. *तिसरी (पूर्वार्ध)*
सुंदर हस्ताक्षर, नियमित हजेरी माझीही होती. परंतु धाडस, हजरजबाबी व बोलका स्वभाव या अधिकच्या गुणांमुळं दुसरीतही प्राजक्ताचाच पहिला नंबर आला होता. दुष्काळाचं वर्ष सरलं. तिसरीचा वर्ग सुरू झाला, धनाजी नावाचा एक नवीन मुलगा आमच्या वर्गात दाखल झाला होता; तो आमच्याच गावचा,पण तो पहिली-दुसरीत आपल्या आजोळी शिकायला होता. तो आल्यानंतर त्याने 'खरा तो एकची धर्म' ही नवीन प्रार्थना सांगितली. आम्हाला ही दोन वर्षे 'देवा तुझे किती सुंदर आकाश' म्हणून कंटाळा आला होता. मोठ्या उत्साहाने धनाजीने सांगितलेली प्रार्थना म्हणू लागलो.
जून महिन्याच्या शेवटी शाळेत मंत्रिमंडळाची निवड झाली. मुख्यमंत्री सातवीच्या वर्गातील मुलगा झाला. पण दहापैकी दोन मंत्री आमच्या वर्गातले झाले. सहलमंत्री प्राजक्ता आणि गोड आवाजाचा नवीन प्रार्थना सांगितलेला धनाजी प्रार्थनामंत्री. त्या वर्षी प्राजक्ता सहलमंत्री झाल्यामुळे वर्गसेक्रेटरी मी व्हावं असं गुरुजींनी सुचवलं. पण मला भीती वाटायची. वर्गसेक्रेटरी पदाला संमती दिली. फारसं काम नसायचं, पण गुरुजी नसताना वर्गाची जबाबदारी घ्यायची मला भीती वाटायची. वर्ग सेक्रेटरी झाल्यावर सर्वांनीच चांगली मदत केली.
सुटीच्या दिवशी गुरं चारायला शेतात गेल्यावर मातीच्या विविध वस्तू बनवायला शिकलो. त्यातूनच मी एक गणपतीची मूर्ती बनवली. शाळेत गुरुजींना दाखवायला घेऊन गेलो. डोके मोठे त्यामानाने हात पाय लहान होते. डोळे, बोटे यांना रेखीवपणा नव्हता. रंग नव्हते. केवळ लाल मातीचा चिखल मळून मूर्ती केली होती. तरी हातभर उंचीची होती.
आजीच्या आग्रहामुळे मी ती गुरुजींना दाखवायला शाळेत घेऊन आलो होतो. आईने एका रंगीत प्लॅस्टिकच्या पिशवीने झाकून ती माझ्या हातात दिली होती. सर्व मुले 'प्लॅस्टिकचा कागद उघडून काय आहे दाखव' म्हणत होती. काहींनी विविध प्राण्यांची नावे घेऊन अंदाज केला होता. गुरुजी वर्गात आल्यानंतर मी ती मूर्ती टेबलवर ठेवली. गुरुजी चकित झाले. त्यांनी पुढे येऊन पटकन् कागद वर उचलला.
"गणपतीऽऽ" सर्व मुले एक सुरात ओरडली. गुरुजींना खूप आनंद झाला. "छान आहे मूर्ती. मुलांनो, टाळ्या वाजवून अभिनंदन करा." म्हणताच टाळ्यांचा पाऊस पडला. तो आवाज ऐकून हेड गुरुजी वर्गात आले. त्यांनी टेबलावरची मूर्ती पाहिली.
"कोणी तयार केली?"
असं त्यांनी विचारलं. गुरुजींनी माझं नाव सांगताच ते म्हणाले,
"वा! फारच छान, आपण यंदा आपल्या शाळेतील गणेशोत्सवाला याच मूर्तीची प्रतिष्ठापना करू. हा आमच्या मित्राचा मुलगा आहे. याचे वडील नाटकात सुंदर काम करायचे. पेटी-तबला वाजवायचे. भजनही सुंदर म्हणायचे. त्याच्या अभ्यासाकडं लक्ष ठेवा हं."
मला खूपच आनंद झाला. मी बनविलेली साधी मातीची मूर्ती गणेशोत्सवात स्थापन होणार या गोष्टीचा वर्गातील सर्वच मुलांना अभिमान वाटला होता. आमच्या वर्गात कुंभार समाजातील एक मुलगा होता. त्याला गुरुजींनी विचारले,
"भिमराव, तुम्ही करत नाही का गणपतीच्या मूर्ती?"
