झालीय.

18

प्रवेश नववा
(स्थळ: राजवाडा. पात्रे: दरबारी,महाराज , महामंत्री, प्रधानजी बारीकराव  प्रवेशतो.)
पहारेकरी: या बारीकराव, या. दरबारात आपलीच प्रतीक्षा आहे.
बारीकराव : होय का !
पहारेकरी: चला थेट दरबारात. (दरबारात जातो.)
बारीकराव : महाराजांचा विजय असो !
महाराज : या बारीकराव, या. सांगा आपलं उत्तर.
बारीकराव : महाराज त्यासाठी  एक काचेचं भांडं हवं आहे.
महाराज : (टाळी  वाजवून.) कोण आहे रे तिकडे ? दरबारी एक काचेचं भांडं हवं आहे.
दरबारी: जी  महाराज.
(आत जाऊन काचेचं भांडं घेऊन येतो. समोरच्या स्टुलावर ठेवतो.)
बारीकराव : ते भांडं काठोकाठ पाण्याने भरायला हवं.
महाराज : दरबारी !( दरबारी  भांडं काठोकाठ पाण्याने भरतो.)
बारीकराव : महाराज आता ती आपल्या हातातील काठी  त्या भांड्यात
हळूच टाका.
(महाराज काठी  भांड्यात टाकतात. काठीचा हिरवा भाग वर व लाल भाग खाली  जातो. ती तरंगत राहते. विद्वान चकीत होतो.)
हे पहा विद्वान महाशय आपल्या प्रश्नाचे उत्तर. काठीचा हिरवा भाग वर आला आहे व लाल भाग खाली  राहिला आहे. म्हणजे हिरवा भाग शेंड्याचा आणि लाल भाग बुडक्याचा आहे.
विद्वान: अगदी बरोबर. ह्या घ्या आपल्या शंभर मोहरा. महाराज ह्या घ्या

19

आपल्या शंभर मोहरा. (मोहरा घेतात.)
बारीकराव : महाराज, या मोहरा घेऊन मी काय करू ? मी चाललोय शेतावर. ठेवा आपल्याकडेच.
महाराज : महामंत्री, या मोहरा ठेवा आपल्या खजिन्यात. त्यांना हव्या तेव्हा द्या.
महामंत्री: ठीक आहे महाराज. (मोहरा घेतात.)
बारीकराव : येतो मी महाराज.
महाराज : हो, आज बारीकरावाने दरबारावी  लाज  राखली.
प्रधानजी: होय महाराज.

प्रवेश दहावा
(स्थळ: रस्ता. पात्रे: वाटसरू-1 व 2)
वाटसरू-1: अहो, पाहिलंत का ?  त्या चिमुरड्यानं कसे झकास उत्तर दिलं ते.
वाटसरू-2: हो तर. सारा दरबार बोटात तोंड … नाही तोंडात बोटे घालून पाहात होता. मला वाटतं काहीतरी  गडबड आहे.
वाटसरू-1: गडबड आणि कशाची ?
वाटसरू-2: भलेभले विद्वान थकले पण मग या चिमुरड्यानं  कसं उत्तर दिलं असेल !
वाटसरू-1: अहो , तो शिकलेला मुलगा .
वाटसरू-2: शिकलेला ? मग शेती कशी काय करतो ? आणि ती ही उत्तम ? म्हणून काहीतरी  गडबड वाटते.
वाटसरू-1:तसं काही नाही हो.शाळेत शिकला असेल.पाण्यात बुडणारा

20

पदार्थ आपल्या आकारमानाइतके पाणी बाजूला सारतो.
वाटसरू-2: आणि तरंगणारा पदार्थ आपल्या वजनाइतके पाणी  बाजूला सारतो. बघू आता. आजच्या प्रश्नाचं काय होतं ते.
वाटसरू-1: चला. दरबार भरला असेल.
वाटसरू-2: चला. चला.

