Sunday, 26 April 2020

प्राजक्ताची फुले: भाग सहावा

 तिसरी (पुढे...चालू.)
         संध्याकाळी आई घरी आल्यावर तिला जादूगाराच्या कार्यक्रमाबद्दल, वर्गणीबद्दल सांगितलं. मला कार्यक्रम बघायला मिळाला नाही याचं तिलाही वाईट वाटलं. आई म्हणाली, "सकाळी सांगितलं असतंस तर काहीतरी करून पैसे दिले असते
वर्गणीचे."
         मी म्हटलं, "सकाळी माहीत नव्हतं. दुपारी जेवणाच्या सुटी अगोदर गुरुजींनी वर्गणी आणायला सांगितली होती. पण मी खिडकीखाली बसून कार्यक्रम ऐकला." आई म्हणाली, "सगळी मुलं बघायला होती कार्यक्रम. तू जायचंस आत. गुरुजींना सांगायचं. घरात कोण नाही. वर्गणी उद्या देतो म्हणून. असं का केलंस? पुन्हा चुकवू नको कार्यक्रम. कळलं का?'' मी 'हो' म्हटलं. प्राजक्तानं

जादा वर्गणी आणल्याचंही सांगितलं. कार्यक्रम झाला होता. विचार करून उपयोग नव्हता. तो विषय तिथंच संपला.
         दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळच्या चौकात त्याच जादूगाराचा कार्यक्रम झाला. तो पाहता आला. त्याची हातचलाखी माझ्या लक्षात येत होती. त्याबद्दल शाळेतील मुलांना सांगितलं. बरेच जण चकित झाले. खाऊच्या डब्यात खाऊ कसा येतो? कागदाच्या सुरळीची नोट कशी होते. रिकाम्या तांब्यातून पाणी कसं येतं हे साहित्याशिवाय मी मुलांना सांगितलं आणि बेंदराच्या दिवशी म्हैशीची शिंगे रंगवायला आणलेल्या छोट्या पत्र्याच्या डब्याला खिळ्याने छिद्रे पाडून 'पड रे पाण्याचा' प्रयोगही करून दाखवला. त्यातलं विज्ञान कळत नव्हतं, पण हातचलाखी समजली होती. मोठे झाल्यावर आपणांसही जादूगार होता येईल असं राहून राहून वाटत होतं..
         पावसाळा संपत आला की आमचा आणखी एक उदयोग चालायचा. शाळेजवळच्या 'शेरी' नावाच्या शेतात बांधावर बरीच चिंचेची झाडं होती. मी, शिवा, रंगा, गणपा थोडं लवकर शाळेकडे जात असू. पिशवी पोतं वर्गात ठेवून शेरीत जात असू. तिथं असणाऱ्या 'दत्तू' आजोबाची नजर चुकवून चिंचेच्या झाडावर चढून कोवळ्या चिंचा खिसे भरून आणत असू. शाळा भरण्याच्या अगोदर, बाराच्या सुटीत, मधल्या जेवणाच्या सुटीत वेळ मिळेल तेव्हा सर्व वर्गात फिरून 'पेन्सिलवर चिंचा' विकण्याचा तो उदयोग. मुलींना चिंचा फार आवडायच्या. त्यांना चिंच दयायची बदल्यात तेवढ्याच लांबीची पेन्सिल घ्यायची,संध्याकाळी सर्व चिंचा संपलेल्या असायच्या. प्राजक्तालाही चिंचा आवडायच्या. सर्वांअगोदर मी तिलाच मूठभर चिंचा दयायचो. पण तिच्याकडून कधीही चिंचेच्या बदल्यात पेन्सिली घेत नव्हतो. ती आग्रह करायची, पण मी नाही घ्यायचो.
