. (मासिक ऋग्वेदचे संपादक सुभाषदादा विभुते यांच्या आग्रहास्तव मी माझं बालपण मांडलं. त्यांनी ते आठ भागांत क्रमश: प्रकाशित केलं. त्यानंतर ते लेखन *प्राजक्ताची फुले* या नावाने हृदय प्रकाशन मार्फत बालकादंबरीच्या रूपात प्रकाशित झालं. आता या लाॅकडाऊनच्या काळात दीपकदादा जगदाळे यांच्या आवाहनानुसार ते आपल्यासाठी क्रमश: देत आहे.)
*भाग आठवा:पाचवी*
जून महिना उजाडला. शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ आला. गणवेश जुनाच होता. चार-सहा महिने चालेल असा. पुस्तके, वह्या घेतल्या नव्हत्या. मे महिन्याच्या सुटीत केलेल्या कामाचे थोडे पैसे आजीजवळ साठवले होते. एकनाथकडे जाऊन जेवढे होते तेवढे पैसे दिले. उरलेले नंतर देतो असं सांगून त्याची जुनी पुस्तकं घेतली. प्रश्न वह्यांचा होता. मित्रांच्या जुन्या वया जमा केल्या. त्यातील कोरी पानं बाजूला केली. कशातरी सहा वह्या तयार केल्या. बायडींग मीच केलं. दादासारखं जमलं नाही. पण वह्या तयार झाल्या हा आनंद.
गृहपाठासाठी वह्या हव्या होत्या. त्याबद्दल आईला सांगितलं. आईने थोडे पैसे दिले. त्यात १०० पानांच्या चार वह्या दुकानातून आणल्या. अजून दोन विषयांसाठी वह्या हव्या होत्या.
शाळा सुरू झाली. आमच्या चौथीसाठी असणाऱ्या मॅडम वर्गावर आल्या नाहीत. दुसरे गुरुजी वर्गावर आले. तेच पाचवीचा वर्ग घेणार असं कळलं.
आम्ही सर्व जण नाराज झालो. छोट्या सुटीत प्राजक्ता आणि आम्ही चारपाच जण हेड गुरुजीना ऑफिसमध्ये भेटायला गेलो. आमच्या वर्गासाठी मॅडमनाच पाठवा म्हणून विनंती केली. हेड गुरुजी म्हणाले,
"बाळांनो, मॅडम शिष्यवृत्तीचा अभ्यास छान घेतात. म्हणून त्यांना पुन्हा चौथीचा वर्ग दिला आहे. तुमच्या वर्गासाठी नेमलेले गुरुजी छान शिकवतात. शिवाय यंदा इंग्रजी आणि हिंदी विषय आहेत. त्यासाठी मीही येणार आहे तुमच्या वर्गावर. ते फक्त वर्गशिक्षक म्हणून मराठी, गणित, कला, शारीरिक शिक्षण घेणार आहेत. विज्ञान, इतिहास व कार्यानुभवसाठीही वेगळे शिक्षक असणार आहेत. त्याचे वेळापत्रक तुम्हाला मिळेलच."
प्राजक्तानं आग्रह केला.
"मॅडम फक्त चौथीचा शिष्यवृत्तीचा तास घेऊ देत. वर्गशिक्षक म्हणून आमचा वर्ग द्या."
हेड गुरुजींनी 'तसं करता येत नाही' म्हणून समजावलं. आम्ही नाराज होऊन परत आलो, पण थोड्याच दिवसांत नवीन वेळापत्रक मिळालं. वेगळे विषय, वेगळे शिक्षक. आम्ही अभ्यासात रमून गेलो. अधून-मधून मॅडमना भेटायला त्यांच्या वर्गात जात राहिलो.
अभ्यासाबरोबर गृहपाठही सुरू झाले. दोन-दोन गृहपाठ झाले. माझे नेमके इंग्रजी व हिंदी विषयांचे गृहपाठ वह्या नसल्यामुळे राहिले. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हिंदी व इंग्रजीचे गृहपाठ नाहीत म्हणून हेड गुरुजींकडून छडीचा मार खावा लागला.
