Wednesday, 2 October 2019

सदाबहार कांचनवृक्ष


आमचा गाव ग्रामीण भागात त्यामुळे रानावनात फिरणे, निसर्गात रमणे नित्याचेच. जिज्ञासेने अनेक झाडांचा जमेल तसा अभ्यास/माहिती गोळा करणे चालू आहे; आई-आजी यांच्या अनुभवातील काही टिप्पणीमुळे. एखाद्या नवीन ठिकाणी गेलो तर तिथला निसर्ग, सृष्टी बारकाईने न्याहाळण्याची सवय आहे. अनेक वनस्पतींचे थोडेफार औषधी गुणधर्मही माहीत आहेत; पण कधीकधी निसर्गात आढळणाऱ्या सर्वसामान्य गोष्टींपेक्षा वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि अचंबित व्हायला होतं. त्यातली एक गोष्ट म्हणजे सांगली येथील मा.सदानंद कदमसर यांच्या "शिवराज" बंगल्याच्या आवारात असलेला सदाबहार कांचन वृक्ष.
एक भाषातज्ज्ञ व इतिहासाचे गाढे अभ्यासक मा.कदमसर यांच्याकडे वेगवेगळ्या निमित्ताने अनेकदा जाणे होते. बहुतेक वेळी मा.संपत गायकवाडसाहेब, पी.एस.पाटीलसर आणि मी. या त्रयीसोबत एखादा-दुसरा मित्र असतो. परवा सोबत होते एक शास्त्रज्ञ. ज्यांनी स्वत:च्या १८ संशोधनाची पेटंट घेतली आहेत. ११२ काॅपीराईट मिळवले आहेत. आणि विशेष म्हणजे चांद्रयान मोहिमेत ज्यांच्या संशोधनाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ती कहाणी सविस्तर सांगेन पुढं .
कदम सरांच्या भेटीची ओढ असतेच. कारण त्याांच्या सहवासातील प्रत्येक क्षण ज्ञान आणि अनुभवामृतानं ओतप्रोत भरलेला,भारलेला असतो. त्यांनी तासन् तास बोलत राहावं, समोरच्यांनी सर्व कायेचा कान करून ऐकत राहावं.
मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा मला आकर्षून घेतलं ते त्यांच्या दारातील मध्यम आकाराच्या कांचन वृक्षानं. गुलमोहरासारख्या पण गुलाबी,जांभळ्या रंगाची छटा असलेली पाच पाकळ्यांची फुलं त्या झाडावर उमललेली होती. या फुलांच्या पाकळ्यांना त्यांची स्वत:ची अशी एक वेगळी चव आहे. मधमाश्यांच्या गुंजारवाबरोबरच आसपासचं वातावरण मधाळ गंधानं न्हाऊन गेलेलं असतं. मला राहवत नाही. नेहमीप्रमाणे गाडी दारात थांबण्याअगोदरच सर स्वागतासाठी सुहास्यवदनाने गेट उघडून बाहेर आले. सोबतची मंडळी त्यांच्याबरोबर आत गेली. मी कांचनवृक्षाकडे मोर्चा वळवला.
या फुलांच्या गुलाबी,जांभळ्या पाकळ्या सकाळी घेतल्या तर मूळव्याधीचा त्रास कमी होतो. कांचनवृक्ष दिसल्याबरोबर धावत जाऊन दोन-तीन फुलांच्या पाकळ्या खाल्ल्या.
पहिल्यांदा मी सरांकडे गेलो तेव्हा मार्च-एप्रिल महिन्याच्या काळ असावा. त्यानंतर गेल्या पाच वर्षात अनेकदा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये त्यांच्याकडे जाणे झाले. प्रत्येक वेळी जाईन तेव्हा हा वृक्ष बहरलेला असतो. मी पाहिलेले अनेक ठिकाणचे कांचन वृक्ष वर्षातील  ठराविक काळात फुलत असतात आणि त्यांच्यापासून त्याच्या शेंगा, बिया तयार होत असतात. पण हा कदम सरांच्या दारातला कांचन वृक्ष त्यांच्या नावासारखा सदाबहार आहे. फुलांनी बहरलेला.
आता पुन्हा कधी जाता येईल ? या प्रतीक्षेत.

No comments:

Post a Comment