         कधी कधी पंचायतच्या बाजूला पाराजवळ आम्हा मुलांचा चिंचोके, गजगे, करंजीच्या बिया, आंब्याच्या कोया, कणेरीच्या बिया याचा खेळ चालायचा. चपट्या दगडाच्या कपरीचे दोन व्हट्टे (बल्ले) करून चिंचोके जिंकण्याचा खेळ चालायचा.गुरे घेऊन रानात गेल्यावर दगडाच्या कपरीपासून मी दगडावर कपरी ठोकून दोन गोल-गोल व्हट्टे बनवले होते. माझा नेमही चांगला होता. खेळात जेवढी मुले सहभागी होत त्यांचे आपापले 'व्हट्टे' असायचे. गद किंवा सय म्हणून छोटा खड्डा खणलेला असायचा. सुरुवातीला त्या गदपासून आठ-दहा फुटावर रेषा आखून खेळात सहभागी होणारे सर्वजण चकत असायचो. चकायचे म्हणजे त्या रेषेपलीकडे जाऊन एक व्हट्ट्या गदीकडे टाकायचा. सात-आठ मुले असत. ज्याचा व्हट्ट्या गदीजवळ असेल त्याला पहिल्यांदा खेळायची संधी. प्रत्येकाच्या व्हट्ट्याच्या अंतरावरून मग दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे नंबर ठरायचे. सर्व जण पाच-दहा असे समान चिंचोके, कण्हेरीच्या बिया पहिला नंबर आलेल्या मुलाकडे जमा करत. तो आपले दोन व्हट्टे व त्या सर्व बिया घेऊन रेषेपलीकडे जाऊन ओंजळीने त्या बिया गदकडे फेकत असे. गदीमध्ये पडलेल्या सर्व बिया त्याला मिळत. उरलेल्या बियातील एक अवघड जागेची बी पुढच्या नंबरचा मुलगा दाखवत असे. इतर बियांना स्पर्श न करता व्हट्ट्याने बी अचूक टिपली तर सर्व बिया टिपणाऱ्या खेळाडूला मिळत. दोन्ही व्हट्ट्याने नेम नाही लागला, तर फक्त गदीमध्ये जमा असणाऱ्या मिळत. दाखवलेल्या बीला नेम न होता चुकून दुसऱ्या बिला व्हट्ट्या लागला तर त्याला पाच बियांचा दंड म्हणून द्यावा लागे. त्याला 'हाच्च्या' म्हणत. मग त्या सर्व बिया घेऊन पुढच्या नंबरचा मुलगा खेळत असे. असा एकेक डाव तास-तास भर चालत असे. नेम व व्हट्टे खराब असलेली मुले डावात हरत असत. माझा नेम चांगला होताच शिवाय व्हट्टेही चांगले. त्यामुळे दर वेळी मी जिंकायचो.
         असे डाव जिंकून मिळवलेल्या चिंचोक्यांनी, गजगे, करंजीच्या,कण्हेरीच्या बियांनी, आंब्याच्या कोयांनी एक पोतं भरल होतं. आजीने त्यातील चिंचोके, करंजीच्या बिया दारावर येणाऱ्या व्यापाऱ्याला विकल्या. बरेच पैसे मिळाले. मला प्रश्न पडला, व्यापाऱ्याने ते आपल्या मुलांना खेळायला घेतलं असेल? कशाला घेतलं असेल ? काय केलं असेल त्याचं? मी आजीला विचारलं, ती म्हणाली,
         "चिंचोके खळ तयार करायला घेतात. कागद चिकटवण्यासाठी व घोंगडी, जान तयार करण्यासाठी सणगर लोक खळ वापरतात. करंजीच्या बियांचं तेल काढून औषधासाठी वापरतात. गजगे ही औषधासाठी वापरतात. ते गोल गरगरीत असतात. मुली 'एक लिंबू झेलू' या खेळात ते वापरतात. आंब्याच्या कोया शेतातील बांधावर पेरल्या. त्याची वीस-पंचवीस आंब्याची झाडं तयार झाली. काही झाडांना आता मोहर येऊन कैऱ्यासुद्धा लागतात.