प्रवेश अकरावा
(स्थळ: रंगमंच. पात्रे: बोका व खोका प्रवेश करतात.)
बोका व खोका: नमस्कार ! नमस्कार  !! नमस्कार!!!
बोका: तर मंडळी  बारीकरावानं पहिल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर तुम्ही पाहिलंत. विद्वानांनी दुसऱ्या दिवशी दुसरा प्रश्न विचारला.मात्र
राजवाड्यातील एकाही विद्वानाने त्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही. बारीकरावानंच त्याही  प्रश्नाचे दिले.
खोका: अहो प्रश्न काय होता ते तरी सांगा. काल मी बाळंतपणाला गेलो होतो. त्यामुळं दरबारात हजर राहता नाही आलं.
बोका: बाळंतपण ? आता ? या वयात ?
खोका: शेतातल्या म्हैशीचं  हो.
बोका: मग तसं म्हणा ना.
खोका: बरं , ते राहू दे. कालची  खबर सांगा अगोदर.
बोका: काल त्या विद्वानांनी  प्रश्न म्हणून एक चेंडू आणला होता.
खोका: अरे काय क्रिकेटची मॅच ठरली काय ?
बोका: दुसरा प्रश्नच त्या चेंडूवर आधारित होता ना !
खोका: असं का ! पण प्रश्न काय होता ?

21

बोका:प्रश्न असा होता.त्या लाकडी चेंडूला दोन बाजूला दोन छिद्र होती.
खोका: अरे, चेंडू होता की रफूचक्कर होतं.
बोका: चेंडूच होता.
खोका: बरं मग ?
बोका: सुईसारखे  कोणतेही  साधन न घेता त्या चेंडूच्या  छिद्रातून रेशमी दोरा आरपार ओवायचा होता.
खोका: बापरे ! मला तर सुई घेऊनही  त्या चेंडूच्या  छिद्रातून रेशमी दोरा आरपार ओवायला येणार नाही .
बोका: तुला सुईत दोरा ओवता येणार नाही,मग चेंडूची  गोष्ट तर फार दूर
खोका: असू दे बाबा. पुढं काय झालं सांग.
बोका: याही  प्रश्नाचं उत्तर आज सकाळी  बारीकरावानंच  दिलं.
खोका: वा रे बहाद्दर ! याला म्हणायचा खरा विद्वान.पण उत्तर दिलं म्हणजे नेमकं काय केलं ?
बोका: बारीकरावांने घरातून येतनाच दोन वस्तू आणल्या होत्या.
खोका: त्या आणि कोणत्या वस्तू ?
बोका: तू विचार करून बघ.(खोका डोके खाजवतो.)काय करतोयस ?
खोका: डोके खाजवतोय
बोका: आपल्याकडं जी  वस्तू नाही ती कशी  खाजवतोस ?
खोका: बोक्या, नाद करायचा नाही आपला बरं का !
बोका: तुझा नाद कशाला करावा बाबा.
खोका: बरं  राहू  दे ते. बारीकरावानं  कोणत्या  दोन  वस्तू  आणल्या होत्या ? आणि त्यांचं  काय  केलं ? ते तरी सांग.

22

बोका: त्यानं आपल्या खिशातून एक छोटी  मधाची बाटली आणि एक मोठा काळा मुंगळा आणला होता.
खोका: मुंगळा म्हणजे मुंगीचा भाऊ ?
बोका: भाऊ  नाही  काही, मुंगीचा बाप.
खोका: मग काय केलं ?
बोका: त्यानं  त्या चेंडूच्या एका छिद्राजवळ  आपल्याकडील मधाच्या
बाटलीतला थोडा मध लावला आणि मुंगळ्याच्या पायाला तो रेशमाचा धागा बांधला.
खोका: याला म्हणायची आयडीयाची  कल्पना.
बोका: तो मुंगळा चेंडूच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या छिद्राजवळ ठेवला.
खोका: मधाच्या वासानं मुंगळा पुढे-पुढे सरकत गेला.
बोका: मुंगळा पहिल्या छिद्राजवळ येताच त्याच्या पायाचा रेशमाचा दोरा सोडून घेतला.
खोका: आणि चेंडू गरगर फिरवून दाखवला. मला वाटतंय जर त्याने दोन मुंगळे आणले असते, तर हे काम अजून लवकर झालं असतं
बोका: ते कसे काय बुवा ?
खोका: जर दोन मुंगळे आणले असते तर, त्या दोन मुंगळ्यांची  मधाच्या वासानं शर्यत लागली असती. त्यातला माझ्यासारखा हुशार मुंगळा भरभर धावत पुढे गेला असता जिंकण्यासाठी.
बोका: बस कर तुझं रामायण. प्रेक्षकांना नाटक बघायचं आहे. तुझा तमाशा नाही बघायचा.

