मार्च, १९८१ ची माध्यमिक शालांत परीक्षा सर्वांनी विवेकानंद शिक्षण समूहाच्या वडणगे-निगवे येथील श्री ज्योतिर्लिंग विद्या मंदिर, या गावापासून ५/६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या हायस्कूलमधून ७५.२८% गुण मिळवून वर्गात दुसऱ्या नंबर ने पास झालो. उत्तीर्ण झालेल्या गावातील वर्गमित्रांनी पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर शहरातील ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी एस.टी. बसची सोय नव्हती. त्यामुळे ते सर्वजण सायकलने काॅलेजला जाऊ लागले. माझ्याकडे हा दहा-बारा किलोमीटरचा प्रवास सुखरुप पार करेल इतपत तंदुरुस्त सायकल नव्हती. म्हणून हायस्कूल जवळच त्याच संस्थेच्या प्रताप ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्रवेश घेतला. हेतू हा की आठवी ते दहावीची तीन वर्षे हा प्रवास पायी चालत जाऊन केला होता. वाढत्या वयात तर प्रवास सहज शक्य होता. प्रवेश घेतल्यानंतर सहा महिन्यांनी काॅलेजच्या काचफलकात सराव पाठांचे वेळापत्रक लागले, तेव्हा मला उमगले की हे ज्युनिअर कॉलेज म्हणजे दोन वर्षांचा प्राथमिक शिक्षकाचा कोर्स आहे. ज्याला त्याकाळी डी.एड. व आता डी.टी.एड. या नावाने ओळखले जाते. या काॅलेजमध्ये अभ्यासाला हिंदी अध्यापन पद्धती होती. माझा आवडता इंग्रजी विषय तेथे नव्हता.(त्यावेळच्या अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार हिंदी किंवा इंग्रजी यांपैकी एका विषयाची अध्यापन पद्धतीच घेता येत असे.)
१९८३-८४ ते १९९४-९५ ह्या तब्बल बारा वर्षांच्या काळात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होतो. यातले पहिले वर्ष त्र्यंबोली विद्यालय, विक्रमनगर, कोल्हापूर या शाळेत व नंतरची अकरा वर्षे हरिहर विद्यालय, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर या प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक म्हणून काम केले. या शाळांत असताना मुलांमध्ये रमताना जो स्वर्गीय आनंद प्राप्त झाला तो अवर्णनीय.
आज हायस्कूलमध्ये काम करत असताना इयत्ता पाचवीच्या वर्गात जी समरसता असते; तशी वरच्या वर्गात नसते. लहानगी निर्विकार, निर्विकल्प, निरतिशय प्रेम देणारी-घेणारी. म्हणूनच जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा कार्यशाळा, लेखन शिबिर, क्षेत्रभेट, सहल,साहित्य संमेलन, यानिमित्ताने लहान मुलांच्यात मिसळून तो हरवलेला आनंद शोधायचा प्रयत्न असतो. परवा नवीन अभ्यासक्रम आराखडा प्रशिक्षणाच्या निमित्ताने असुर्ले येथे गेलो होतो. परतताना केंद्र शाळा असुर्ले येथे डोकावले. मित्रवर्य भिवाजी काटकरसर व प्रकाश ठाणेकरसर ग्राउंडवर मुलांचे खेळ घेत होते. खेळाडू व्यतिरिक्त इतर मुले घोळक्या घोळक्याने आपापले खेळ खेळत होती. पायरीवरील एका घोळक्यात हळूच सामील झालो. मुलांनी गतवर्षीच्या कार्यशाळेत सांगितलेले गाणे म्हणण्याचा आग्रह केला. मग आम्हाला काय तेच हवे असते, आणि अर्धा पाऊण तास त्या मुलांच्या घोळक्यात स्वतःलाही हरवून गेलो.
Saturday, 5 October 2019
लहान मुले आणि मी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment