*◼️थोडक्यात माहिती*
*🔰अष्टाक्षरी काव्य रचना*
*चार* ओळींचे कडवे
प्रत्येक ओळीत *आठ* अक्षरं
ओळीची सुरुवात *सम* अक्षर असलेल्या शब्दाने.
सम शब्द म्हणजे- *दोन* *चार* आणि *सहा* अक्षरांचा एक शब्द.
रचना *आशयघन* असावी.
एका कडव्यात सम यमक नको.
महत्त्वाचे म्हणजे-- अष्टाक्षरीत *यमक* व *स्वरयमक*( उच्चार यमक) साधलं जावं.
उदा-
*श्रावणाच्या सरीसंगे*
*प्रीत बहरली मनी*
*इंद्रधनू उगवतो*
*रंग सुंदर जीवनी*
यात पहा- दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधलं गेलं. *नी* हे यमकाक्षर आहे. व *म* आणि *व* हे स्वरयमक किंवा उच्चार यमक आहे.◼️
यमकाचे एवढे प्रकार आहेत हे कधी ऐकले पण नव्हते. नवीन कळले म्हणून पाठवतोय.
'श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि *माराया|*
*मा राया* जनकाची होय सुता त्रिजगदाधि *साराया|*
*सारा या* प्रभुची हे लीला गाती सदैवही *सुकवी|*
*सुकवी* भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|'
(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.)
कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. थोडक्यात इथे मांडत आहे.
*१) एकाक्षरी यमक:*
एक्या पदे भूमि भरोनि थोडी
दुजा पदे अंडकटाह फोडी
(डी ला डी हे एकाक्षरी यमक)
*२) द्व्यक्षरी*
दे तीसरा पाद म्हणे बळीला
म्हणोनी पाशी दृढ आकळीला
(ळीला हे द्व्यक्षरी)
*३) त्रयाक्षरी यमक*
तो निरोप मजला
आस्थेने कळवितो
मी तसाच लिलया
अश्वाना वळवितो
*४)चतुराक्षरी*
बाई म्यां उगवताच रवीला
दाट घालुनि दही चरवीला
त्यात गे फिरवितांच रवीला
सार काढुन हरी चरवीला
(काय अफाट आहे ना हे! प्रत्येक 'चरवीला' वेगळा आशय मांडतो.)
*५) दामयमक
मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा.*
सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात
तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात
*६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.*
सुसंगति सदा घडो... पडो.. झडो... नावडो
*७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.*
वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो
(वाजत गाजत साजत आजत याजत.. अशी गंमत आहे.)
मज मागे मत्स्यांचा हा रिपु - शशि- राहु- बाहु राणा हो
*८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे.*
पायां नमी देइन वंश सारा
पा या न मी दे इनवंशसारा
(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)
*९)समुद्रक यमक*
हेही अफाट प्रकरण आहे. -
अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा
अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा
(हे पृथ्वीपते धर्मा,
*वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?*
अशा यमकांत चमत्कृती असते. पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!
No comments:
Post a Comment