Saturday, 25 May 2019

खंत

.          *खंत*

सहन करावेत
कवितेवर होणारे बलात्कार
डोळे झाकून

अथवा
कवी माझा जिवलग
म्हणून त्याच्या चुकांवर
घालावे पांघरूण

की निमूटपणाने
बाहेर जावे समुहाच्या
अत्याचाराचा साक्षी
न होता
नरो वा; कुंजरो वा वृत्तीने

पुटपुटावे काही
तर
'हा आलाय मोठा शहाणा !'
या पदवीची वाटतेय भीती.

काहीच कळत नाही
निमूटपणाने सहन करण्यापलीकडे
तेव्हा लाज वाटते
माझीच मला
माय मराठीचा पुत्र म्हणवून घ्यायची.

मायबद्दलची अस्वस्थता तर
गप्प राहू देत नाही
तेव्हापासून
'ज्याच्या डोळ्यांत खंत असेल
ज्याचे मन निर्मळ असेल
ज्याचा भाव आतुर असेल
त्यांच्याच तडलेल्या भिंतीवर
लिंपण घालत जा'
हा मायचा सल्ला
प्रमाण माणून
कानात कुजबुजत राहिलो
तरी वीज कडाडल्याच्या आविर्भावात
त्यांनी डोळे वटारले
मग
न केलेल्या गुन्ह्याबद्दल
क्षमा मागून चालत राहीलो वाट
'देवा त्यांना क्षमा कर'

म्हणण्याची पात्रताही अंगी नाही

धुमसत राहिलो,स्फुंदत राहिलो
या भिंतीत तोंड लपवून

हीच खरी खंत आहे

                  *© रमेश*

No comments:

Post a Comment