. *पुनर्भेट*
. तशी तिची माझी पहिली ओळख मी चौथीत असताना झाली होती. मी नेहमीप्रमाणे दिवाळीची सुटी अाजोळी मजेत घालवून परतलो होतो. शाळेचे दुसरे सत्र सुरू झाले होते. पण त्या दिवशी बहुधा रविवार होता; त्यामुळं मी घरीच होतो. माझे मोठे मामा तेव्हा मिल्ट्रीमध्ये होते. ते प्रत्येक वर्षी दिवाळीतच मोठ्या रजेवर येत असत. पण त्या वर्षी त्यांना दिवाळीत रजा न मिळाल्यानं ते येऊ शकले नाहीत. साहजिकच भाऊबिजेची ओवाळणी चुकली. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी सुटी मिळाली. रेल्वेतून उतरल्यावर ते कोल्हापूरमध्ये राहात असलेल्या आजोबांकडे रिक्षाने गेले. तिथे सोबतचा बाड-बिस्तरा ठेवला. आंघोळपाणी आटोपले आणि बहिणीला म्हणजे माझ्या आईला भेटायला व ओवाळून घ्यायला आमच्या गावीआले होते तिच्यासोबत.
. मामा घरात आले पण ती मात्र दारातच उभी, दरवाज्याच्या बाजूला भिंतीला टेकून. मामा आल्याबरोबर आईला खूप आनंद झाला. का नाही होणार. मिल्ट्रीतला भाऊ. त्यात त्यावर्षी भाऊबीज चुकलेली. मामा आंघोळपाणी आटोपून आलोय म्हटले तरी आईनं घाईघाईनं मोठं पातेलभर पाणी तापवून दिलं. मामांनी हातपाय धुतले. चहा घेत घेत बहीण भावाची विचारपूस चालली होती. त्यांच्या गप्पा रंगल्या. मला राहवेना. त्यांची नजर चुकवून मी हळूच दारात आलो. ती तशीच मान भिंतीकडे वळवून उभी होती. मी गुपचूप काही न बोलता तिचा हात धरला आणि गेलो फिरायला रस्त्यावर.
. तीही चूप. मुकाट्यानं माझ्यासोबत चालत होती. चालता चालता अचानक कसा माझा पाय सटकला नि मी कोलमडून पडलो. सपशेल आडवा रस्त्यावर. त्या झटापटीत कसा काय तिचा डावा हात माझ्या गालावरून जोरात उजव्या डोळ्याच्या भुवईवर असा काही आदळला. आदळला कसला दणकलाच. खोकच पडली. रक्त भळभळायला लागलं. तिनं काही मुद्दाम नव्हतं मारलं. तसाच उठलो. एक हात कपाळावर एक तिच्या हातात. घरी परतत होतो. तोवर कुणीतरी चुगली केलीच. मला तिच्या हाताच्या दणक्यामुळं जखम झाल्याची खबर घरात पोहोचल्यामुळं आई धावतच बाहेर आली हळदीच्या डब्यासह. पाठोपाठ मामाही. त्यांना थोडं वाईट वाटलं.
. आईनं गरम पाण्यानं भुवईवरची जखम धुतली. त्यात हळद भरली. जखम हळुहळू भरून आली; पण तिच्या माझ्या पहिल्या भेटीची निशाणी अजूनही नाईलाजाने का असेना अभिमानाने कपाळावर मिरवतो. त्यावेळी भरलेला दम आठवतो. "पुन्हा तिच्यासोबत एकटा गेलास तर सांगितलं नाही म्हणशील. कुणाला तरी सोबत घेऊन जात जा."
. त्यानंतर सात-आठ वर्षांनी जेव्हा प्राथमिक शिक्षक म्हणून विक्रमनगर इथं सेवा स्वीकारली तेव्हा आयुष्याची जोडीदारीण म्हणून मी तिचीच निवड केली. जवळ जवळ बारा वर्षे-उणंपुरं एक तप- तिची सुखासीन साथ मला लाभली. जीवनातले तितकेच उन्हाळे-पावसाळे तिच्या सोबतीत व्यतीत झाले. या काळात आम्ही दोघांनी आमची सुखदुःखे वाटून घेतली. अगदी दररोज भेटल्याशिवाय एकमेकास चैन पडायचा नाही.
