Wednesday, 24 October 2018

गझल १५

गज़लतंत्र

गज़ल ही अनेक स्वतंत्र, मात्र किमान पाच, दोन दोन ओळींच्या कवितांची एक गज़लतंत्रातील मालिका असते, ज्यात आशय हा जीवनानुभुतींवर अवलंबून असतो.
द्विपदी किंवा शेर - शेर म्हणजे दोन ओळी! गज़लेतील कुठल्याही (एकाच शेराच्या )दोन ओळी गज़लेतून बाहेर काढून लिहिल्या व एखाद्याला वाचायला सांगीतल्या तर त्याला त्यातून पूर्ण अर्थ उमगायलाच हवा. या दोन ओळींचा अर्थ अजिबात इतर दोन ओळींवर अवलंबून असलेला नसावा. माझे तिच्यावर प्रेम बसले हे एका शेरात, ती नाही म्हणाली हे दुसर्‍या शेरात, नंतर बरेच दिवसांनी लाजून हो म्हणाली हे तिसर्‍या शेरात, लग्न मात्र चवथ्याशीच झाले हे चवथ्या शेरात व मला आजही तिची आठवण येते हे पाचव्या शेरात येऊ शकते. यात काहीही तांत्रिक अडचण नाही. मात्र, पहिल्या ओळीतील बसलेले प्रेम मी दुसयर्‍या ओळीत व्यक्त केले व दुसर्‍या ओळीत व्यक्त केलेल्या प्रेमावर ती तिसर्‍या ओळीत बरेच दिवसांनी लाजून हो म्हणाली असे असता कामा नये. प्रत्येक गज़लेतील प्रत्येक शेर हा आशयाबाबत पूर्ण स्वतंत्रच असला पाहिजे. पहिल्या शेरात जर ’मला जो माणूस भेटला तो वाईट होता’ अश्या अर्थाचे काही असले तर दुसर्‍या शेरात, समजा त्याच माणसाबद्दल काही लिहायचे असल्यास ’आणि तो’ किंवा ’अन तो’ असे येऊ शकत नाही. म्हणजे, आधीच्या शेराचा काहीही संदर्भ असू नये. गज़लेतील प्रत्येक द्विपदी ही एक संपूर्ण व स्वतंत्र कविता असते. शेरातील पहिल्या ओळीला उर्दूमधे उला मिसरा तर दुसर्‍या ओळीला सानी मिसरा म्हणतात. मिसरा म्हणजे ओळीसाठी असलेला उर्दू शब्द! मराठीत ‘ओळ’ म्हणता येतेच.
मतला - गज़लेच्या पहिल्या द्विपदीस उर्दूमधे मतला असे म्हणतात. मराठीतही तसेच म्हणायला काही हरकत नसावी. मतला हा शेर गज़लेतील इतर सर्व शेरांहून एकाच बाबतीत वेगळा असतो. मतल्याच्या दोन्ही ओळींमधे काफ़िया व रदीफ़ येतात. पुढच्या प्रत्येक शेराच्या फ़क्त दुसयाच ओळीमधे ते आले तरी चालतात. पुढच्या प्रत्येक शेराच्या प्रत्येक ओळीमधे आले तरीही चालू शकतात, मात्र मतल्यात दोन्ही ओळीत यावेच लागतात तसे इतर शेरांमधे प्रत्येक ओळीत यावेच लागतात असे नाही. (काफ़िया व रदीफ़ म्हणजे काय ते पुढे आलेच आहे.)
उदाहरण!
आलाप मीलनाचा गा तू जमेल तेव्हा
मीही लिहीन म्हणतो काही सुचेल तेव्हा - हा मतला आहे.
कारण यात जमेल, सुचेल असे काफ़िया दोन्ही ओळीत आले आहेत. तसेच रदीफ़ म्हणजे ’तेव्हा’ दोन्ही ओळीत आली आहे.
याच गज़लेतील पुढचा एक शेर!
मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा
यात ’रुचेल’ हा काफ़िया व ’तेव्हा’ ही रदीफ़ फ़क्त दुसर्‍याच ओळीत आले, पहिल्या ओळीत आले नाहीत. अशाच पद्धतीने, पुढचे आणखीन तीन शेर, हा विशिष्ट शेर व वर लिहिलेला मतला (मतला सर्वात पहिल्यांदा लिहिणे ) लिहिले की एक गज़ल पुर्ण होऊ शकते.
मतल्याप्रमाणेच दोन्ही ओळीत काफ़िया व रदीफ़ असलेला शेरही तांत्रिकदृष्ट्या योग्यच आहे. मात्र, मतल्यात व शेरात फ़रक इतकाच, की मतल्यात दोन्ही ओळीत ते येणे अत्यावश्यक आहे व इतर शेरामधे ’फ़क्त दुसयाच ओळीत’ ते यावे लागते. मतल्यापुढील शेरांमधे कधीही काफ़िया व रदीफ़ शेराच्या ’फ़क्त पहिल्याच’ ओळीत असू शकत नाहीत. ते दुसर्‍या ओळीत असलेच पाहिजेत.
एक उदाहरण!
आणू नको कधीही तसले मनात काही
आहे तुझाच आहे सध्या जगात नाही - मतला (गज़लेचा पहिला शेर!)
ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
संपायची कधी ही एकाधिकारशाही? - दुसरा शेर!
प्रत्येक दु:ख माझे शाई बनेल जेव्हा
होतील शब्द सारे साधेसुधे प्रवाही - तिसरा शेर

No comments:

Post a Comment