Thursday, 19 July 2018

बंधुप्रेम

*बंधुप्रेम*

त्या दोघांचं बंधुप्रेम आता
शेजाऱ्यांसह गल्ली अन गावातही
जगजाहीर झालंय

रविवारी सकाळी सकाळी
चहा घ्यायच्याही आधी
हमखास फोन करतात.
दिलखुलास गप्पा मारत शेवटी
एकमेकांना निरोप देतात
किती हे बंधुप्रेम !

राम-लक्ष्मण
किंवा भरत-राम फिके पडतील
असं वाटतं त्यांच्याकडे बघून नवख्या माणसाला

परवा तर म्हणे कुठल्याशा मंडळाच्या वाढदिनातील कार्यक्रमावेळी त्यांचे नाॅमिनेशन झाले होते
आदर्शबंधू पुरस्कारासाठी

रविवारी
धाकटा ब्रश करत करत
शहरातील उच्चभ्रू वस्तीतील
अलिशान बंगल्याच्या टेरेसवरून
आपल्या रत्नजडित मोबाईलवरून
दादाला करत असतो फोन
त्याच्या शेजारच्या घरात
तो येईपर्यंत फोन तसाच कनेक्ट ठेवून
आतुरतेनं वाट पाहात असतो
"दादा, नमस्कार."
नंतर बराचवेळ गप्पा मारत राहातो
महत्वाचा निरोप हळूच शेवटी सांगतो

दादाही पुढच्या रविवारी
पानटपरीतल्या काॅईनबाॅक्स मध्ये
एक रुपयाचं नाणं टाकून धाकट्याच्या मोबाईल नंबरची बटणं दाबतो

वेळ उरला तर मारतोच गप्पा
पण कनेक्ट झाल्याबरोबर
बाॅक्सच्या डिस्प्लेवरील 
सेकंदांची उलटी गिनती
संपण्याअगोदर
महत्वाचा निरोप देतो
अगदी सेम त्याच्यासारखाच

*"आज रविवार आहे.           
उद्यापासून                                  
तुझा आठवडा सुरू होतोय                      संध्याकाळी कधी येतोयस                                  आई-बाबांना न्यायला ? "*

.    *रमेश कुरलीकर*

No comments:

Post a Comment