. (मासिक ऋग्वेदचे संपादक सुभाषदादा विभुते यांच्या आग्रहास्तव मी माझं बालपण मांडलं. त्यांनी ते आठ भागांत क्रमश: प्रकाशित केलं. त्यानंतर ते लेखन *प्राजक्ताची फुले* या नावाने हृदय प्रकाशन मार्फत बालकादंबरीच्या रूपात प्रकाशित झालं. आता या लाॅकडाऊनच्या काळात दीपकदादा जगदाळे यांच्या आवाहनानुसार ते आपल्यासाठी क्रमश: देत आहे.)
*भाग सातवा : चौथी*
दरवर्षीप्रमाणं गणवेश, वह्या, पुस्तके आणि इतर साहित्याची जुळवाजुळव झाली. पहिल्या दिवशी शाळेत जाताना दोन-तीन वर्गमित्र भेटले.
"आरं, कशाला चाललास शाळेत? शाळा झाडून काढायला? चल माघारी."
एकाने हटकले. पण मी मनात म्हटलं,
'आपण वर्षभर ज्या वर्गात बसून शिकणार तो वर्ग स्वच्छ करायला गेलो तर बिघडलं कुठं. माझ्याबरोबर आणखी चार वर्ग मित्रमैत्रिणी असणारच की. दुसऱ्या वर्गातील. मुलांनी वर्ग स्वच्छ करावा आणि आपण
आयत्या स्वच्छ वर्गात जाऊन बसावं हे काही
बरोबर नाही.'
वर्गात गेलो दोन-तीन मुलं आणि प्राजक्तासह सर्व मुली अगोदरच आल्या होत्या. गुरुजी आले. सर्वांनी मिळून वर्गाची सफाई केली. घंटा झाल्यावर मैदानाची सफाई केली. प्रार्थना झाली. इतक्यात हेड गुरुजी आले.
त्यांनी एक पत्र आमच्या वर्ग शिक्षकांच्या हातात दिलं आणि म्हणाले,
"बहुधा बदलीची ऑर्डर असावी
तुमच्या."
आमच्या वर्गशिक्षकांनी ते पाकीट फोडून वाचलं आणि सर्व वर्गावर नजर फिरवत म्हणाले,
"मुलांनो, हेड गुरुजी म्हणाले, त्याप्रमाणं माझी बदली झाली आहे. आमच्या गावाजवळच्या शाळेत. मला तिथं हजर व्हायचंय, चार-पाच दिवसांत." त्यांनी ते पत्र
घडी करून खिशात ठेवलं आणि अभ्यास सुरू केला.
दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत गेलो तेव्हा आमच्या गुरुजींनी साहित्याची बांधाबांध केली होती. एका पोत्यात भांडी-कुंडी व एका मोठ्या पिशवीत अंथरूण, पांघरूण, कपडे घातले होते. कोणाच्या तरी बैलगाडीतून बसपर्यंत जाणार असं म्हणत होते. पिशव्या वर्गात ठेवून आम्ही सर्वांनी त्यांच्याभोवती घोळका केला. गुरुजी इतक्यातच बदलीच्या गावी जातील याची कल्पना नव्हती. ते जाऊ नयेत असंही आम्हास वाटत होतं. पण बदली झाली म्हटल्यावर जाणं भाग होतं. बैलगाडी आली. गुरुजी गाडीत बसले. सातवीच्या मुलांनी साहित्य गाडीत ठेवलं. शाळेतील सर्व शिक्षक
व मुले रस्त्यावर येऊन थांबली होती. सर्वांचा निरोप घेतल्यावर गाडीवानाने गाडी पुढे हाकली.