23

प्रवेश बारावा
(स्थळ: राजवाडा. वेळ:संध्याकाळची. पात्रे: दरबारी, महाराज , महामंत्री, प्रधानजी . बारीकराव  प्रवेशतो.)
पहारेकरी: या बारीकराव.
बारीकराव : बापरे ! आज इतकी गर्दी !
पहारेकरी: हो, आजचा प्रश्नच तसा गंभीर आणि मजेशीर आहे.
बारीकराव : काय आहे आजचा प्रश्न ?
पहारेकरी: पाहा आत जाऊन.
बारीकराव : (आत जातो.) महाराजांचा विजय असो.
महाराज : या बारीकराव.
विद्वान : तर हा माझा आजचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न. या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या विद्वानांनी दिले तर त्यांना तीनशे सुवर्णमोहरा आणि आपल्यालाही तीनशे सुवर्णमोहरा बक्षीस मिळेल; मात्र उत्तर नाही मिळालं तर तुम्ही 600 मोहरा द्यायला हव्यात आम्हाला. मला आज आपल्या विद्वानांनी राखेची दोरी तयार करून दाखवायची आहे. राखेची दोरी ! हाच प्रश्न
(सर्वजण चुळबुळ करतात.)
महाराज : बारीकराव, द्या उत्तर .
महामंत्री: द्या म्हणजे काय ! देणारच.
प्रधानजी: मग ! पठ्ठा कोणाचा आहे !
महाराज : अभिमान आहे आम्हाला . द्या उत्तर .
बारीकराव : जरूर, पण आज नाही. उद्या सकाळी.
विद्वान : उद्या सकाळी  तर, उद्या सकाळी.

24

प्रवेश तेरावा
(स्थळ: बारीकरावाचे घर. पात्रे: बारीकराव व आजोबा.)
बारीकराव : आजोबा , ही  बघा ज्वारीची  कणसं.( कणसं देतो.)
आजोबा:हं अजून चार दिवसांचा अवकाश आहे ज्वारी  तयार व्हायला.
बारीकराव : आजोबा !
आजोबा: बोल बाळ.
बारीकराव : मग चार दिवसांनीच कापणी करू.
आजोबा: आज राजवाडयावर गेला होतास का ?
बारीकराव: हो, गेलो होतो, आजचा  प्रश्न खूपच कठीण वाटतोय मला.
आजोबा: काय आहे आजचा  प्रश्न ?
बारीकराव:आजोबा, विद्वानांनी  राखेची  दोरी तयार करून दाखवायची आहे. राखेची दोरी !
आजोबा: मग त्यात काय अवघड आहे ! राखेची दोरी तर राखेची दोरी.
बारीकराव : आजोबा , सांगा ना मला कशी बनवायची राखेची दोरी.
आजोबा: बाळ हा आजचा प्रश्न तुला खूप काही मिळवून देणार आहे. पण एक गोष्ट  मात्र विसरू  नको. महाराजांचा हा नवा कायदा तुला आज मोडून काढायला हवा.
बारीकराव : आजोबा , तुम्ही मला आजच्या प्रश्नाचं उत्तर सांगा मग बघतो मी नवा कायदा कसा मोडून काढायचा ते.
आजोबा: अरे आहे काय त्यात. एकदम सोपे उत्तर.
बारीकराव : मला सांगा ना !
आजोबा: अगोदर एक सूती कापडाची  सुंभासारखी दोरी तयार करून
घ्यायची . ती दोरी  गोड्या तेलात भिजवायची आणि द्यायची