         असंच तिसरीचं वर्ष सरत आलं. जानेवारी महिन्यात शाळेची सहल चालली होती. सहलीसाठी एसटीची बस ठरवायची होती. नाव नोंदणी चालू होती. प्राजक्ता सहलमंत्री होती. तिनं सर्वांत प्रथम पैसे भरले होते. तिसरीपासून सातवीपर्यंतच्या मुलांची सहल मालवण-सिंधुदुर्ग-विजयदुर्ग इथं जाणार होती. पैसे भरून नाव नोंदणीचा कार्यक्रम आठवडाभर चालला होता. तरीही दोन मुलं अजून हवी होती. गुरुजी पालकांना बोलावून मुलाला पाठवण्याबद्दल सांगत होते. पण प्रत्येक जण पैशाची अडचण सांगत होते. वर्गणी फारशी नव्हती. तीस रुपये प्रत्येक मुलास होती. तीस रुपयेसुद्धा तेव्हा डोंगराएवढे वाटत.
         संध्याकाळी मी घरी सहलीचा विषय काढला. आजी म्हणाली,
        "वर्गणी जास्त आहे बाबा. माझ्याकडं तुझे चिंचोके, करंज्या विकून आलेले पंधरा रुपये आहेत. अजून किती लागतात?"
         मी म्हणालो,
         "अजून पंधरा रुपये हवे आहेत."
         कधी नाही ते दादा म्हणाला,
         "माझ्याकडं जत्रेतल्या कुस्तीत बक्षीस मिळालेले पाच रुपये आहेत. हे घ्या." म्हणून त्याने कपाटातून पैसे काढून दिले. आजीने ते घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेला जाताना आजीनं माझ्याकडे वीस रुपये दिले व म्हणाली,
         "गुरुजींना सांग, आठवड्याभरानं उरलेले दहा रुपये देतो म्हणून."
         शाळेत प्रार्थनेच्या वेळी हेड गुरुजींनी सहलीच्या वर्गणीबद्दल विचारले. कुणीही वर्गणी आणली नव्हती. गुरुजी म्हणाले,
         “सहलीला येण्याची इच्छा आहे त्यांनी हात वर करा."
         पाच-सहा मुलांना हात वर केले. मीही हात वर केला. गुरुजींनी सर्वांना विचारणा केली. प्रत्येकाने वर्गणीचे पैसे पुढच्या आठवड्यात देतो असं सांगितलं. मी तिसरीत असल्यामुळे सर्वांत शेवटी मला विचारले. मी वीस रुपये आणल्याचे सांगितले व बाकी उरलेले दहा रुपये नंतर देतो म्हणून सांगितलं.
____ हेड गुरुजी म्हणाले, "ठीक आहे. यादीत नाव घेतो तुझं. मुलांनो आता एकच नाव बाकी आहे. जो सर्वांत अगोदर वर्गणी भरेल त्याला संधी मिळेल."
         प्रार्थना परिपाठ संपल्यार सर्वजण आपापल्या वर्गात गेले. आपल्याला सहलीला जायला मिळणार हा आनंद होता. पण अजून दहा रुपये वर्गणी भरायची राहिलीय. सहलीत खर्चासाठी काही पैसे हवेत ही चिंताही होती. वर्गाच्या दारात प्राजक्ता उभी होती. तिच्याजवळचे पाच रुपये माझ्याकडे देत म्हणाली,
         "हे घे. आणि पाच रुपये देईन उद्या. तुझ्याकडे पैसे आले की परत दे."
         गुरुजी वर्गात आले. हजेरी घेताना त्यांनी सर्व मुलांना विचारलं,
         "खरोखर आणखी कोणाची सहलीला येण्याची इच्छा आहे का?" लहू 'आहे-नाही'च्या विचारात हळूहळू उभा राहिला आणि म्हणाला,
         "मी येणार पण पैसे पुढच्या आठवड्यात मिळतील असं अण्णा म्हणालेत."
         गुरुजींनी मला विचारलं, "तुझ्याकडे किती रुपये आहेत?" मी "पंचवीस आहेत' म्हणून सांगितलं. गुरुजी चकित होऊन म्हणाले,
         "मघा वीस म्हणालास ना?"
         "हो मघाशी वीस होते. प्राजक्तानं पाच रुपये दिलेत आता."
         "मग असं कर हे माझ्याकडचे पाच रुपये घे. लहू तुझेही हे तीस रुपये घे आणि लागलीच नाव नोंदवून या. म्हणजे हेड गुरुजी आजच बस डेपोत जाऊन मुलांची यादी व पैसे भरून सहलीची तारीख नक्की करून येतील."