. कालांतराने नकळत दुरावा निर्माण झाला तो कोल्हापुरातील सेवा सोडून गावी हायस्कूलमध्ये रूजू झालो तेव्हा. तिची भेट दुर्मिळ झाली म्हणण्यापेक्षा भेट झालीच नाही.
. परवा सहज मित्रांजवळ तिचा विषय निघाला. मी तिला भेटायचा मनोदय व्यक्त केला. सगळे उडालेच टणकन. एकटा म्हणालाही,"आत्ता ! या वयात !!" पण माझी अगतिकता मी बोलून दाखविल्यावर त्यांची मूकसंमती मिळाली असं समजून मी भेटीचा निश्चय पक्का केला.
. सौ. निकाडेंना विचारणार व सहमती घेणं महत्वाचं होतं. त्यांनी एकाच वाक्यात सांगितली,"बघा, तुम्हाला झेपत असेल आणि उत्कट इच्छा असेल तर मी काय करणार. पण कुणी नावं ठेवायला नको."
. आईला विचारलं. आई हसून म्हणाली,"आठवण हाय नव्हं पहिल्या भेटीत भुवईवर दणका बसलेली. तुझ्या मनात असेल तर घेऊन ये जा घरला." मग शंभर टक्के निर्णय झाला.
. आज सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठलो. वाढलेले केस कापून आलो. दाढीचेही केस कापून अंगाबरिबर झीरो मशीनने कट मारला. त्यांची चंदेरी झाक लपवावी म्हणून घरातच थोडा काळा रंग लावला, नाही म्हणायला डोक्याच्या पाठीमागील बाजूस रंग लावायला सौची मदत झालीच. आंघोळ करून आरशासमोर उभा राहिलो. जबरदस्त लूक! जाम खूश मीच माझ्यावर!
. मुलं म्हणत होती, 'चार दिवस थांबा.नवीन वर्षात विचार करू. पण मला कुठला तेवढा दम नि धीर. तिला घरी आणायला आईची संमती दिली म्हटल्यावर कधी एकदा भेटेन आणी घरी घेऊन येईन असं झालं होतं.
. दुपारी मोठया मुलग्याबरोबर ती राहात असलेल्या लक्ष्मीपुरीतील घरात गेलो. घरमालक दारातच उभे होते. म्हणाले,"ती हल्ली इथं नाही राहात.सुधारलीय ना!राजारामपुरीत जनता बहार चौकात नवीन घर घेतलंय तिनं. तिथं असते."
. तिथून बाहेर पडलो. पायपीट करत नव्या घरासमोर दहाच मिनिटांत हजर. दारात गेल्याबरोबर चौकशी करताना तिनंच झुणावलं. तेव्हा मनाला झालेला आनंद वर्णन नाही करता येणार.
. नवा घरमालक थोडे आडेवेढे घेत होता पण शेवटी त्याला कटवला. 'उद्या या, परवा या, आज घरी कुणी दुसरं जाणतं नाही.' असं म्हणत होता. शिवाय साडे आठ हजार घरभाडं थकल्याचही कारण पुढं करत होता. शेवटी 'आठ हजार दोनशे देतो, पण तिनं माहेरहून आणलेले दागिने घालावे लागतील' या अटीवर कबूल केला.
. आणि आमची *पुनर्भेट* झाली. आता आयुष्यभर सोबत राहण्यासाठी. साहजिकच तिला भेटायची इच्छा झाली तर या केव्हाही. स्वागताला आम्ही असू दारातच उभयता.
. आपला स्नेही
. *चंद्रकांत निकाडे*
.
.
Monday, 12 February 2018
पुनर्भेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment