Sunday, 15 July 2018

"एस्सर"

*"एस्सर !"*

पहिलीच्या वर्गात हजेरी घेताना
"निशा एकनाथ ... ... ... !"
नाव पुकारताच
एक गोंडस चिमुरडी
उठून उभी राहायची "एस्सर." म्हणत.

दुसरीच्या वर्गात
पहिल्याच दिवशी
हजेरी घेताना नाव पुकारताच थोडी रडवेली होत
जवळ येऊन म्हणाली,
"सर, माझं नाव चुकलंय लिहायला. निशा गुलाब ... ... ... हवंय! "
मी सुन्न.
तरीही म्हटलं, "ठीक आहे, करू दुरूस्त. "

आणि पुन्हा तिसरीच्या सहामाही नंतर तिची तीच तक्रार
'नावात बापाच्या ठिकाणी मायकल लिहा.' अशी

तेव्हाही मी 'हो! बाळा' म्हणालो.

तिचं नाव बदलता आलं हजेरी नावाच्या कागदी तुकड्यावर
नशीब बदलायची हिंमत-ताकद नव्हतीच माझ्याकडे

तिच्या डब्यात
पोळी-भाजी,भाजी-भाकरी
ऐवजी वडापाव,भजी,भडंग किंवा असंच काहीतरी कोरडं असायचं

कधी म्हटलं, "निशा माझ्या डब्यात आज पोळी जास्तय.घे ना तुला एक."
तर म्हणायची, "तुम्ही माझ्या डब्यातला चिवडा घेणार असाल तरच !."

एकदा पालक सभेत बऱ्याच विनंती नंतर
तिची आई आली होती शाळेत
डब्याबद्दल बोलताना
"सांभाळून घ्या निशाला." इतकच बोलली, तेव्हा समजलं तीच निशाची आई.

माझ्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरच्या थिएटरसमोर ती उभी असायची नटूनथटून
एरव्ही रस्त्यावरून जाणारा पुरूष दिसला की त्याला रोखणारी, तिची घायाळ नजर
मी समोरून जाताना
खाली झुकायची

सातवीनंतर निशाची शाळा संपली
माझीही बदली झाली.

आणि परवा
ती मला दिसली
दीड-एक तपानंतर
त्याच रस्त्यावरून जाताना
तिथेच
जिथे तिची आई उभी असायची

तिचीही नजर झुकली.
मी फक्त आठवत राहिलो
"एस्सर ! "
तिच्या कोमल आवाजातील अभिवादन
हताशपणे!

                       *रमेश*

No comments:

Post a Comment