काहीतरी केलं पाहिजे असा निर्धार करून त्या दिवशी शाळा सुटल्यावर घरी आलो. रात्री अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं ; माझ्या पिशवीत १०० पानांच्या दोन नव्या कोऱ्या वह्या, एक दुरेघी वही, चित्रकलेची वही आणि नुकत्याच वापरलेल्या रंगीत खडूंची पेटी आढळली. रंगीत खडूंच्या पेटीवरचं चित्र बघितल्यानंतर लक्षात आलं, हे सर्व साहित्य प्राजक्तानंच ठेवलं असणार. पण कधी?
दुसऱ्या दिवसापर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळणार नव्हतं. मला कधी एकदा दुसरा दिवस उजाडतो, प्राजक्ताला विचारतो असं वाटत राहिलं. दुसरा दिवस उजाडला. शाळा भरली. दुपारची घंटा झाली. सुटीत सर्व मुलं जेवणासाठी घरी पळाली. नेहमीप्रमाणं मी खिडकीजवळ उभा राहून बाहेरच्या कुंपणावरच्या चिमण्यांचा खेळ बघत राहिलो. अधून-मधून प्राजक्ता येण्याची वाट पाहत होतो. तिचं घर शाळेपासून जवळ असल्यामुळं ती लवकर यायची. थोड्या वेळानं प्राजक्ता आली. पोपटी रंगाचा एक मोठा पेरू तिनं आपल्या परकरच्या खिशातून काढला. माझ्यासमोर धरला. मी नको म्हणालो.
"का रे? रुसलायस आज?"
तिनं विचारलं.
"नाही. मला सांग या वह्या आणि रंगपेटी तूच ठेवलीस ना माझ्या पिशवीत?"
ती नुसतीच हसली.
"का? कधी ठेवलंस हे साहित्य?"
मी विचारलं. ती म्हणाली,
"तू पेरू घेणार असशील तर सांगेन, नाहीतर नाही."
गृहपाठासाठी वह्या मिळाल्या. रात्री गृहपाठ पूर्ण केले. आज मार खावा लागणार नाही याचा आनंद होताच. परंतु असं दुसऱ्याकडून साहित्य मिळाल्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण होतंय याचं दुःख वाटत होतं.
प्राजक्तानं वह्या कधी पिशवीत ठेवल्या हे कळणं गरजेचं होतं, म्हणून मी पेरू घ्यायला होकार दिला. आणि म्हटलं,
"दे, अर्धा पेरू दे मला."
तिनं चिमणीच्या दातानं म्हणजे परकरच्या आत पेरू ठेवून वरून दाताने त्याचे दोन भाग केले. एक मला दिला. दुसरा अर्धा भाग आपण घेतला. वरून पोपटी हिरवट दिसणारा पेरू आतून गुलाबी रंगाचा होता. तसा पेरू मी पहिल्यांदाच बघत होतो. मी पेरू हातात घेतला आणि पुन्हा विचारलं,
"आता सांग, कधी ठेवलंय हे साहित्य माझ्या पिशवीत?''
"आज वार कोणता?" तिनं विचारलं.
"गुरुवार."
"काल?"
"बुधवार."
"काल दुपारी शाळा सारवण्यासाठी तुम्ही मुलं शेण आणायला गेला होतात. मुली पाणी आणायला गेल्या होत्या. मी पाण्याची बादली घेऊन लवकर आले. तेव्हाच ठेवलं सर्व साहित्य तुझ्या दप्तरात. आता का ? म्हणून विचारशील. माझ्याकडं होत्या जादा वह्या म्हणून ठेवल्या आणि परवा काकांनी मला ब्रशनं रंग द्यायला बाटल्यांची पेटी आणली आहे. म्हणून खडूंचे रंग तुला दिले. सर्वांसमोर दिलं तर मुलं तुला चिडवतील, दुसऱ्याचं साहित्य वापरतो म्हणून, यासाठी गुपचूप ठेवलं साहित्य."
"अगं, पण मी मित्रांच्या जुन्या वहीतील कोरे कागद हवेत म्हणून वह्या मागून घेतोच की, त्यात काय एवढं."
"ते राहू दे. पण मीच साहित्य ठेवलंय हे तू कसं ओळखलंस? हे सांग अगोदर."
"एकदा चित्रकलेच्या तासाला चित्र रंगवताना ते सशाचं आणि कासवाचं चित्र असलेली रंगीत खडूची पेटी मी तुझ्याकडं पाहिली होती. दुसऱ्या कोणाकडेच तसली पेटी नव्हती. तुझी एकटीचीच होती. त्यावरून ओळखलं."
"हुशार आहेस." म्हणून प्राजक्ता गेली. मी पेरू खात खिडकीतून बाहेर डोकावत राहिलो.
एकदा माळावरच्या शेतात उन्हात वाळत घातलेल्या शेंगा राखायला मला आजीनं पाठवलं. जाताना मी आईला म्हटलं,
''आई, मी शेंगा राखत-राखत अभ्यास पूर्ण करतो. तू भाकरी घेऊन ये. तिथंच खाऊन शाळेला जातो."
माळावर पवारांची वस्ती होती. त्या पलीकडं आमचं शेत. वस्तीवरच्या कोंबड्या, कावळे, पोपट आणि वानरं सकाळी शेंगा पळवायला येत. कुणी माणूस जवळ असलं की दबकून जात. कावळे मात्र खूप चलाख. ते आसपासच्या झाडावर अगोदर येऊन बसतात. मग काव-काव आवाज करून राखणदाराचं लक्ष वेधून घेतात. राखणदाराने दखल नाही घेतली, तर एक दोनदा डोक्यावरून घिरट्या घालतात. तरीही चिडीचूप दिसली, तर तिसऱ्या वेळी गुपचूप थोड्या अंतरावर येऊन उतरतात आणि गनिमी काव्याने दोन पायांवर उड्या घेत हळूहळू पुढे सरकतात. जेव्हा चोचीत तीन-चार शेंगा उचलून वर झेपावतात, तेव्हा पंखांच्या आवाजानं राखणदार जागा होतो. त्या वेळी पुन्हा झाडाच्या फांदीवर बसून शेंगा फोडून शेंगदाण्याचा फराळ करणं चालू असलेलं बघायला मिळतं.
राखण आणि अभ्यास चालू असताना आई आली. मी लगबगीने भाकरी खाल्ली आणि आईला म्हटलं,
"आई, दुपारच्या सुटीत खाऊ घ्यायला मला दहा पैसे दे."
आई काही बोलली नाही. माझ्याकडं बघत राहिली. तिच्या मनाची झालेली उलाघाल मला कळत होती. आपल्या मुलानं दहा पैसे मागावेत आणि ते देण्याइतकी आपली ऐपत नसावी असं दारिद्र्य. तिचं अंतःकरण भरून आलं होतं. म्हणून मीच म्हटलं,
"नाहीतर राहू देत. मला तरी कुठं वेळ हाय खाऊ घ्यायला, दुकानात जायला. काल सांगितलेला गृहपाठ लिहायचा राहिलाय थोडा. तो पूर्ण करायला पाहिजे."
असं म्हणत आईची नजर चुकवली. साहित्य गोळा केलं. शाळेच्या वाटेला लागलो. इतक्यात आई जवळ आली. माझ्या डोक्यावरून, गालावरून हात फिरवला. थोडा वेळ उराशी धरलं. न बोलता दोघांचे डोळे पाणावले. आईनं मूठभर शेंगा माझ्या चड्डीच्या खिशात घातल्या. पदराने माझे डोळे पुसले. आपलेही. मी वळून शाळेकडे चाललो.
दुपारी प्राजक्ता आली. माझ्या खिशाकडे बघतच म्हणाली, "आजही मला तुझा खाऊ पाहिजे, दे."