         गुरुजींनी दिलेले पैसे घेऊन आम्ही ऑफिसमध्ये गेलो. पैसे देऊन दोघांची नावे नोंद केली. दुसऱ्या दिवशी हेड गुरुजींनी प्रार्थनेवेळी सहलीची अठ्ठावीस तारीख नक्की झाल्याचं सांगितलं. तेव्हापासून रोज रात्री मला स्वप्न पडू लागलं. 'पहाट होऊन गेलीय. सकाळी सहाला सहलीची गाडी जाणार होती. मला उठायला उशीर झाला. गडबडीने आवराआवर करून मी शाळेत आलोय आणि वाट बघून बघून सहलीची एस.टी.ची गाडी निघून गेलीय.' आटापिटा करून जमवाजमव करून सहलीची वर्गणी भरली आणि मला न घेताच गाडी निघून गेली. एकदा तर हमसून हमसून रडलोसुद्धा. आईनं झोपेत स्वप्नात असताना हलवून विचारलं,
         "काय झालं बाळ?"
         "सहलीची गाडी गेली."
         "हं झोप गप. अजून दोन दिवस हैत सहल जायला. झोपत सपान पडलं असंल. सहल गेल्याचं."
         आईनं समजावलं न् म्हणाली,
         "एवढी कसली काळजी करतोस. आमी हाय की तुला उठवायला झोप गप."
         शाळेत चर्चा चालायची. सहलीला जाताना काय बरोबर घेणार. पैसे किती घेणार. दोन दिवस चर्चेतच गेले. शिवा म्हणाला,
         "आमचे आबा फरसाण-चिवडा आणणार आहेत."
         लहू म्हणाला,
          "आमची आई चकल्या करून देणार आहे."
         कोणी लाडू घेणार होते, कोणी चिवडा. प्राजक्ता म्हणाली,
         "माझी आई थालीपीठ करून देणार आहे."
         ते थालीपीठ माझ्या मनात घर करून बसलं. घरी गेल्यावर मी आईला म्हटलं,
         "आई मी थालीपीठ कधी खाल्लं नाही. सहलीला जाताना करून देशील?"
         आई माझ्या तोंडाकडं बघत म्हणाली,
         "काय सांगतोय थालीपीठ खाल्लं नाही म्हणून आणि सरावणात मंगळवारी काय खात होतास?"
         मी आठवण्याचा प्रयत्न केला. अचानक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले.
         "दही -धपाटे."
         "लेका ते धपाटे म्हंजीच थालीपीठ!"
         आईनं असं सांगितल्यावर माझं मला हसू यायला लागलं. थालीपीठ म्हणजेच धपाटे याचा शोध लागल्यामुळं.
         २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमच्या वर्गाची पताका कवायत होणार होती. अगोदर आठवडाभर तयारी सुरू होती. गुरुजींनी प्रत्येकास भगव्या कापडाच्या दोन-दोन पताका तयार करून आणायला सांगितले. दादाने हातभर लांबीच्या दोन काठ्या आणल्या. पण भगवं कापड नव्हतं. नवीन कापड घ्यायचं तर कोल्हापूरला जाऊन विकत आणावं लागणार होतं. ते शक्य नव्हतं. दोन दिवस मी नुसत्या काठ्या हातात घेऊन शाळेत सराव केला. पताका नसतील तर कवायतीत भाग घेता येणार नाही असं गुरुजींनी सांगितलं.
         त्या दिवशी रात्री आजी व आईला मी तसं सांगितलं. आजी म्हणाली, "बघू सकाळी." सकाळी उठल्यावर पुन्हा 'माझ्या पताका?' आजीनं गठळ्यातील एका पांढऱ्या धोतराच्या कापडापासून पताका तयार केल्या. मी म्हणालो, "या पांढऱ्या आहेत, कवायतीला चालणार नाहीत."
         आजी म्हणाली,
         "होतील भगव्या, तू दुकानात जाऊन दहा पैशाची हळद आणि पाच पैशाचा चुना घेऊन ये. हे घे पैसे. उरलेले पैसे परत आण."