25

पेटवून. राखेची दोरी तयार. म्हणतात ना, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही .
बारीकराव : आजोबा, काय झक्कास आयडिया आहे हो तुमची . मी नक्की उद्या दरबार जिंकणार आणि तुमचं स्वप्नही  साकारणार.
आजोबा: बराच वेळ  झाला आहे. चला जेवण उरकून घेऊ. तुला या
प्रश्नाच्या उत्तरावी  तयारी  करायची आहे.

प्रवेश चौदावा

(स्थळ: रंगमंच पात्रे: बोका व खोका.)
खोका: मंडळी, हा अखेरचा प्रवेश.
बोका: सारं  कोडं उलगडणार आणि बारीकराव महाराजांचा नवा कायदा कसा मोडून काढणार ते आज बघायला मिळणार .
खोका: अ हं, आणखी  एक  मजा आहे. मी नाही सांगणार .
बोका: ती तुम्ही प्रत्यक्षच बघा रंगमंचावर
खोका: चला तर मग पाहूया … विद्वानांच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर.

प्रवेश पंधरावा

(स्थळ: दरबार पात्रे: आजोबा  सोडून सर्व.)
पहारेकरी: होशियार, बा आदब, बा मुलाहिजा, आपल्या विश्राम नगरीचे महाराज  सदानंददेव दादासाहेब विश्राम दरबारात हजर होत आहेत. (महाराज , प्रधानजी  व  महामंत्री  प्रवेशतात.)
दरबारी: आज  बारीकराव  विद्वानांच्या  शेवटच्या  प्रश्नाचं  उत्तर  देणार  हो ऽऽऽ 

26

महाराज : बारीकराव, झाली ना तयारी ?
बारीकराव : होय महाराज.
प्रधानजी : पहारेकरी, आज हा अखेरचा फैसला पाहायला जे जे लोक
येतील. त्या सर्वांना राजवाडयात प्रवेश द्यावा.
पहारेकरी : होय प्रधानजी.
महामंत्री : आणि दरबाराच्या  रिवाजाप्रमाणे  या आनंदाच्या  दिवशी
जनतेलाही काही खास भेट  मिळू दे.
महाराज : हो ! नक्कीच मिळणार खास भेट .
प्रधानजी : महाराज, कामकाजाला  सुरवात करू या का ?
महाराज : हो ! विद्वान महाशय ! आपली इजाजत.
विद्वान : होय महाराज, इजाजत आहे.
महाराज: बारीकराव ! आता वेळ कशासाठी ! होऊन जाऊ द्या फैसला
बारीकराव: महाराज आपणास व या दरबारातील सर्व विद्वानांना अभिवादन करून मी हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सादर करतो.
(आपल्या हातातील लाल कापड झाकलेली पेटी दरबारीकडे देतो.)
महामंत्री : आज बरीच खबरदारी घेतलेली दिसते !
महाराज : बारीकराव !
बारीकराव: महाराज, आपण  स्वत:च  ते लाल कापड उघडून विद्वानांच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सर्वांसमोर पेश करावं अशी आपणास माझी विनंती आहे.
(दरबारी हातातील लाल कापड झाकलेली पेटी महाराजांकडे देतो. महाराज हळूहळू कापड उचलतात. काचेच्या भांड्याखाली झाकलेली राखेची दोरी बघून सर्वजण चकीत होतात. टाळ्या वाजवतात. )

