Friday, 26 October 2018

कोजागिरी

*कोजागिरी*
अशा कित्येक कोजागिरी
आल्या न् गेल्या

केशर,बदाम,काजू,चारोळी
सोडाच
साध्या शेंगदाण्याची मूठही नाही नशिबी

आमच्या बापाला द्रोणाचार्यही नाही होता आलं
पिठात पाणी मिसळून देण्याइतपत

लोक चंद्रावर पोहोचलेत म्हणे
आम्ही शोधतोय भाकरीचा चंद्र

बापजाद्यांपासून मातीत मळणं, उन्हात तळणं
पेरलं तेवढंही नाही पिकत
म्हणून
भुकेलाही मातीच गिळणं

कोजागिरीलाही अवसेचीच अंधारी रात्र ठाण मांडून बसते घरात

गोठ्यात चिपाडं झालेल्या गंगू-रंगू नि हौशा-नवशा
प्रत्येक येरझारीला आशाळभूत नजरेनं न्याहाळतात
धन्याच्या डोळ्यांतून फक्त आसवंच गळतात

चांदण्या तोडून दळता आल्या असत्या
तर किती बरं झालं असतं
असंही वाटतं कधीकधी लोकांनी लिहिलेल्या कवितांचा कीस पाडून कोशिंबीर करता आली असती तर ?

घरोघरी मातीच्या चुली होत्या म्हणे कधी काळी
आता त्यांची जागा गॅस शेगडी घेतेय

अामचेच पैसे चार दिवस वापरून सबशिडी म्हणून खात्यावर परत जमा करतंय सरकार !

इलेक्शनच्या मतदानापर्यंत जगू यासाठी तरी काही करा

या कोजागिरीच्या मुहूर्तावर

          *रमेश*

No comments:

Post a Comment