पहिलीपासून तिसरीपर्यंत आमच्या वर्गाचे ते वर्गशिक्षक होते. मन लावून शिकवत असत. त्यांचे हस्ताक्षरही सुंदर होते. वेळापत्रक, अंदाजपत्रक, नावाच्या पाट्या, तक्ते तयार करण्यासाठी त्यांनी बोरूचे टाक बनवले होते. लाल, निळ्या, काळ्या,
हिरव्या रंगाच्या शाईने सर्व वर्गासाठी ते साहित्य बनवत असत, शाळेतच राहात असत. चहा, भात, भाजी, आमटी, स्टोव्हवर बनवत असत. भाकरी तेवढ्या शाळेशेजारच्या घरातून बनवून घेत असत. शनिवारी आम्ही कधी कधी शाळा सुटताना त्यांना भाकरी आणून देत असू त्या घरातून.
"नव्या मॅडम येतील दोन दिवसांत. त्या तुमचा वर्ग घेतील. तोवर तुम्ही पाचवीच्या वर्गात बसा."
हेड गुरुजींनी वर्गात येऊन सूचना दिल्याबरोबर आम्ही आपापलं साहित्य उचलून धूम पळालो. त्या वर्गात
चांगली जागा बसायला मिळावी असं प्रत्येकाला वाटत होतं. दोन दिवस आम्ही पाचवीच्या वर्गात बसलो. पाचवीचे गुरुजी थोडा त्यांच्या वर्गाचा, थोडा आमच्या
वर्गाचा अभ्यास घेत होते. तरीही वरचेवर आम्हांला आमच्या गुरुजींची आठवण येत होती. त्यांच्यासारखं कोणाला शिकवायला येत नाही असं आम्हांला वाटायचं.
तिसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी नव्या मॅडम आल्या होत्या. हेड गुरुजींनी त्यांचे स्वागत केलं आणि आमचा वर्ग नेहमीच्या खोलीत बसेल म्हणून सांगितलं. सर्व मुलं आपापल्या वर्गात गेली. प्राजक्ता मात्र वर्गात न येता हेड गुरुजींना सांगून बाहेर गेली. का कुणास ठाऊक आम्ही वर्गात शांत बसलो होतो. थोड्या वेळाने हेड गुरुजी मॅडमना घेऊन वर्गात आले.
आम्ही सर्वांनी उठून 'नमस्ते' म्हटलं. मॅडमही छान हसल्या. आम्हाला 'नमस्ते' म्हणाल्या. हेड गुरुजी त्यांना सांगत होते,
"मॅडम, हा वर्ग गेली तीन वर्षे आपल्या केंद्रात पहिला आलेला आहे. ती परंपरा तुम्ही सांभाळा. सर्वच मुलं चांगली आहेत. शिवाय यंदा यांना केंद्र परीक्षा आहे. शिष्यवृत्तीही आहे."
मॅडमनी आपली ओळख करून दिली आणि आमची सर्वांची ओळख करून घेतली. इतक्यात प्राजक्ता आली. तिनं आपल्या हातात रुमालाखालून काहीतरी झाकून आणलं होतं. तिने काय आणलं
असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. आम्ही टक लावून पाहत होतो.
प्राजक्तानं रुमाल काढला. एक
सुंदर गुलाबाचं फूल होतं तिच्या हातात. गुलाबी रंगाचं, टप्पोरं. ते फूल तिनं मॅडमना दिलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मॅडमनी प्राजक्ताचीही ओळख करून घेतली. अभ्यास सुरू झाला. थोड्याच दिवसांत आम्ही मॅडममय होऊन गेलो आणि वाटायला लागलं या मॅडमसारखं चांगलं कोणालाच शिकवता येत नाही.
आमच्या शाळेत आलेल्या त्या पहिल्याच मॅडम होत्या. त्यामुळं सर्वांनाच कुतूहल होतं. शेजारच्या वर्गातली मुलं, कधी कधी शाळेशेजारच्या घरातील बाया-बापड्या मॅडम काय शिकवतात? कशा शिकवतात? हे दरवाजातून व खिडकीतून डोकावून पाहत असत.
