Saturday, 14 August 2021

ज्योत_से_ज्योत_जगाते_चलो

ज्योत_से_ज्योत_जगाते_चलो ...!

टोकिओ ऑलिंपिक मधला हा अजून एक प्रसंग.
मैदानावरची खिलाडूवृत्ती किंवा खेळाडुंची एकमेकांची एकमेकांना झालेली मदत हा त्या खेळ भावनेचा आदर असतो. खेळाडू म्हटलं की त्याच्याकडं ती लढवैय्या वृत्ती येतेच. त्यासोबतच खेळभावनाही जागृत होते जी सगळ्यात महत्वाची असते आणि जी सर्व जात, धर्म, पंथ, देश, खंड ओलांडून सर्वत्र पसरते एखाद्या व्हायरससारखीच.
          मात्र हा आजचा प्रसंग आहे तो मैदाना बाहेरचा, खेळाडू आणि सामान्य माणसाच्या वर्तणुकीचा.
          ११० मीटर हर्डल्स मधे सेमी फायनल मधे भाग घ्यायला हांस्ले पार्चमेंट ( Hansel Parchment ) हा जमैकाचा खेळाडू निघाला. कानात हेडफोन घालून, गाणी ऐकत तो खेळाडूंना घेवून जाणाऱ्या बसमधे बसला. इच्छित स्थळी ती बस पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण ट्रॅक ॲंड फिल्ड ऐवजी कुठल्यातरी भलत्याच मैदानात पोहोचलोय.
          अधिक चौकशी अंती त्याला समजलं. 'आता तिथून परत जाउन नवीन बस घेईपर्यंत त्याला उशीर होईल पोहोचायला आणि तो स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही हे नक्की.
          चौकशी करत असतानाच तिथे काम करत असलेल्या एका स्वयंसेवक मुलीनं तो "टॅक्सीनं थेट तिथं पोहोचला तर वेळेत पोहोचेल" असं सांगितलं.
          याच्याकडं ना टॅक्सीला पैसे ना काही माहिती. त्या मुलीनं याला टॅक्सी बुक करुन दिली आणि त्यासाठी लागणारं भाडंही दिलं. आणि हे महाशय स्पर्धेत वेळेत सहभागी झाले. सेमी फायनलला दुसरा आला आणि फायनला चक्क सुवर्णपदक पटकावलं त्यानं.
         कहाणी इथंच संपत नाही.
          हे सर्व झाल्यावर आपल्या या यशात त्या मुलीचा मोलाचा वाटा आहे हे त्याच्या मनात पिंगा घालतच होतं आणि  याची त्यानं आपल्या मनाशी खूणगाठ बांधून ठेवली होतीच. 
    हा परत तिच्या शोधार्थ त्या स्टेडियममधे गेला, त्या मुलीला शोधुन काढलं आणि ओळखलं का मला? विचारलं. तिनेही ओळखलं आणि मग याने त्याच्या बॅगेतून आपलं सुवर्ण पदक काढून तिला दाखवत म्हणाला, "हे फक्त तुझ्यामुळं मला मिळू शकलंय, तू मला त्या दिवशी मदत केली नसतीस तर हे मला मिळू शकलं नसतं."असं म्हणत त्याने ते सुवर्ण पदक तिच्या हातात दिलं. आनंदानं ती हरखून गेलेली असतानाच त्याने तिला तिचे पैसे परत केले आणि  एक टी शर्ट भेट म्हणून दिला आणि धन्यवाद देत आपली कृतज्ञता व्यक्त केली.
          वस्तुत: त्या मुलीच्या कामात हे येत नव्हतं, तरी त्याच्यासाठी  थोडंसं आपल्या कामापलिकडं, अधिकारापलिकडं माणुसकीच्या भावनेतून केलेलं काम या जमैकन माणसाच्या आयुष्यात सुवर्णक्षण निर्माण करणारं ठरलं. ते दोघेही एकमेकांना ओळखत नव्हत. ना एका देशातले, ना भाषा एक; पण माणुसकी आणि परोपकार या दोन धाग्यात बांधली गेलेली ही दोन माणसं नकळत एक धडा समस्त जगाला शिकवून जातात. 
        आपली एक छोटीशी, नकळत केलेली चांगली कृती कोणाच्या तरी आयुष्याला सकारात्मक दिशा देऊ शकते, कोणाचं आयुष्य बदलु शकते, आनंद देऊ शकते. 
        आपल्यामुळं आपल्या कार्यक्षेत्राबाहेरचं थोडसं काम कोणाचं होत असेल तर ते करण्यात जरूर मदत करावी.
Walking an extra mile हे सूत्र या मुलीनं पाळलं आणि त्यानेही तिला शोधून आभार मानून  दाखवूनही दिलं... की चांगलं वागायला पद, पैसा, प्रतिष्ठा लागत नाही आणि असली तरी ती आड न येता सामान्यातल्या सामान्य माणसाला तुम्ही आनंदी करु शकता. 
प्रत्येकाकडं देण्यासारखं काही ना काही असतं ते मुक्त मनानं द्यावं सतत म्हणुन 

#दत्ता_हलसगीकर यांचं काव्य आठवलं 

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करुन भरुन घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे

- साभार

No comments:

Post a Comment