Friday, 26 February 2021

मराठी राजभाषा दिन नव्हे, मराठी भाषा गौरव दिन

मराठी राजभाषा दिन नव्हे, मराठी भाषा गौरव दिन
     अवकाशातील ताऱ्याला ज्यांचे नाव दिले गेले, ज्यांनी मराठी भाषेला दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला आणि ज्यांची कविता रेशनकार्डावर स्लोगनसारखी छापण्यात आली... ते वि.वा शिरवाडकर. त्यांनीच लाडक्या बहिणीचे नाव घेऊन कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण करीत काव्यसरितेचा तरलप्रवाह अखंड ठेवला.
  प्रख्यात कादंबरीकार वि.स.खांडेकर यांच्यानंतर शिरवाडकरांच्या विशाखा काव्यसंग्रहास भारतरत्न सम साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळालेले ते मराठीतील दुसरे लेखक-कवी होत. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी साजरा होतो.
   शिरवाडकरांनी विपुल लिखाण केले. त्यांच्या नटसम्राट या नाटकाने रसिकमान्यता मिळविली. याच नाटकावर नाना पाटेकर अभिनित "असा नटसम्राट होणे नाही" चित्रपट निघाला. एका तुफानाला घर देता का घर । हा नाटकातील संवाद फार गाजला. मानवी जीवनातील कंगोरे या नाटकात मोठ्या खुबीने रंगविण्यात आलेले आहेत. शिरवाडकरांची खरी ओळख कवी म्हणून संबोधली जाते. अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहीजे स्फूर्ति तेवत ठेवण्याचा संदेश त्यांच्या कवितेतून मिळतो. सोप्या भाषेतून ते वाचकांना प्रेरणा देतातही...। म्हणूनच शिरवाडकरांचे साहित्य हे आजही बौद्धिक सामर्थ्य वाढविणारे आहे.
     नवा असे मी
     जुना असे मी
     युगायुगांचे सूत्र असे मी
     या विश्वाच्या असीमतेचा
     पृथ्वीवरचा पुत्र असे मी। ।।
   

No comments:

Post a Comment