Sunday, 13 September 2020

कालाय तस्मै नम:

कालाय तस्मै नम:

हातांच्या बोटांवरील ठशांच्या स्पर्शांनी
किंवा डोळ्यांतील
निळ्या-काळ्या बाहुल्यांच्या
छेदरेषांच्या हालचालींनी
मोबाईलच्या स्क्रिनसारखे
अनलाॅक झाले असते
जीवनातले सर्वच
भौतिक आणि जटील प्रश्न
तर
नऊ ठिपक्यांचे पॅटर्न मांडून
ते पुन्हा सोडविण्यासाठी
कुण्या माईंच्या लालाने
बोटेघाशी केली असती सुखासुखी ?
उत्तरे माहीत असणाऱ्या
प्रश्नांची सोडवणूक करण्यात
गुंतलेले साधू
आणि अनामिउत्तरांच्या
प्रश्नांना कवटाळून हयातभर
बेफिकीर उंडारणारे मस्तमौला
दोन्ही एकाच जातकुळीचे
वारसदार तर नाहीत ना !
"नरो वा; कुंजरो वा !"
म्हणण्यापूर्वीच जमिनीत रुतलेले
युधिष्ठिराचे रथ
आणि स्वरहीन मारू अनंतविजय
किती पिढ्यांना उद्धरणार ?

                          *© रमेश*

No comments:

Post a Comment