लेख...
तृतीयपंथी.... ( हिजडा )
एखादी व्यक्ती जन्मतःच नैसर्गिकरित्या लैंगिक विकृती घेऊन जन्मास येतो आणि अशा वेळेस तो स्त्री लिंग आहे की पुलिंग आहे हे स्पष्ट होत नाही. म्हणजेच तो नर आहे की मादी हे स्पष्ट होत नाही. या विकृतीलाच आपल्या समाजात तृतीयपंथी, हिजडा, समलैंगिक, छक्का किंवा नपुंसक असे संबोधले जाते.
वैद्यकिय भाषेत या तृतीयपंथी विकृतीचे
१) L,
२) G,
३) B,
४) T,
५) I,
६) Q,
असे सहा प्रकार सांगितले जातात. या प्रकारांचा अर्थ खालील प्रमाणे आहे.
L= लेस्बियन, ज्या महिलेला दुसऱ्या महिले विषयी आकर्षण वाटते तिला लेस्बियन म्हणतात. लेस्बियनपैकी जिचे व्यक्तिमत्व पुरुषासारखे असते तिला 'बुच' म्हटले जाते. ती पुरुषासारखे बोलते, कपडे घालते. पण काही लेस्बियन पुरुषासारखे राहात नाहीत, त्यांना 'फेम' म्हटले जाते.
G = गे, एक पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतो त्याला 'गे' म्हटले जाते. मात्र या शब्दाचा वापर सर्वच समलैंगिक व्यक्तींबाबत केला जातो. यात लेस्बियन, गे, बायसेक्शुअल असे सर्वच आहेत. 'गे' कम्युनिटी किंवा 'गे पिपल' असेही त्यांना ओळखले जाते.
B = बायसेक्शुअल, जर कुणाला पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही लिंगाच्या व्यक्ती आवडत असतील, त्यांच्यासोबत सबंध ठेवायची इच्छा असेल त्यांना बायसेक्शुअल असे म्हणतात.
T= ट्रांसजेंडर, ही अशी व्यक्ती असते की जन्माच्या वेळेस तिचे लिंग वेगळे होते आणि नंतर ती व्यक्ती स्वतःला वेगळ्या लिंगाची समजते तिला ट्रांसजेंडर म्हणतात. जी ट्रांसजेंडर आपल्या मनाप्रमाणे आपला ड्रेस बदलते तिला 'क्रॉस ड्रेसर' पण म्हटले जाते. जे ट्रांसजेंडर औषधी, ऑपरेशन, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी आणि सेक्स रिसाइनमेंट सर्जरी ने लिंग बदलवून घेतात त्यांना 'ट्रांस सेक्शुअल' म्हटले जाते. यातही लेस्बियन ट्रांसजेंडर, गे ट्रांसजेंडर, आणि बाईसेक्शुअल ट्रांसजेंडर असे प्रकार आहेत.
I = इंटर-सेक्स, जन्म झाल्या नंतर ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे कळतच नाही त्यांना इंटर-सेक्स म्हटले जाते. त्यावेळेस डॉक्टरांना जे वाटते त्याच लिंगाच्या आधारे त्यांचे नाव ठेवले जाते. पुढे मोठे झाल्यानंतर ती व्यक्ती स्वतःला स्त्री, पुरुष किंवा ट्रांसजेंडर यापैकी एक समजायला लागते.
Q = क्वीयर, आपण निश्चित कोणत्या लिंगाचे आहोत हेच काही जण निश्चित करू शकत नाहीत. ते स्वतःला स्त्री, पुरुष, ट्रांसजेंडर, लेस्बियन, गे, किंवा बायसेक्शुअल असे काहीच म्हणून घेत नाहीत, त्यांना 'क्वीयर' म्हणतात.
वरील माहीती वरून आपल्याला तृतीयपंथी म्हणजे नेमके काय ? हे अगदी सोप्या साधारण भाषेत आणि वैद्यकीय भाषेत कळलेच असेल. यावरून आपणांस एक गोष्ट नक्कीच स्पष्टपणे लक्षात आली असेल, ती ही की तृतीयपंथीसुद्धा आपल्यासारखेच नैसर्गिकरित्या आईच्या पोटातून जन्मास आले आहेत. जसे आपण नऊ महिने आईच्या पोटात वाढलो तसेच ते पण वाढले आणि या जगात आले. जसा जन्माच्या आधी आपल्याकडे कुठलाही विकल्प किंवा आवडनिवड नव्हती ( जसे श्रीमंत घराण्यात जन्म होणे, दिसायला फार सुंदर असणे, विद्वान असणे इत्यादी ) तशी यांच्याकडे पण नव्हती. निसर्गाने अशी सोय करून दिली असती तर बरे झाले असते. मग कुणीच गरीब, अस्पृश्य, दलित, तृतीयपंथी, मानसिक बीमार, मठ्ठ, भ्रष्टाचारी, अधर्मी, किंवा अपंग जन्मास नसता. असो परत मुळ मुद्द्यावर येऊ या.