27

महाराज : बारीकराव ! आम्हाला यात आनंद आहे आणि आपला अभिमानही आहे.
महाराज : बारीकराव ! झिंदाबाद !!
प्रधानजी : वा ! वाह !!  वाहवा !!!
महामंत्री : लई भारी.
पहारेकरी : दरबारातील नवे विद्वान बारीकराव ! यांचा विजय असो.
(सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवतात. )
विद्वान : (आनंदाने टाळ्या वाजवून. )  या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तरही आपल्या बारीकरावांनी अचूक दिले. ते मानकरी ठरले. या त्या बक्षिसाच्या तीनशे सुवर्णमोहरा आणि महाराजांच्याही या तीनशे सुवर्णमोहरा.
(बारीकराव व दरबारी  सुवर्णमोहरांच्या थैल्या स्वीकारतात. दरबारी सुवर्णमोहरांची थैली महाराजांकडे देतो. ते स्वीकारतात.)
महाराज : बारीकराव ! आज तुम्ही आमच्या फक्त तीनशे सुवर्णमोहरा नाही  वाचवल्या; तर दरबाराची  इज्जत राखलीत, शान वाढवलीत.  अभिनंदन !
महामंत्री : अभिनंदन ! अभिनंदन !! त्रिवार अभिनंदन !!!
विद्वान : फक्त अभिनंदन करून नाही भागणार महाराज. त्यांचा उचित
सन्मानही व्हायला हवा.
महाराज : हो तर ! सन्मानही होणार.
बारीकराव : महाराज, याही सुवर्णमोहरा ठेवा आपल्याकडेच.
(सुवर्णमोहरांची थैली दरबारीकडे देतो.)
वाटसरू-1 : महाराज, मला एक शंका आहे.

28

महाराज : कोण आपण ? आणि आपली शंका कोणती ?
वाटसरू-1 : महाराज, मी एक वाटसरू आहे. माझी शंका अशी आहे की, बारीकरावांचं वय लक्षात घेता त्यांनी या प्रश्नाची उत्तरे…
महाराज : बोला आपण. स्प्‍ाष्टच बोला.
वाटसरू-1 : महाराज, या प्रश्नाची उत्तरे त्यांना कोणीतरी सांगितली
असावीत.
महाराज : बारीकराव ! काय म्हणताहेत वाटसरू ?
विद्वान : पण आमचा काही आक्षेप नाही. कुणीही  जन्मजात शहाणा नसतो. ग्रंथामधून वाचनानं, विद्वानांच्या व्याख्यातून आणि अनुभवातूनच शहाणपण मिळतं.
बारीकराव : महाराज, क्षमा असावी आणि आपण मला अभय द्यावं.
महाराज : बारीकराव ! क्षमा आणि अभय दिलं. बोला. 
बारीकराव : महाराज, मी लहान असतानाच माझे आईबाप प्लेगच्या साथीने वारले. तेव्हापासून माझ्या आजोबांनी माझा सांभाळ केला. खूप उपकार आहेत त्यांचे माझ्यावर.
महाराज काही दिवसापूर्वी आपण साठ वर्षांच्या वरील वृद्ध लोकांना राज्याबाहेर हाकलून द्यायचा हुकुम सोडला पण तो हुकुम  मी  मानला  नाही, कारण  माझे आजोबा  माझ्यासाठी सर्वस्व होते. मी माझ्या घरात एक तळघर तयार केले. त्याला हवा व उजेड येण्यासाठी दोन छोट्या खिडक्या तयार केल्या, शिडी तयार केली , त्याच्यावर झाकता येईल असं फरशीचं झाकण तयार केलं आणि या तळघरात आपल्या आजोबांना लपवून ठेवलं.

