. *पुन्हा एकदा*
मी माझेपण हरवून जाईन
तुमच्या-माझ्या बंधशिळेवर
आणिक बांधीन त्यावर इमले
नव्या युगाच्या क्रुध्द लीळेवर
पुन्हा एकदा
व्यक्ताव्यक्त तरल भावना
आपसातल्या प्रेमासाठी
निरडलेल्या उकलून गाठी
हळवी नाती जपण्यासाठी
पुन्हा एकदा
असेच भेटू आतुरतेने
हृदयापासून हृदयापरते
कळेल तेव्हा माझी कविता
तुमच्यासाठी का झुरते
पुन्हा एकदा
अत्तर शिंपू दृढत्वाच्या
खोलखोलवर आठवणींचे
वाटू आनंदाच्या लहरी
सुवर्णक्षण अन् साठवणींचे
पुन्हा एकदा
आपण दोघे निव्वळ दोघे
(कवी आणि वाचक)
करू प्रार्थना विश्वासाठी
उगवू दे चैतन्य साजिरे
आळंदीची उघडून ताटी
पुन्हा एकदा
No comments:
Post a Comment