. *आकांत*
काळीज कापऱ्या जीर्ण
व्यथांचे गाणे
गळतात मनातील वृद्ध
ऋतुंची पाने
फुटतात किनारी शुभ्र
चांदण्या लाटा
विरतात उन्हाच्या दग्ध
सावळ्या वाटा
निष्काम भ्रमंती गर्द
मनातच नुस्ती
ना ओलाव्याचे झरे
बहरली सुस्ती
मावळते आशा अशा
क्षणांचे ओझे
हे सांग कुणाचे दु:ख
तुझे की माझे
या अनंत रात्री चंद्र
उगवतील कोठे
वासरे हरवली सुन्न
गायी नि गोठे
वळीवाचे वादळ क्रूर
मोडली घरटी
विस्कटली छपरे कृश
उडाली तरटी
कधी अंधारातून सूर्य
शोधतो किरणे
नशिबात कुणाच्या मर्त्य
जिवाचे झुरणे
यावीत अचानक स्वप्ने
होऊन स्वार
धूळदान मनाची गस्त
क्षितिजा पार
वावरते केवळ अस्ती
हळवे भूत
या बनून संघरी तुम्ही
शांतिचे दूत
उरलेली काया दुष्ट
नसावे गाणे
हृदयात अनोखी प्रीत
सोडूनी जाणे
का उसणे घ्यावे ब्रीद
पराधे लोणी
असताना शिल्लक पुष्ट
सुखाच्या गोणी
रातवा पसरला धुंद
गावया धून
सुरकुत्या जाळुनी क्लिष्ट
पुसावी खूण
सांगाडे उठतील जख्ख
अशी द्या हाक
उध्वस्त मनातून गंध
उमटतील लाख
उघडतो कवीचा धर्म
तमातून दारे
वाहू द्या एक चैतन्य
नसातून वारे
हा निरोप नाही उर्मी
घावही वर्मी
ठासवा गड्यांनो(उभय) मर्मी
नि नीज धर्मी
. *रमेश*
No comments:
Post a Comment