Friday, 26 October 2018

गझल २१

अलामत म्हणजे ’उच्चार निदर्शक अक्षराचे अचूक ठिकाणी अस्तित्व असणे’!
उदाहरणे!
आलाप मीलनाचा गा तू जमेल तेव्हा
मीही लिहीन म्हणतो काही सुचेल तेव्हा
यात ’तेव्हा’ ही रदीफ़, तर सुचेल, जमेल हे काफ़िये झाले. अलामत काफ़ियामधेच असते. सुचेल व जमेल या दोन्ही शब्दातील ’चे’ व ’मे’ या अक्षरांमधील ’ए’ हा उच्चार या गज़लेत अलामत आहे. म्हणजे, ’पुढील’, ’असाल’, ’बिगूल’ असे शब्द काफ़िये म्हणून या गज़लेत येऊ शकणार नाहीत. कारण या शब्दांमधे ’ए’ हा स्वर पाळला जात नसून ’ई", ’आ’ व ’ऊ’ हे स्वर येत आहेत.
आणखी एक उदाहरण!
वेचा नवीन आशा माझ्या नसानसांनो
बदल्यात व्हा प्रवाही रक्तातल्या रसांनो
यात रदीफ़ नाही. काफ़िये आहेत नसानसांनो व रसांनो! यात अलामत आहे ’आं’! येथे ’परींनो’, गुरूंनो’ असे काफ़िये येऊ शकत नाहीत. ( असांनो मधील सा महत्वाचा आहेच, परी व गुरू हे शब्द फ़क्त उदाहरणासाठी दिले आहेत. )
आलेच आहे होत, हो खंबीर माझ्यासारखा
संपेन मी नावानिशी, धर धीर माझ्यासारखा
यात ’माझ्यासारखा’ ही रदीफ़ तर खंबीर, धीर हे काफ़िये आहेत. यात अलामत आहे ’ई"! यात आधार, माहेर, शंकासूर असे काफ़िये येऊ शकनार नाहीत. कारण त्यात अनुक्रमे ’आ’, ’ए’ व ’ऊ’ या अलामती आहेत. या गज़लेत त्यामुळे फ़क्त ’ई’ हीच अलामत असलेले काफ़िये चालतील.
अलामत गज़लेत अत्यंत महत्वाची आहे. अलामत हा काफ़ियाचाच भाग आहे. मात्र त्याचा अभ्यास वेगळा करण्याचे कारण अलामत चुकणे म्हणजे गज़लच चुकणे असे आहे म्हणून!

No comments:

Post a Comment