29

बारीकराव :क्षमा मागून पुन्हा एकदा सांगतो. विद्वानांनी विचारलेल्या तीनही प्रश्नांची अचूक उत्तरं मला माझ्या आजोबांनी सांगितली आहेत. आता माझी आपणास अशी विनंती आहे की,
महाराज हे वृद्ध लोक म्हणजे अनुभवांची खाण असते. व्यवहारातले, शिक्षणातले, शेतातले, समाजातले असे अनेक
नाना प्रकारचे प्रश्न त्यांच्या अनुभवांने चुटकीसरशी सोडवता येतात. आपण  मात्र  कोणाच्यातरी सल्ल्याने सहा  महिन्यापूर्वी  वृद्धाश्रम बंद केले आणि काल परवा राज्यातल्या वृद्ध लोकांना राज्याबाहेर हाकलून द्यायचा हुकूम केला. तेव्हा हा हुकूम मागे घ्यावा आणि पुन्हा वृद्धाश्रम चालू करावेत. त्यामुळे ज्या वृद्ध लोकांना सांभाळणारे आपले हक्काचे मूलबाळ नसेल त्यांना लाजिरवाणे जीवन जगावे लागणार नाही. वृद्धाश्रमात त्यांच्या म्हातारपणाचा काळ आनंदात जाईल.
महाराज : प्रधानजी, या परदेशी विद्वानांचा योग्य तो सन्मान करा. मगच त्यांची पाठवणी करा
प्रधानजी : जी महाराज, विद्वान महाशय चलावे आपण.
(प्रधानजी व विद्वान निघून जातात)
महाराज : महामंत्री, बारीकराव आणि वाटसरु ! आज या घटनेने माझे डोळे उघडले आहेत. मी आज आपल्यासमोर या तीन प्रश्नांच्या उत्तराबद्दल तीन नवे निर्णय जाहीर करतो.
महामंत्री :आनंद आहे महाराज बोला. सांगा आपले निर्णय.
महाराज : पहिला निर्णय पूर्वीप्रमाणे आपल्या राज्यात वृद्धाश्रम चालू राहतील. तिथं सन्मानाने वृद्ध  लोकांची  सेवा केली जाईल.

30

आणि ती ही राजकीय खर्चातून.
दुसरा निर्णय ज्या-ज्या लोकांनी आपल्या राज्यातून घरातील  म्हातार्‍या-कोताऱ्यांना  बाहेर हाकलले आहे  किंवा परगावी पाठवून दिले आहे. त्या सर्वांनी एका आठवड्याच्या आत आपल्या नातेवाईकांना सन्मानाने परत घेऊन यावे. नाही
तर कोणाचीही गय केली जाणार नाही. सर्वानी आपापल्या आई- वडिलांची सेवा करावी. वृद्धांचा सन्मान करावा. दीनदुबळ्यांचे  पालन करावे.
आणि आमचा तिसरा महत्वाचा निर्णय. आजवर आम्ही हलक्या कानाचे होतो. हे मूर्ख प्रधानजी जसे सांगतील तसा वागायचा प्रयत्न करत होतो. पण आज कळून चुकलं आहे. ते केवळ स्वार्थासाठी काही निर्णय घ्यायला लावत होते. त्यामुळे प्रजेचे खूप हाल होत होते. याची आम्हाला जाणीव झाली आहे. म्हणूनच आम्ही आजपासून या बारीकरावांची प्रधानमंत्री पदावर निवड करत आहोत.
महामंत्री : महाराजांचा विजय असो बारीक रवा चा विजय असो.
(सर्वजण जयजयकार करतात.)
महाराज :बारीक राव आम्ही तुमच्या धाडसाचं कौतुक करतो. पण आमची तुमच्या आजोबांना भेटायची इच्छा आहे. त्यांच्या पायावर डोकं ठेवायची इच्छा आहे. त्यांचे आशीर्वाद घ्यायची इच्छा आहे.
बारीकराव :काही हरकत नाही महाराज. चलावे आपण माझ्या घरी. ते भेटतील आपल्याला.

31

(रंगमंचावर अंधार पसरतो. बोका खोका प्रवेशतात.)
बोका: मंडळी  हे असं आहे नाटक. पाहिलं ना आणि आनंदही झाला ना तुम्हाला !आम्हाला तर खूप आनंद झाला. राजपदावर योग्य आणि लायक व्यक्ती असंल तरच प्रजेचे कल्याण होईल.)
खोका :  विश्राम  नगरीतल्या  लोकांचं कल्याण होवो ! तुमचे भले होवो ! आणि आमचेही  भलं  होवो ! मंडळी  धन्यवाद !


समाप्त










32 

No comments:

Post a Comment