*एक नाजूक परी*
चिटुकली चांदणी
एक नाजुक परी
सोन्याच्या पाऊली
आली आमच्या घरी
परीचे रुपडे
फुललेली जाई
खुदुखुदु हसते
नाव तिचे सई
परीच्या गालावर
इवलीशी खळी
हसताना दिसते
मोगऱ्याची कळी
दुडुदुडु चालेल
चिऊच्या मागे
बोबड्या बोलाने
गाव करील जागे
आईची कुशी
वात्सल्याने भरली
आजीच्या कौतुकाने
सीमा नाही उरली
परीशी खेळायला
येणार कुणी कुणी
छकुल्या मैत्रिणी
खेळकर गुणी
परीचा मामा
फिरायला नेई
चाॅकलेट चिंगम
खायाला देई
शू SSSSS आता चूप
दंगा नका करू
झोपेची वेळ तिच्या
झाली आहे सुरू
. *अनुतनय*
No comments:
Post a Comment