मॅडमनी बरेच नवीन उपक्रम सुरू केले. हॅपी बर्थ डे, माझा खाऊ मला दया, आमची बचत, पुस्तक वाचू या, अभ्यासातील गमतीजमती असे अनेक उपक्रम होते. नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यांनी
आम्हाला आणखी एक उपक्रम सांगितला.
"आपण वर्गातील मुलं म्हणजे बहीण-भाऊ म्हणून उद्या सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम घ्यायचा. त्यासाठी
फक्त एक रुपया वर्गणी प्रत्येकाची. त्यातूनच राख्या आणि भेटवस्तू आणल्या जातील. समजलं सर्वांना.."
आम्ही 'हो.' म्हटलं.
रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वांनी वर्गणी जमा केली. मॅडम स्वतः दुकानात गेल्या. मुलांच्या संख्येच्या हिशेबाने राख्या व भेटवस्तू घेऊन आल्या. राख्या आम्हा सर्वांना दिसल्या, पण भेटवस्तू मात्र वर्तमानपत्राच्या कागदात बांधल्यामुळं दिसत नव्हत्या. कार्यक्रम सुरू झाला. वर्गाच्या मध्यभागी दोन पाट मांडले. सुंदर रांगोळ्या काढून सजावट केली. एका पाटावर ताटामध्ये छोटी निरांजने. कुंकवाचा गंध तयार करून ठेवलेला होता.
मॅडमनी हजेरी उघडून नंबरप्रमाणे नावं पुकारली. तशी मुलं पुढं येऊन पाटावर बसत मग गंध लावणं, ओवाळणी करणं, राखी बांधणं व मॅडमनी दिलेली भेटवस्तू आपल्याला ओवाळणाऱ्या बहिणीच्या हाती
देणं असा कार्यक्रम सुरू होता. मला राहून राहून सारखं वाटायचं प्राजक्तानंच आपल्याला राखी बांधावी.
माझा नंबर पुकारला. मी समोर गेलो. मॅडमनी भेटवस्तूची पुडी हातात दिली. पाटावर बसलो आणि मॅडम अनपेक्षितपणे म्हणाल्या,
"प्राजक्ता, आता तू ओवाळणी करून राखी बांध"
मला खूप खूप आनंद झाला. प्राजक्तालाही. प्रथम मुली ओवाळत होत्या. राखी बांधत होत्या. त्यानंतर मॅडमही प्रत्येक मुलाला ओवाळत होत्या.
मुलांनी दिलेल्या भेटवस्तू मात्र पुन्हा मॅडमकडे दिल्या जात होत्या. याचं कारण आम्हांला नंतर कळलं. वर्गात मुलं जास्त आणि मुली कमी. त्यामुळं एका मुलीनं दोन-दोन, तीन-तीन भावांना राख्या बांधल्या
व दोन-दोन, तीन-तीन भावांनी एकच भेटवस्तू पुन्हा पुन्हा एका बहिणीला दिली.
या कार्यक्रमामुळं आमच्या वर्गातील बहीण-भावाचं नातं अधिकच घट्ट झालं. पूर्वी जागेवरून, सफाईवरून, वाचनाच्या बारीवरून, खेळाच्या साहित्यासाठी, पुस्तकांसाठी कुरबुर व्हायची. ती पूर्ण
बंद झाली. भांडणं तर बिलकुल बंद.
रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी सर्व मुलींनी भेटवस्तू वापरायची असं मॅडमनी सांगितलं होतं. मुली हेअरपीन केसात घालून आल्या. वेगवेगळ्या रंगाची प्लॉस्टिकची फुले होती. त्यावर 'माझा रंग चांगला आहे.' असं प्रत्येकीला वाटत होतं. मॅडम म्हणाल्या,
"सर्वच फुलं छान आहेत. कारण ती तुमच्या भावांनी दिलेली आहेत."
