Saturday, 23 May 2020

समाजमनाचा कॅमेरा १००

बालकुमारांसाठी प्रेरणादायी व प्रयोगक्षम एकांकिका :समाजमनाचा कॅमेरा १००

   प्रा. रामदास केदार, उदगीर 

समाजात वावरताना कटू आणि गोड प्रसंग डोळ्यासमोर घडत असतात. पण काही प्रसंग असे असतात की मन सुन्न करणारी. अशीच सध्याच्या जगात वावरतांना माणसांच्या नैतिकमूल्याची घसरण कशी होते आहे याचे वास्तविक चित्रण रंगमंचावर उभा करण्याचा प्रयत्न प्रशांत दळवी यांनी केलेला आहे. 
         प्रशात दळवी कोल्हापूर जिल्ह्यातील शहापुरी येथे आंतरभारती शिक्षण मंडळाच्या वि. स. खांडेकर प्रशालेमध्ये उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचा नाटक व एकांकिका विभागातून भा. रा. भागवत पुरस्कारासह इतरही मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 
         समाजातील शाळाबाह्य मुले व वाढते रस्ते अपघात या पार्श्वभूमीवर आधारित प्रेरणादायी व प्रयोगक्षम ही बाल एकांकिका आहे. समाजमनाचा कँमेरा १००या शिर्षकातचा थोडासा उलगडा केला तर तो १०० म्हणजे पोलिसांना संदेश देण्यासाठीचा फोन नंबर आहे. लेखकाच्या अवती भोवती घडत असताना सूक्ष्म निरीक्षणातून या नाटकाचे भावविश्व अधोरेखित झाले आहे. शाळाबाह्य मुलांच्या समस्येवर तर प्रकाश टाकतेच पण रस्ता ओलांडताना अपघात झाल्यानंतर त्याला दवाखान्यात न घेऊन जाता त्यांच्या फोटो आणि सेल्फी काढून व्हाँटसप वर चर्चाकरणा-याचचं पीक कसं जोमान वाढतयं. या नाटकातून समाजव्यवस्थेचे भेसूर आणि बकाल चित्रण मांडत असतानाच अशा समस्येवरील उपायदेखील अंतर्मुख करीत जातात. हा उपाय मुलांना खूप प्रेरणादायी ठरणारा आहे. या नाटकात चार भाग असून समाजाचे भान राखून ऊन पावसात सेवा करणा-या एका पोलिस अधिका-या भोवती यातील पात्र फिरते आहे. या एकांकिकामध्ये लंगडा, मुका, आंधळा आणि बूटपाँलिशवाला अशी महत्त्वाची पात्र आहेत. 
     ह्या पोलिस अधिकारी साहेबांची जेवनाची वेळ झाली की, डब्बा सोडताच समोर दररोज भिकारी मुलं भीक मागत उभा राहतात. रोज वांग्याची भाजी अन करपलेल्या भाकरी खाऊन कंटाळलेला अधिकारी लंगड्याला एक रुपया देतो, मुका येतो त्याला एक रुपाया देतो, आंधळा येतो त्यांना पण  खिशातून एक रुपया देतो. हे दर दिवशी ठरलेलं. कधी कधी हा साहेब कंटाळतोही. तो मनाशीच बोलू लागतो. लंगडा झाला, मुका झाला, आंधळा झाला माझ्या खर्चाचे पाच रुपये सुद्धा काही शिल्लक ठेवू नका. असे मनाशी बोलत साहेब बूटपाँलिशवालाकडे जातो. पाँलिशवाला म्हणतो ,साहेब खूप दिवस झाले. तेव्हा साहेब म्हणतो, रोजच्या धावपळीत राहून जाते. या धावपळीतही हा साहेब आपले कार्य खूप चांगल्याप्रकारे बजावत असतो. 
        खरे तर मुका, आंधळा, आणि लंगडा हे शाळेला न जाणारी शाळाबाह्य मुले असतात. तर पाँलिशवाला दिवसभर पाँलिश करुन रातशाळेत शिकायला जातो. शाळा शिकून काय करायचं? दररोज भीक मागून भरपूर पैसा जमा होतोय यातच मोठा आनंद त्यांना वाटत असतो. लंगडा हा लंगडा नसतो. आंधळा हा आंधळा नसतो आणि मुका हा मुका नसतो. फक्त भीक मागून पैसा जमा करण्यासाठी त्यांची ही सगळी नक्कल आणि बहाणा असतो. पाँलिस करणारा विनंती करतो शाळेला येण्याची मात्र ते ऐकत नाहीत. उलट पाँलिशवाल्यालाच म्हणतात, अरे, आमच्याबरोबर चल,काही काम न करता फुक्कटचे पैसे मिळतील, वडापाव मिळेल, हाँटेलात खायाला मिळेल. असाच यांचा दैनंदिन क्रम सुरु असतो. 
     नाटकाचा दुसरा प्रवेश वाचतांना मात्र अंगावरती शहारे येतात. वास्तविक आणि समाजातील हुबेहूब चित्रण लेखकांनी उभे केले आहे. ही भीक मागत येणारी मुलं शाळेत का जात नाहीत? आज कुठ दिसत नाहीत, नाहीतर लागलीच माग. असा विचार करत असतानाच रोडवर मागून वेगात गाडी येऊन साहेबाला धडकते. साहेब वाचवा .. वाचवा .. मेलो ..मेलो... पाणी असा ओरडतांना आजूबाजूला असलेली चार पाच येतात. पहिला मोबाईलमध्ये शूटिंग करु लागतो.दुसरा माणूस फोटो काढतो, तिसरा माणूस सेल्फी काढण्यात तर काही बोटातली अंगठी, खिशातले पाकीट घेण्यात पटाईत असतात तर काही जण काढलेले फोटो व्हाँटसप् वर पाठवण्याच्या स्पर्धेत असतात. माणसात माणूसकी राहिली नसून ती किती खालच्या पातळीवर गेली आहे. हे वास्तव रंगमंचावर लेखक उभा करतो आहे. 
          नाटकातील तिस-या प्रवेशात माणूसकीचे दर्शन घडते पण ते त्या मुका, आंधळा, लंगडा आणि पाँलिशवालाकडून. बूट पॉलिश, बूट पॉलिश असे ओरडत येत असताना साहेबांचा अपघात पाहून कुठेतरी पाहिलयं असे मनाशी वाटते. अशातच हे भीक मागणारी मुलं येतात. त्यांना ही फोटो, सेल्फी काढणारी माणंस जवळ येऊ देत नाहीत. बाजूला हो, दिसत ना का? आम्ही फोटो काढत असलेलं?  चौघांनाही खूप राग येतो या माणसांच्या वृत्तीचा.आता काय करायचं? असा विचार करत असतानाच बूटपाँलिशवाला म्हणतो. अरं ये मुकया तुमचे मोबाईल काढा अन् लाव फोन एक शून्य शून्याला.पोलिसांना सांग अपघात इथे झाला म्हणून. आंधळ्या तू एक शून्य आठ ला लाव रुग्ण वाहिका येईल. अन् तू लंगड्या साहेबाला पाणी पाजवण्याची सोय कर. क्षणात गाड्या येतात बाजूची सेल्फी काढणारी पळून जातात. अन् ही चौघेच राहतात. मुका म्हणतो, पोलिसमामा मीच फोन केला होता. माणसं साहेबांना वाचवायचं सोडून फोटो आणि सेल्फी काढत बसली होती. या प्रवेशातून मुलांना चांगला धडा घेता येतो.साहेब बरा होतो आणि पुढच्या प्रवेशात या तिघांचा सत्कार होतो. त्या सत्काराच्या वेळी एक पोलिस अधिकारी भावूक होऊन बोलाय लागतो. दिवसाला शेकडो अपघात होतात. पण अपघात झाल्यावर बघ्याची गर्दी जमते. सर्वजण मोबाईल काढून फोटो व सेल्फी काढतात. व्हाँटसप् व फेसबुकवर ही शेअरिंगही करतील पण १०० हा आकडा लाऊन आम्हाला कळवत नाहीत. का इतके भिताता आम्हाला कळत नाही पण ह्या भीक मागणा-या मुलांनी खूप छान काम केले आहे. एका अधिकाऱ्याचा जीव वाचवला आहे. म्हणून यांना दत्तक घेऊन आम्ही शाळेत यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवणार आहोत. चौघानाही आनंद होतो. या सत्कारामुळे नवी दृष्टी मिळाली असे यांना वाटू लागले. 
       जाणिवेतून नेणिवेकडे नेणारे हे बालनाट्य सर्वानी पहावे असेच आहे. ही करमणूकप्रधान नाही तर प्रेरणादायी आहे. लेखक म्हणतो की, निरनिराळ्या सामाजिक परिस्थितीतील मुले शाळेत आली पाहिजेत. नुसती शाळेत येऊन उपयोगाची नाहीत तर ती टिकली पाहिजेत. आणि नुसती टिकून उपयोगाची नाही तर ती उत्कृष्ट शिकली पाहिजेत. त्यांच्यावर शाळेत प्रेरणादायी चारित्र्यक्षम संस्कार होणे गरजेचे आहे. या जाणिवेतून ही एकांकिका साकारलेली आहे. एक समाजातील वास्तविक चित्रण बाल एकांकिका मधून  प्रशांत दळवी यांनी रंगमंचावर उभे केले आहे. रुपाली धूम यांनी सुंदर मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रकाशक चंद्रकांत निफाडे यांनी या पुस्तकाची सुंदर निर्मिती केली आहे. लेखक प्रशांत दळवी यांच्या पुढील लेखनास व प्रयोगास खूप खूप शुभेच्छा!

          प्रा. रामदास केदार 
          ९८५०३६७१८५

समाजमनाचा कॅमेरा १००
(बाल एकांकिका) 
लेखक -प्रशांत दळवी 
  मो. ७३८५८५६७४६
हृदय प्रकाशन, पोहाळे 
पृष्ठे :३६,मूल्य :५०रु.

No comments:

Post a Comment