Friday, 26 October 2018

गझल ५

मराठी गझल
मराठी भाषेला ’गज़ल’ म्हणजे काय असते ते खर्‍या अर्थाने शिकवले कविवर्य सुरेश भट साहेबांनी! त्या आधीचे ’गज़ल’ या सदरात मोडणारे सर्व साहित्य अशुद्ध होते. त्या खर्‍याखुर्‍या गज़ला नव्हत्या. विनय वाईकर साहेबांनी किंवा सुरेशचंद्र नाडकर्णी साहेबांनी गज़ल जरूर समजावुन सांगीतली, पण बाराखडी लिहिली नाही. बाराखडी भटांनी लिहिली.
बाराखडीमधे भटसाहेबांनी गज़लेचा प्रत्येक तांत्रिक भाग स्पष्ट केला. मराठी गजलसाठी माधवराव पटवर्धन, सुरेशचंद्र नाडकर्णी, डॉ. विनय वाईकर, मंगेश पाडगावकर ही नावे महत्वाची आहेत. सुरेश भट हे नाव मात्र त्यात सर्वात वर आहे कारण त्यांनी मराठीला गजलतंत्र शिकवले व ते सर्व कवींसाठी उपलब्धही करून दिले.
कवीवर्य सुरेश भट
भटसाहेबांनी मराठी माणसाला गजलचे तंत्र शिकवले. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्याचे अर्धे आयुष्य गजलेसाठी व्यतीत केल्यावर ते तंत्र कवीना शिकवले. त्यांची बाराखडीतील मते शिरसावंद्य आहेत. भटसाहेबांच्या त्या बाराखडीमुळे गजलकारांच्या पिढ्या तयार झाल्या व होत आहेत. मला गजल कशी रचली जाते हे बाराखडी नसती तर कधीच कळले नसते.
भटसाहेबांचा शब्दसंचय व अचूक छटा असलेला शब्द वापरायचे प्रभुत्व अचंबीत करणारे आहे.
बेरका होता दिलासा, मानभावी धीर होता
पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता
यातील दिलाश्याला बेरका म्हणणे, खंजिराला लाघवी हे विशेषण देणे हे शिकण्यासारखेच आहे.
एल्गार हे एकच पुस्तक खरे तर गझलेच्छूचा गजलकार करायला पुरेसे आहे.
भटसाहेबांच्या गजलेमध्ये कित्येकवेळा आक्रमकताही आलेली दिसते.
त्यांच्याबाबत मिळालेल्या माहितीवरून ते एकाचवेळी अत्यंत हळवे, मिष्कील, बेदरकार व संवेदनाक्षम मनाचे व्यक्तीमत्व असावे असे वाटते.
त्यांच्या अनेक गजला व गीते महाराष्ट्राला पाठ आहेत. त्या सर्वोच्च पातळीवर गायल्याही गेल्या आहेत.
काव्यावरची हुकुमत त्यांची पुस्तके वाचून लक्षात येते.
त्यांच्या गजलेमध्ये काहीवेळा उघड होणारी आक्रमकता मला फारशी भावत नाही.
साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही
स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता
पण ती कदाचित त्यांच्या काळामध्ये समाजामध्ये गजलेबाबत किंवा गझलकाराबाबत असलेल्या औदासीन्यामुळे आलेली असावी. पण त्यांच्या गजलांमधील तरलता व नाजुकपणा हेही वादातीत आहेत.
सुरेश भटांच्या गझलेत व उर्दू गझलेत मला जाणवलेले फरक!
१. उर्दू रिवायती गझलेत सामाजिक आशय फारसा जाणवत नाही. भटसाहेबांच्या गझलेत जाणवतो. त्यांच्या गझलेत टीकात्म शेरही अनेक सापडतात.
२. प्रेम या विषयावर भटसाहेबांची गझल तुलनेने कमी असावी. उर्दूत ते अधिक आहे असे जाणवते.
३. शब्द भटसाहेबांना शरण गेलेले असावेत. तसे ते बहुधा गालिबलाच गेलेले होते. शब्दांवरून उड्डाण प्रचंड आहे दोघांचे!
४. उर्दूतील गझलकारांनी गझलेचे तंत्र पुस्तक स्वरुपात कुठेही समजावून सांगीतले नसावे. कुणीतरी मला म्हणाले होते की सौदा किंना इन्शा यापैकी एकाने तसे लिहीले होते म्हणे! ते मला माहीत नाही. भटसाहेबांनी मात्र ते लिहीले. आणि त्यामुळेच आज मी हा उद्धटपणा करायला समर्थ झालो आहे.
५. उर्दूतील बहुसंख्यांनी तखल्लुस वापरले, भटसाहेब तखल्लुसच्या विरुद्ध होते.

No comments:

Post a Comment