कविता
. *आई आणि तिची चोळी*
तिजोरी उघडताच
नेहमी आठवण होते
चार-सहा महिन्यांनी
आईची चोळी
शिवायला शिंप्याकडे जाताना
माझ्या तिच्याशी झालेल्या संवादाची
मामानं भाऊबिजेच्या ओवाळणीवेळी
ताटात घातलेला चोळखण
आणि अंगातून काढलेली चोळी हाती देत
आई म्हणायची,
"बाळ दंडात बोटभर
कमरंला तेवढीच
कमी धरायला सांग.
ठुशीला कापाड
तुमच्याजवळचंच घाला म्हणावं.
शिलाईचं पैसं भांगलणीच्या नायतर घर सारवणाच्या
कामातून वळत करायचंत.
उधारी
वहीत मांडून ठेवायला सांग.
आणि डावा रट्टा उलटा.
माप घेतल्याबरोबर
ही चोळी घेऊन चटकन परत ये."
मी म्हणायचो,
"आई,समदं कळलं.
येतो घेऊन ही चोळी लगोलग
मापानं खण फाडल्यावर,
पण हा *डावा रट्टा उलटा* नाही कळला."
"लेकरा डाव्या हातावर पदर आसतोय.
त्यो दंड दिसत नाही फारसा
दोन तीन दिसानं
चोळी उलटी करून घातली तर
डावा-उजवा हुतोय.
पुन्हा दोन-तीन दिवस घोर नाही."
तरीही तेव्हा काही कळायचं नाही
तरीही मी
*"हं"* म्हणून धूम ठोकायचो शिंप्याच्या दुकानाकडे
मी परत अाल्यावर मापाला दिलेली चोळी हातात घेऊन
"शहाणं माझं बाळ! "म्हणून
आई गालावर बोटं मोडायची,
मुका घ्यायची.
मी खेळायला गल्लीकडे
धूम पळायचो
मापाला दिलेली तीच चोळी
अंगात घालून आई कामावर जायची.
अाता समदं कळतं
रट्टा, ठुशी, उधारी, सारवण, भांगलण, आतला बाहेर आणि
डाव्याचा उजवासुद्धा
सौ.च्या ढीगभर साड्यांच्या
आणि तितक्याच मॅचिंग ब्लाऊजच्या
हप्तोनहप्ते तशाच पडलेल्या
घड्या पाहताना
.
No comments:
Post a Comment