Sunday, 9 September 2018

हार,गुच्छ,फुले,बुके की पुस्तके

*हार,फुले की पुस्तके*

अलीकडे कार्यक्रमात हार,गुच्छ वा फुले न देता पुस्तके द्या असा एक प्रघात सुरू झाला आहे. तो कोणाच्या सुपीक(?) डोक्यातून आला माहीत नाही. पण त्यात थोडा बदल करण्याची गरज आहे. ती का याचा विचार इथे मांडत आहे. कदाचित तो एकांगी असेल.
पुस्तक मस्तक घडवतात हे सुवचन उच्च कोटीचे आहे यात काही वाद नाही. पण कोणती पुस्तके हे महत्वाची आहे.
हल्ली कार्यक्रमात अध्यक्ष वा उपस्थितांसह पाहुण्यांना जी पुस्तके भेट दिली जातात त्यांच्या वेस्टनाची किंमत जास्त असते असे नाइलाजाने म्हणावे लागते. एक तर ज्यांना पुस्तक द्यायचे त्यांना कोणते पुस्तक हवे ते विचारून द्यावे. असे न करता किंवा चोखंदळ वाचकास विचारून अथवा अभिरूचीचा विचार न करता दिलेली पुस्तके प्रदर्शनात किलोच्या भावात खरेदी केलेलीच जास्त असतात. जुनी-ज्यांचे स्वामित्व हक्क संपुष्टात आले आहेत अशा पुस्तकाची सुमार कागद वापरून दुसरी, तिसरी, दहावी आवृत्ती असलेली  पुस्तकेच दानशूर संयोजक निवडतात. ती स्वीकारावीच लागतात.
पुस्तकच द्यायचे आहे. तेही वेस्टनातून. मान्यवर थोडेच नाकारणार आहेत. हाही भाव त्यासोबत असावा असे वाटते.
पुस्तकांची निर्मिती बहुधा नागर संस्कृतीत होते. फुलांचा जन्म कृषी संस्कृतीतच होतो. ती स्वीकारणाऱ्याच्या मनाला आनंद देतात. निसर्गाशी असलेलं नातं दृढ करतात. निव्वळ फुलबागेवर उपजीविका असणारे अनेक परिवार ग्रामीण भागात आहेत. तर फुलांपासून सुंदर रचनेचे गुच्छ, बुके, हार बनविण्याचा व्यवसाय करणारे नागर भागात आहेत. यातून समतोल साधला जाईल. सर्वांच्याही कष्टाचे चीज व्हायला हवे. म्हणून कार्यक्रमात
*निवडक,दर्जेदार,नव्या कसदार लेखकांची पुस्तके आणि सोबत हार, फुले,गुच्छ, बुकेही देण्यासाठी निवडले जावेत.*

No comments:

Post a Comment