तृतीयपंथी या विकृतीने जन्मास येणे हे एक हार्मोन असंतुलन आहे. ही कुठलीही बिमारी, आजार किंवा दैवी कोप नाही.
मग का बरे आपला सुशिक्षित समाज या लोकांना भावनिक आधार न देता, त्यांचा छळ करतो. सामाजिक मुख्य धारेत त्यांना का सामावून घेत नाही ? त्यांचा तिरस्कार करतो आणि त्यांना प्रत्येक सामाजिक, प्राथमिक आणि मानवीय सुविधेपासून दूर ठेवतो. सर्वांत गलिच्छ म्हणजे या तृतीयपंथी समुदायाचा वेशा व्यवसायासाठी वापर होतो आणि त्यांना त्या व्यवसायाकडे बळजबरीने ढकलले जाते. आता आपण म्हणाल की त्यांचे आचारण उचित नाही, असले लोक समाजात दुराचार आणि अश्लिलता पसरवतात, जबरदस्तीने पैसे वसूल करतात, अनाप-शनाप बोलतात, शिवीगाळ करतात, चोरी करतात आणि जर का आपण यांना पैसे दिले नाहीत तर चार चौघात अश्लिल इशारे आणि व्यवहार करतात. बरोबर आहे हे तृतीयपंथी नक्कीच असे वागतात.
पण आपण सुशिक्षित समाजाने आणि आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचा पाठपुरावा करणाऱ्या समाजाने कधी शांतपणे या गोष्टींचा विचार किंवा आत्मचिंतन केले आहे काय? की, त्यांच्या असल्या वागण्याला जबाबदार कोण आहे? आपल्यासारखी ती पण माणसं असताना, त्यांना पण पोट असतांना, भावना असताना, स्वप्नं असताना, त्यांच्या पण जीवनात बऱ्याच महत्वाकांंक्षा असताना आपण त्यांना मूलभूत त्यांच्या मानवीय अधिकारांपासून वंचित ठेवले. त्यांना रोजगार नाही, शिक्षण नाही, सन्मान नाही, समाजात त्यांना कुणीही मानवीय नजरेने बघत नाही. त्यांच्या भावना, अपेक्षा, दुःख कुणी समजून घ्यायला तयार नाही. मग त्यांना पोट भरण्यासाठी जो मार्ग व्यवस्थित वाटला तो त्यांनी निवडला. जशास तसे वागत त्यांनी मग दहशत पसरवून शिवीगाळ करून, जे त्यांना सहज आणि सोपे वाटले ते करून त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आणि उदरनिर्वाह करण्याचा मार्ग शोधला. भूक व्यक्तीकडून काय काय करवून घेत नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. अतिसमृद्ध भ्रष्टाचार करतात हे तर बिचारे असहाय आणि उच्चभ्रू समजाचे शोषित आहेत.
तृतीयपंथी लोकसुद्धा मानवीय भाव जोपासतात आणि वेळ प्रसंगी एखादा व्यक्ती अडचणीत सापडलाच तर पूर्ण आत्मियतेने सहकार्य करतात. वेळप्रसंगी मदत करतांना जीव पण धोक्यात घालतात.
असे एक दोन प्रसंग मी अनुभवले आणि वाचले पण आहेत. एकदा औरंगाबाद-मनमाड-सिकंदराबाद या मार्गावर धावणाऱ्या अजिंठा एक्सप्रेस मध्ये एका महिलेची प्रसुती झाली. नेहमीप्रमाणे इथे पण शासनाचा उदासीनपणा दिसून आला आणि तिथे उपस्थित किन्नर समुदायाने अतिशय माणुसकीचा परीचय देत त्या महिलेची सुरक्षित प्रसूती करवून देण्यात मदत केली. तसेच पुढील स्टेशन येताच एका चांगल्या प्रसुतीगृहात त्यांना भरती सुद्धा करून दिले. करंजगाव ते लासूर असा हा प्रवास होता.