पाऊस थोडा कमी झाला आणि मॅडमनी आम्हांला सांगितलं, ''उद्यापासून आपला शिष्यवृत्तीचा वर्ग सुरू होणार, पण शाळेत नाही. माझ्या खोलीवर. त्यासाठी सर्वांनी सकाळी ८ वाजता न चुकता यायचं.
आपलं दप्तर घेऊन. दहा वाजता सुटी होईल. मग घरी जाऊन जेवण करून शाळेत यायचं. शिष्यवृत्ती परीक्षेला सर्वांनी बसायचं."
सर्वजण 'हो' म्हणाले. मला मात्र कोडं पडलं. त्या वेळी मी काही बोललो नाही. पण दुपारी मॅडमना सांगितलं,
''मॅडम मला सकाळी थोडं काम असतं. शेळ्यांना खायला झाडपाला आणायला जावं लागतं रानात."
मॅडम म्हणाल्या,
''म्हणून काय झालं. थोडं लवकर ऊठ. भरभर कामं आटोप आणि ये. शिष्यवृत्तीच्या वर्गाला थोडा उशीर झाला तर चालेल; पण तास चुकवू नको. जेवढा अभ्यास राहिला असेल तो पूर्ण कर नंतर."
सवलत मिळाल्यामुळं बरं वाटलं.
जादा तास, शाळेचा अभ्यास सर्व काही व्यवस्थित झाले. शिष्यवृत्ती परीक्षा झाली. केंद्र परीक्षा झाली. निकाल मिळाला. याही वर्षी आमचा वर्ग केंद्रात पहिला आलाच, पण शिष्यवृत्तीमुळं तालुक्यातही नाव झालं.
कारण वर्गातील सर्व मुलं शिष्यवृत्ती परीक्षा देणारा आमचा एकमेव वर्ग होता. प्राजक्ताचा जिल्हयात दुसरा आणि तालुक्यात पहिला नंबर आला होता. माझा जिल्हयात, तालुक्यात नाही पण केंद्रात दुसरा नंबर
होता. एकूण पाच मुलांना शिष्यवृत्ती मिळणार होती. शिवाय बाकी सर्व मुलं चांगले गुण मिळवून पास झाली होती.
तेव्हा ग्रामपंचायतीने आमच्या मॅडमचा सत्कार केला. मॅडमना शाल भेट दिली होती. मॅडमनी ती शाल प्राजक्ताच्या खांदयावर घातली व म्हणाल्या,
"या मुलांच्यामुळे घडलं सगळं." प्राजक्ताचाही सत्कार झाला. तिनं आपल्याला मॅडमनी दिलेली शाल माझ्या
खांदयावर देत म्हटलं, "चंदू घरातील काम आटोपून शिष्यवृत्तीच्या तासाला येत असायचा. त्याला थोडा उशीर व्हायचा. अभ्यास चुकायचा. त्याचा चुकलेला
अभ्यास घ्यायची जबाबदारी मॅडमनी मला दिली होती. त्यामुळे त्याला सांगताना माझा अभ्यासाचा पुन्हा एकदा सराव व्हायचा. म्हणून नंबर माझा आला. याचं श्रेय चंदूलाच."
ती शाल मी अजूनही जपून ठेवली आहे. मी एकटाच. लहान असताना वडील गेले. सख्खे बहीण-भाऊ नाहीत, त्यामुळं खंत असायची. आपल्याला एखादा भाऊ नसेना का पण सख्खी बहीण असावी असे वाटायचं. ते शक्य नव्हतं. चौथीच्या वर्गात असताना मॅडमच्या रक्षाबंधन उपक्रमामुळे
प्राजक्ताच्या रूपानं बहीण मिळाली. तिची आठवण म्हणजे ती शाल...
(क्रमश:)...
_*निवडक-समिक्षणात्मक प्रतिक्रियांना पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत प्रसिद्धी द्यायचा विचार आहे.*_
*चंद्रकांत निकाडे*
No comments:
Post a Comment