Sunday, 22 August 2021

कविता


.     *कविता*
प्रश्नातील रिकामी जागा 
तशी कविता
पूरक आणि अनिवार्य
भाषेतील सौंदर्य, गोडवा
विज्ञानातील कार्यकारणभाव
गणितातील उकलसंच
इतिहासातील घटनाक्रम
भूगोलातील स्थलदर्शन
अध्यात्मातील गुढगुंजन
तर्कशास्त्रातील अचूक तत्त्व
संसारातील नात्यांची वीण
शाळेतील खेळकर बालपण
आणि बरंच काही
देऊन जाते.
ती सार्वजनिक अभिव्यक्ती असते
कधी चिंतनशील
कधी चर्चात्मक
तर बऱ्याचदा
आतल्याआत घडलेला संवाद
अनुत्तीर्णतेचं भय
नसतंच कधी मुळी
आणखी एक बरं
हे प्रश्न तपासून 
कुणी किती गुण दिले
याची नसते चिंता

झऱ्यातून पाझरणाऱ्या प्रवाहासारखी 
सखल भागाकडे जाताना
जीवनाच्या वाटेतले खाचखळगे
भरून पुढे जाते.
पावसाळ्यात वाहणाऱ्या
पाणलोटाइतकी गढूळ होऊ नये 
ही काळजी घेतच राहीन
*रमेश*

No comments:

Post a Comment