Saturday, 23 May 2020

महामारी

.            *महामारी*

गाव गाठण्यासाठी सगळे धडपडत होते
पोटाची खळगी भरण्याचा
भरवसा असलेली मशिनेच बंद झालीत
या शहरातली नि वस्तीतलीही
मजूर, कारागीर, कामगार 
जमेल तितकं सामान आणि 
असतील सोबत तर बायको-मुले घेऊन
जिथून तोडली होती नाळ जगण्यासाठी

जीव गुंतलेलाच होता त्या
एकर-दोन एकर, बिगाभर जमिनीत
पेरणीपासून खळ्यापर्यंतचा प्रवास
ज्वारी-बाजरी, भात-मका, गहू-हरभरा
निंदणी-खुरपणी, पैरा-वाटण्या, 
तंटा-बाचाबाची, हातघाई-हाणामारी
कधी सग्यांसोबत, तर कधी परक्याबरोबर
दाराघरांत-रानामाळात-लग्नमंडपात 
दुष्काळ-महापुरातही
दादा-अण्णा, बापू-अप्पांनी
केलेली मध्यस्ती आणि दिलजमाई

जिथून तोडली होती नाळ जगण्यासाठी
नाहीतर इथं सलाईनवरचे मढी होऊन
टाचा घासत तडफडण्यापेक्षा 
लाख बरे !
नुकतीच रुजत आलेली
सगळी पाळंमुळं तोडून चाललेत 
"मायभूमीतल्या मातीतच सोडू
अखेरचा श्वास" या निर्धाराने.
                            *रमेश*
_(गुलज़ार यांच्या 'महामारी'चा मुक्तानुवाद)

No comments:

Post a Comment