Friday, 26 October 2018

गझल १२

आता असा प्रश्न आहे की ’भलताच’ या शब्दात लघू गुरू अक्षरांचा क्रम कुठे पाळला गेला? भलताच मधील ’ता’ ठिक आहे कारण त्याच्याजागी गुरूच अक्षर पाहिजे, पण ’भल’ ही दोन लघू अक्षरे आहेत जी एका गुरू अक्षराच्या जागी येऊन बसली. याला ’सुट घेणे’ असे म्हणतात. ही सुट वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे घेता येत नसून, फ़क्त ’एका गुरू अक्षराऐवजी एकाच शब्दात व सलग येणारी दोन लघू अक्षरे घेणे चालते’ अशी आहे. म्हणजे, एका गुरू अक्षराऐवजी घेतलेली दोन्ही लघू अक्षरे ही एकाच शब्दात असायला हवीत. ती दोन वेगवेगळ्या शब्दात असता कामा नयेत. तसेच, ती ’सलगच’ असायला हवीत. म्हणजे, ’भलताच’ या शब्दाऐवजी ’प्रचंडच’ असा शब्द घेता येणार नाही. कारण प्रचंड या शब्दात एका गुरूऐवजी घेतलेली दोन लघू अक्षरे (प्र व ड ) ही सलग आलेली नसून दुसया गुरू अक्षराच्या आजूबाजूला आलेली आहेत. ’चं’ हे अक्षर मुळातच दोन मात्रांचे व गुरू अक्षर आहे.
आनंदकंदमधीलच आणखीन एक उदाहरण पाहू. जेवढे निकष या वृत्ताबाबत देत आहे तेच इतर सर्व वृत्तांनाही लागू होत असल्यामुळे इतर वृत्तांची फ़क्त अक्षरक्रमाबाबतची माहितीच देणार आहे.
आणखी एक आनंदकंदचे उदाहरण!
आनंद शोधताना उत्साह आळसावा
इतका न दाखवावा उत्साह आळसांनो
या द्विपदीमधे ’उ’ हे अक्षर लघू असूनही ’गा’ म्हणजे गुरू अक्षराच्या जागी आलेले आहे. याचे कारण आपण मात्रा मोजताना पाहिलेले होते. ’त्सा’ या अक्षरातील ’अर्ध्या त’ चा भार ’उ’ वर पडल्यामुळे ’उ’ च्या मात्रा दोन होतात. ते गुरू अक्षराइतकाच उच्चारायला घेते.
या प्राथमिक माहितीनंतर आपण इतर अनेक वृत्ते पाहणार आहोत.
वृत्त - मंजुघोषा
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
पा हि जे हो ते कु णी रा गा व णा रे
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २= २१ मात्रा
वृत्त - कालगंगा
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा
व्य क्त व्हा वे वा ट ले की ले ख णी सर सा व ते
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ = २६ मात्रा
वृत्त - व्योमगंगा
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा
आ ठ वा वा का ळ ते व्हा पा सु नी मी मी च आ हे
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ = २८ मात्रा

No comments:

Post a Comment