Wednesday, 10 November 2021

विझला दिवा कुलाचा

अंधार पेलताना
वाती विझून गेल्या
थोडे कुठे कवडसे
बाकी कळ्याही मेल्या

आतून पेटताना
जळले शरीर थोडे
सिमेवरी पहारा
देतात लोक वेडे

त्यांच्या घरी दिवाळी
घेऊन काळ आली
आता कुठून यावा
संसार साथ वाली

पणती तरीही दारी
जळते उदासवाणी
ओठांवरी हसू ना
डोळ्यांत मात्र पाणी

विझला दिवा कुलाचा
होती आशा जराशी
घेऊन माय रडते
अस्थी कलश उराशी 
 
माती इमान सांगे
त्याचे चराचराला
देऊन अश्रू दान
गेला घराघराला

© रमेश

No comments:

Post a Comment