*उंड्रीच्या वैष्णवीने उमटविली
कवितेची 'मोहर'*
___________________________
डॉ. सुरेश सावंत,
नांदेड.
खेड्यापाड्यातल्या, वाडीतांड्यावरच्या, कष्टकरी वर्गातील ज्या मुलामुलींच्या हाती पूर्वी नांगर, वखर, कुळव, तिफण, विळा, कोयता, कुर्हाड अशी अवजारे आणि शस्त्रे होती, त्याच हातात आता लेखणीचे धारदार शस्त्र आले आहे. या लेखणीच्या माध्यमातून ते आता आपले भावविश्व अभिव्यक्त करत आहेत.
कु. वैष्णवी युवराज सुतार ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील उंड्री नावाच्या छोट्याशा खेड्यात सातवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने आपल्या 'मोहर' ह्या कवितासंग्रहासह मराठी काव्यप्रांतात पदार्पण केले आहे. पन्हाळा तालुक्यातील पोहाळे ह्या गावच्या हृदय प्रकाशनाने मार्च २०२० मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
'सगळ्या फुलांचे मिळून
एकच फूल असते
कारण मूल हे तर
देवाघरचे फूल असते!'
इतकी तरल आणि निरागस कविता वैष्णवी लिहिते.
राजर्षी शाहू महाराज, रंकाळा जोतिबा आणि पन्हाळा हे कोल्हापूरचे मानबिंदू आहेत. हे कु. वैष्णवीच्या कवितेचेही मानबिंदू बनले आहेत. कु. वैष्णवीच्या कवितेला निसर्गसौंदर्याचे वेड आणि आकर्षण आहे. रंकाळा, आवडतं फूल, डोंगर, फुले, झाड, पाऊस, किल्ला इ. कवितांमधून हे सौंदर्य प्रतीत होते.
'बालपणी आम्हां वाटे
कधी व्हायचे आम्ही मोठे?
मोठे झाल्यावर कळतात
मोठेपणाचे तोटे!'
असे अनुभवाचे बोल वैष्णवी सहज लिहून जाते. बालपणीचे निर्भेळ सुख गमावले, याची सल ह्या शब्दांतून व्यक्त झाली आहे.
वैष्णवीच्या कवितेला ध्येयाचा ध्यास आहे आणि जीवनाची जाणीव आहे. म्हणूनच ती म्हणते :
'असतात सगळ्याच वाटा, पण
कुठं जायचं माहीत नसतं
प्रगतीची वाट शोधून
ध्येयापर्यंत पोहचायचं असतं'.
प्रगतीच्या वाटा वैष्णवीच्या कवितेला खुणावत आहेत, असे दिसते.
आई, वडील, गुरू, आजी ही तिची श्रद्धास्थाने आहेत. घराचं घरपण कशात आहे, हे कवयित्रीला नीट समजले आहे.
'भय सोडून देतो
तोच खरा बलवान होतो!'
यासारख्या ओळी या कवितेला वेगळीच उंची प्रदान करतात.
आईवडिलांचा आनंद हेच खरे पारितोषिक असते, ही बाब बालवयातच वैष्णवीला उमजली, ही फार मोठी गोष्ट आहे!
'लेक आनंदाचा झरा
लेक मोकळा रानवारा!'
ह्या ओळींतून कवयित्रीने लेकीचे आनंदस्वरूप अधोरेखित केले आहे. महापुरापासून टिकटॉकपर्यंत नानाविध विषय तिच्या कवितेच्या कवेत आले आहेत. वैष्णवीची कविता ही श्रावणातल्या पहाटेसारखी नितांत सुंदर आहे!
एकीकडे वयाने वाढलेले ज्येष्ठ बालसाहित्यकार बालकांच्या मृदू भाषेत हलक्याफुलक्या विषयांवर कल्पनारम्य बालसाहित्य लिहीत आहेत आणि दुसरीकडे वैष्णवीसारखे कोवळे बालसाहित्यकार प्रौढ आणि प्रगल्भ भाषेत जीवनाविषयी आणि भोवतालच्या परिस्थितीविषयी गंभीर चिंतन मांडत आहेत. असे का होते आहे, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे!
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांनी ह्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तावनेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे वैष्णवीची कविता ही वाचनीयतेची आणि चिंतनशीलतेची साक्ष देणारी कविता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा शुभेच्छा संदेश ह्या पुस्तकाला लाभला आहे.
बाळ पोतदार यांचे देखणे मुखपृष्ठ आणि आतील कविताचित्रे पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालतात. वैष्णवीचे हे पुस्तक प्रकाशित व्हावे यासाठी तिचे उपक्रमशील शिक्षक गुलाब बिसेन यांनी विशेष पुढाकार घेतला. ग्रामीण भागातील प्रतिभेचा हा 'मोहर' गळून जाऊ नये, तो फलद्रूप व्हावा यासाठी शिक्षकांनी असे प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात असे उपक्रम मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत, हे निरीक्षण येथे नोंदवायलाच हवे!
वैष्णवीची कविता कोल्हापूरच्या मातीचा कस आणि गंध घेऊन आली आहे. शब्दांशी जोडलेले हे सख्य सांभाळले, तर वैष्णवी पुढच्या काळात एकूण मराठी कवितेवर आपल्या नावाची 'मोहर' उमटवील, असे वाटते.
कु. वैष्णवीच्या काव्यप्रवासाला हार्दिक शुभेच्छा!
'मोहर' (कवितासंग्रह)
कवयित्री: कु. वैष्णवी युवराज सुतार
प्रकाशक : हृदय प्रकाशन पोहाळे,
ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
पृष्ठे : ५८ मूल्य रु. ५०.
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
Sureshsawant2011@yahoo.com
No comments:
Post a Comment