दुसरा प्रसंग मी स्वतः मुंबई वरून कोल्हापूरला येताना अनुभवला. एक घाबरलेले प्रेमी युगल तिकीट न घेताच गाडीत चढले. बहुतेक त्यांच्या जवळ पैसे नव्हते. काही दूर प्रवास झाल्यानंतर कसारा घाटा जवळ काही मवाली टोळक्यांनी त्यांना घेरले व अश्लिल शब्द वापरत हळूहळू मुलीची छेड काढायला सुरुवात केली. मुलगी घाबरली आणि तिकीटेसुद्धा घेतली नसल्याने सहन करीत होती. मवाल्यांची हिंमत वाढली आणि त्यांनी मुलीला मी लिहू पण शकत नाही असा शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. प्रेमीने विरोध करताच त्याला पण चांगलाच चोप दिला. मवाली आठ दहा आणि हट्टे कट्टे होते. त्यांना धडा शिकवायची कुणाचीही हिंमत होत नव्हती. मुलगी जोरजोराने रडत होती. तेवढ्यात सुदैवाने पाच सहा किन्नर भीक मागत आले. त्यांनी तो प्रकार पाहून त्या मवाल्यांना जबरदस्त चोप दिला. आणि पुढील स्टेशनवर चेन ओढून त्यांना पोलीस पथकाच्या स्वाधीन केले. शिवाय प्रेमी युगुलांना आर्थिक मदत करीत खायला पण आणून दिले. हा सर्व प्रकार पाहून मला खरे हिजडे कोण? हा प्रश्न पडत होता आणि स्वतःची आणि या सुशिक्षित कमजोर समाजाबद्दल लाज पण वाटत होती. आपणही आता या किन्नर समुदायाकडे आपला घृणेच्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
आता तर सामाजिक, शैक्षणिक आणि शासकीय नोकरीत पण हे तृतीयपंथी आपली हजेरी लावत आहेत. राजस्थान येथे सन २०१३ मध्ये जालौर येथून श्री गंगाकुमारी तृतीयपंथी पोलिस बनली. पण यासाठी तिला फार संघर्ष करावा लागला. नगर जिल्हयातील शीसर ( रामालिंग ) येथील किन्नर शिक्षक यांनी नाशिक येथून मुकबधीर विषयात डी. एड केले आणि संपूर्ण आयुष्य मुकबधीर लोकांसाठी सेवा करण्याचा निर्णय घेतला. तृतीयपंथी लक्ष्मीनारायण त्रिपाठी उर्फ लक्ष्मी तर संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत आशियायी देशाचं नेतृत्व करीत आहे. वेगवेगळ्या धार्मिक गुरुंनी तिला शिष्यत्व प्रदान केलं आहे. स्त्री आणि पुरुष असा माहितीपत्रकात लिंग दर्शविणारा चौकोन असतो तसाच एक तिसरा चौकोन किन्नर लोकांकरीता असावा असा प्रस्ताव सरकारपुढे मांडण्यात आला होता. त्यासाठी उभ्या राहिलेल्या चळवळीचे नेतृत्व किन्नर लक्ष्मीनेच केले होते. आणि १५ एप्रिल २०१४ ला हा अधिकारसुद्धा मिळाला. लक्ष्मी म्हणते आम्हाला समाज साधी साधी कामं सुद्धा देत नाही. जसे धुणी भांडी, चपरासी, स्त्री अंगरक्षक, रेल्वे डब्यात सुरक्षा गार्ड, इत्यादी. लक्ष्मी म्हणते निसर्गाने आम्हास भरपूर ताकत दिली आहे. मर्द, पुरुष आम्हास भितात आणि स्त्रियांना आमच्यापासून काहीच धोका नाही. शिवाय किन्नर फार इमानदार असतात. संपूर्ण भारतात तृतीयपंथी लोकांवर आपराधिक आणि धोकाधडी अशी कुठल्याही तक्रारीची नोंद नाही.
आम्हाला समाजाने वाळीत टाकले म्हणून नाईलाजाने आम्हास टाळ्या कुटाव्या लागतात आणि वेशा व्यवसायसुद्धा करावा लागतो.
समाजाने आम्हास खरे सहकार्य केले तर एक दिवस आम्ही सर्वच क्षेत्रात आपली उपस्थिती अवश्य नोंदवू, जशा भारतीय स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेत.
एक कटूसत्य हे पण आहे, या समाजात आतंकवाद, नक्सलवादासारखा सामाजिक असंतोष केवळ एका उच्चवर्णीय वर्गाने किंवा समाजाने दुसऱ्या, असंघटित आणि गरीब समाजावर केलेल्या अत्याचारामुळे वाढला आहे. आपले वर्चस्व आणि दबंगगिरी टिकवून ठेवण्यासाठी नेहमी बलवान आणि सुशिक्षित समाज असहाय लोकांची मदत करण्यापेक्षा त्यांच्यावर अत्याचार करतात आणि मग समाजात कधीही न संपणारी चीड आणि विषमता निर्माण होते आणि मग या विषमतेतूनच सामाजिक पतन व्हायला सुरूवात होते.
समाधानाची बाब ही आहे की आता या तृतीयपंथी वर्गाबदल शासन आणि समाजसेवी संस्था काम करीत आहेत. त्यांना राजकारण, रोजगार आणि शिक्षण यामध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांच्या हितासाठी नियम कायदे होत आहेत. परंतु, केवळ नियम आणि कायदे बनवून समाज सुधारत नाही. त्यासाठी प्रत्येकाची मानसिकता बदलली पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखाला आपले दुःख जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही, माणसाला माणसासारखी वागणूक द्यायला समाज शिकणार नाही तोवर कायदे अपंग आणि अंधच राहतील आणि सामाजिक अत्याचाराचा कधीही अंत होणार नाही...
No comments:
Post a Comment