प्रश्न विचारल्याबरोबर भीमा उभा राहिला. हाताची घडी करूनच त्यानं सांगितलं,
"नाही, आमच्या कुंभारवाड्यात पंचमीला मातीचे नागोबा करतात. बेंदराला बैलजोड्या बनवतात. काळ्या मातीचे गणोबा बनवतात. संक्रांतीला लोटकी बनवतात, पण कोणाच्याच घरी रंगीत गणपती तयार करत नाहीत. आमचे आजोबा म्हणतात. आपल्या वाड्यात रंगीत गणपती तयार केले तर वाड्यातील कोणी तरी मरतो. म्हणून घाबरून कोणीच बनवत नाहीत रंगीत गणपती. गौरीचे मुखवटेही बनवत नाहीत."
तिसरीत आम्हाला मातकामाचा कार्यानुभव व कला हे विषय सुरू झाले. माती मळून तिच्यापासून चिमणी, उंदीर, बैल, घोडा, उंट असे प्राणी बनवायला आंबा, पेरू, सिताफळ, केळी अशी फळं बनवायला गुरुजींनी शिकविले. आठवड्यातून एक दिवस हा तास असायचा. तो दररोज असावा असं आम्हांला वाटायचं. खडे नसलेली वारूळाची माती जमा करणं, ती मळून चिखलाचे लाटे बनविणे व वस्तू बनविणे अशी स्पर्धाच लागायची सर्व वर्गात.
चित्रकला, कागदकाम, मातकाम, रांगोळी यांचं शाळेत प्रदर्शन भरवलं होतं. गणेश चतुर्थीला आमच्या वर्गाची मातीची खेळणी सर्व मुलांना आवडली. सातवीच्या मुलींनी काढलेल्या रांगोळ्याही सुंदरहोत्या. सहावीच्या वर्गातील मुलांची चित्रे भिंतीवर टांगली होती. मुलांबरोबरच गावातील लोकांनाही प्रदर्शन बघून मुलांचं कौतुक केलं. पाचवीतील मुलांनी काड्या व आगपेट्या, रिकामी औषधाची खोकी यांपासून बनवलेली एकवीस डब्यांची आगगाडी वर्गात मध्यभागी ठेवली होती. समारंभात तबला, पेटीच्या साथीनं चौथीच्या मुलांनी छान गाणी म्हटली.
या कार्यक्रमाला सरपंच पाहुणे म्हणून आले होते. सुंदर गणपती बनवल्याबद्दल हेड गुरुजींनी मला रंगीत चित्रांचं पुस्तक आणि आमच्या वर्गशिक्षकांनी वही, पेन पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस म्हणून दिले.
सायकलवरील कसरतपट्ट, पेन-पेन्सिलीचे विक्रेते, जादूगार, नकलाकार, रंगीत कागदाच्या विविध वस्तू बनविणारे कलाकार, रंगीत दोरे व सुया यांच्या साहाय्याने कापडावर नक्षीकाम शिकविणारे कारागीर हे लोक किमान वर्षातून एकदा शाळेला भेट देत असत. आपली कला सादर करत असत. सोबत आणलेली पुस्तके, वस्तू विकत असत. जे वस्तू विकत नसत त्यांच्यासाठी मुलांकडून पाच-दहा पैसे वर्गणी जमा केली जाई. शिक्षकही काही रक्कम बक्षीस देत असत. पैशाबरोबरच धान्यही वर्गणी म्हणून ते घेत.
अशाच एका जादूगाराचा कार्यक्रम दुपारी होता. त्यासाठी जेवून येताना प्रत्येकाला वर्गणी आणायला सांगितली होती. मी घरी गेलो. घरात कुणीच नव्हतं. आईनं सोप्यात निखळ्या पाटीखाली जेवण झाकून ठेवलं होतं. पाटीवरचा वरवंटा उचलून बाजूला ठेवला. भाकरी आणि वाटीत डांगर कालवून ठेवलं होतं. मला शिवाची आठवण झाली. त्याला डांगर फार आवडायचं, जर्मनच्या ताटलीत भाकरी व डांगराची वाटी घेऊन मी दार लोटून सरळ शिवाच्या घरी गेलो. शिवा बाहेरच्या सोप्यातच जेवत होता. मी त्याला डांगर घेऊन आलोय म्हटल्यावर खूप आनंद झाला. त्यानं ताटातला तळलेला मासा काढून आईकडं दिला. मी मासे-मटण खात नाही हे त्याच्या आईला माहीत होतं. डांगराची वाटी शिवाला दिली. शिवानं अर्ध डांगर घेतलं. वाटी मला परत दिली. शिवाच्या आईनं चार गोड लिंबूच्या लोणच्याच्या फोडी दिल्या. वाटी-वाटीभर दूध दिलं. थोडा थोडा भातही दिला. बोलत बोलत जेवण आटोपून हात धुवून मी बाहेर पडलो. तेव्हा शिवा आईकडे जादूगाराच्या वर्गणीसाठी पैसे मागत असल्याचं ऐकलं.