         मी आजीने दिलेली पावली घेऊन गेलो. तिने सांगितलेल्या दोन वस्तू व सुटे दहा पैसे तिच्याकडे दिले. आजीने एका वाडग्यात हळद व चुना टाकला. थोडं पाणी घातलं. बोटाने मिसळल्याबरोबर गंमतच झाली. पातळ भगवा रंग तयार झाला. मग आजीने त्या पताका वाडग्यात भिजवून रंगवल्या. थोडा वेळ उन्हात ठेवून सुकल्यावर सुई-दोऱ्याने काठीला घट्ट बांधल्या. त्या चौकोनी पताका काठीलाच गुंडाळून मी शाळेच्या पिशवीत ठेवल्या व शाळेला गेलो.
         दुपारी कवायतीच्या सरावासाठी गुरुजींनी आम्हांला पताका घेऊन बाहेर मैदानावर बोलावलं, सराव छान झाला. कडे कवायत, काठी कवायतपेक्षा आमच्या वर्गाची पताका कवायत खडे-बैठे प्रकार खूपच आवडले सर्वांना. केशरी रंगाच्या विविध छटा असलेल्या पताकामुळे, माझ्या पताका थोड्या पिक्कट रंगाच्या होत्या. सायंकाळी शाळा सुटल्यावर प्राजक्ताने त्या मागून घेतल्या व आपल्या मला दिल्या. मी 'का' म्हणून विचारलं, तर म्हणाली,
         "माझे काका कपडे शिवतात, त्यांनी माझ्यासाठी पताकांचे दोन जोड शिवलेत, एक घरात आहे. त्या पताका या काठ्यांना लावून घेईन."
         "या माझ्या आजीने तयार केल्या आहेत. मला आवडल्या आहेत. असू देत ना!"
         "तू कवायत छान करतोस पण पताकांचा रंग थोडा फिकट आहे. म्हणून दिल्या तुला माझ्या पताका. त्यामुळे अजून छान दिसेल तुझी कवायत.''
         दुसऱ्या दिवशी सराव चालू असताना गुरुजींनी 'लीडर' म्हणून मला सर्वांसमोर उभे करून कवायत स्पर्धा झाल्या. आमच्या वर्गाला पहिला नंबर मिळाला. हेड गुरुजींनी छोटी 'ढाल' बक्षीस दिली. लीडर म्हणून ती मी स्वीकारली.    
         परत जाताना चर्चा सुरू होती. माझ्या नव्या पताका बघून शिवा म्हणाला, "या तुझ्या कालच्या पताका नाहीत. नवीन आहेत." रंगा म्हणाला.
         "म्हणून तर तुला 'लीडर' बनवला गुरुजींनी. या पताका प्राजक्ताच्या आहेत.'' गणपानं गुपीत फोडलं.
         "पताकामुळं तो लीडर नाही झाला. त्याची कवायत सुंदर होती म्हणून झाला. आणि आपल्या वर्गाला पहिला नंबर मिळाला. चला आपापल्या घरी. चर्चा बंद!"
         प्राजक्तानं फर्मानच सोडलं. आम्ही घरी गेलो.
         सव्वीस तारखेला सकाळी प्रभात फेरी आणि झेंडावंदन. शाळेकडे जाताना आजीने दहा रुपये दिले, म्हणाली,
         "सहलीची वर्गणी भरायला कोणाकडून उसणे पैसे घेतलेस ते दे. नीट सांभाळून ने."
         मी शाळेत आलो. कार्यक्रम संपल्यावर गावातील पंचायत, डेअरी, सोसायटी यांनी दिलेला खाऊ वाटण्यासाठी आम्हांला आपापल्या वर्गात जायला सांगितलं. वर्गात गेल्यावर गुरुजी आले. सातवीच्या मुलांनी सर्वांना लेमन, पेपरमिंटच्या गोळ्या व बिस्किटे वाटली.
                                    (क्रमश:)...
                          *चंद्रकांत निकाडे*
         (मागील भाग वाचनासाठी shikshanyatra.blogspot.com हा ब्लाॅग पाहा.)
                        _____  _(क्रमश:)_
                          *चंद्रकांत निकाडे*
   

No comments:

Post a Comment