मी खिशातील मूठभर शेंगा तिला दिल्या. त्या चरचरीत वाळलेल्या शेंगा ओंजळीत घट्ट दाबून ओंजळ हलवून येणारा खळखळ आवाज ती कितीतरी वेळ ऐकत होती.
"किती छान आवाज येतोय रे! खळखळ खळखळ."
तिने एक शेंग दाताखाली फोडली. त्यातील टपोरा शेंगदाणा खाता -खाताच म्हणाली,
"डिक्टो बदामच. कुठून आणलास? तुमच्या शेतातल्या? नाव काय या भुईमुगाचं?"
उत्तराची वाट न पाहता पाठोपाठ प्रश्नांची मालिका जोडायची तिला सवयच आहे. ती थांबल्यावर मी म्हटलं,
"या भुईमुगाच्या शेंगा आमच्याच शेतातल्या आहेत. शेंगा काढून झाल्यावर माळाच्या शेतात वाळवायला घातल्यात. मी सकाळी राखण करायला गेलो होतो. तिथूनच शाळेकडे आलोय. येताना आईने तिच्या हातानेच शेंगा खिशात भरल्या. नाव माहीत नाही. आमची आजी 'मुटक्या' शेंगा म्हणते. पीक कमी येतं म्हणून कुणी हल्ली पेरत नाही. पण खायला चवीला, तब्बेतीला चांगल्या आहेत. म्हणून आजी प्रत्येक वर्षी थोड्या शेतात याच शेंगा पेरते.''
"खरंच चांगल्या आहेत हं शेंगा. नाव काय म्हणालास ? 'मुटक्या'. अहं! याला बदामी भुईमुगाच्या शेंगा म्हणायला पाहिजे. सांग आजीला आणि पुन्हा कधी आणल्यास तर मला दयायला विसरू नको. मी पण आमच्या बाबांना अशा शेंगा पेरायला सांगते शेतात."
पाचवीचं वर्षही संपत आलं. प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक, त्यामुळं अभ्यासही खूप. इंग्रजी दुरेघी लेखन, चित्रकला, कार्यानुभव, विज्ञानाचे प्रयोग, हिंदी, इंग्रजी, मराठी कवितांचे पाठांतर असा खूप अभ्यास मनापासून केला सर्वांनी. वार्षिक परीक्षा झाली. निकाल मिळाले. सर्व जण उत्तीर्ण. कुणी ग्रेस नाही, कुणी प्रमोट नाही.
प्राजक्ताचा याही वर्षी पहिला नंबर आला. आणि माझा दुसरा. तेव्हाच माझ्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले. त्यामुळेही दादा, आई, आजी सर्वांना आनंद झाला.
मला मात्र चिंता. आता पुढं कसं? सहावीच्या पुस्तक वह्यांची चिंता होती ती. तसं मी आजीला बोलून दाखवलं. आजी म्हणाली,
"शीक बाळ, तुला शिकायचं तोवर, करू काय तरी व्यवस्था, त्यो परमिसर काय डोळं झाकून बसलाय व्हय, धडपड केल्याबिगर यास मिळतंय का कुठं ! पर धेनात ठेव. हे टाकीचं घाव हैतं. आणि टाकीचं घाव सोसल्याबिगार दगडालाबी देवपण येत नाही. आपूण कुणाचं वाईट करायचं नाही. मग आपल्या वाट्याला कोण जात नाही. सरळ मार्गानं जायाचं. कष्टानं मिळवायचं, म्हणून म्हणत्यात, गड्यासारखं राबावं, मालकासारखं खावावं?"
शिष्यवृत्तीच्या पैशांतून आजीने दादाला सांगून लगेच थोडा ढगळ मापाचा गणवेश आणला.
दादा कोल्हापूरला कामाला जात होता. मे महिन्यात पगार होताच त्यानं या वर्षी न सांगता सहावीचं बरचसं साहित्य आणलं.
(क्रमश:)...
_*निवडक-समिक्षणात्मक प्रतिक्रियांना पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत प्रसिद्धी द्यायचा विचार आहे.*_
*चंद्रकांत निकाडे*
No comments:
Post a Comment