आमच्या घरात कुणीच नव्हतं. मी ताटली सोप्यात ठेवली. आतल्या घराला कुलूप होतं. वर्गणीसाठी पैसे मिळणार नव्हते. बराच वेळ घरातच बसून होतो. बिन पैशाचं शाळेला कसं जायचं म्हणून थांबलो होतो. जावं की नको हे कोडं सुटत नव्हतं. बऱ्याच वेळानं हळूहळू शाळेकडे गेलो. जादूगाराचा कार्यक्रम ऑफिस जवळच्या सातवीच्या वर्गात चालू होता. मी शाळेच्या मागील बाजूने जाऊन खिडकीजवळ थांबलो. खिडक्या बंद होत्या. फटीतून काही दिसत नव्हतं. जादूगाराचा आवाज मात्र ऐकू येत होता. "काली काली कलकत्तेवाली, छू मंतर."
मी खिडकीच्या खाली बसून ऐकत राहिलो. आवाज ऐकून आत काय चाललं असेल याचा अंदाज करत राहिलो. तासाभरानं कार्यक्रम संपला. पाच वाजायला आले होते. आमच्या वर्गाबाहेरील कुंपणातील बाभळीची सावली रस्त्यापर्यंत पोहोचली होती. ती अर्ध्या रस्त्यावर गेली की शाळा सुटत असे. सावली पुढे पुढे सरकत होती. ते बघत राहिलो. शाळेत पिशवी आणि बसण्यासाठी आणलेलं पोतं होतं. घंटा झाल्यावर ते घेऊन घरी जायचं होतं.
एकदाची घंटा झाली. त्याबरोबर शाळेसमोर येऊन वर्गाकडे चाललो. गुरुजी दारातच भेटले. त्यांनी 'का आला नाहीस?' म्हणून विचारलं. गुरुजींच्या पाठोपाठ मुले बाहेर पडत होती. कार्यक्रमाची चर्चा चालू होती. जादूगाराने रिकाम्या डब्यातून खाऊ काढला. कागदाच्या सुरळीपासून नोट बनविली. कागदाचे कपडे खाऊन तोंडातून रंगीत कागदाचे भेंडोळे बाहेर काढले. पत्यांची जादू दाखवली. हातचलाखीचे प्रयोग दाखवले. अशी चर्चा करत बाहेर पडणाऱ्या मुलांत शिवाही होता. त्यानेही विचारले,
"जादूचे प्रयोग बघायला का आला नाहीस?"
म्हणून मी त्यालाही डोके दुखत असल्याचे खोटे कारण सांगितले. शाळेची पिशवी व पोते घेऊन वर्गाबाहेर आलो. बाहेर प्राजक्ता आपल्या मैत्रिणींसह थांबली होती. मी जवळून जाताना मला अडवत म्हणाली,
"गुरुजींना आणि शिवाला डोकं दुखत होतं म्हणून खोटं सांगितलंस ना? मला माहीत आहे डोकं-बिकं काही दुखत नव्हतं तुझं, वर्गणीचे पैसे नाहीत म्हणून आला नाहीस. पण मी डबल पैसे आणले होते. तुझी बराच वेळ वाट पाहिली. हे बघ." म्हणून तिने परकरच्या खिशातून अधेली (पन्नास पैशाचं नाणं) काढून दाखवली.
आपलं खोटं बोलणं उघड झाल्यामुळं ओशाळलो. तिने पुन्हा विचारलं, "खरं सांग. डोकं दुखत होतं तुझं?'' मी तिची नजर चुकवून मानेनेच नाही म्हटलं.
प्राजक्ता म्हणाली,
"पुन्हा असं करू नको. मी तुझीही वर्गणी आणेन. कधीतरी कार्यक्रम बघायला मिळतात. चुकवू नकोस."
अशी सक्त ताकीद देऊन ती घरी जायला निघाली. मी पळत जाऊन मुलांच्या गटात सामील होऊन घरी गेलो.
_____ _(क्रमश:)_
*चंद्रकांत निकाडे*
Sunday, 26 April 2020
प्राजक्ताची फुले : भाग पाचवा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment