Sunday, 29 November 2020

विरामचिन्हे

पूर्णविराम ( . ) (Full Stop) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा० अ) मी मराठी बोलतो. ब) हे चिन्ह संक्षिप्त रूपाशेवटीही वापरतात. उदा० वि.स. खांडेकर यात विष्णूऐवजी वि. आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह काढले आहे.

स्वल्पविराम ( , ) : एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदा० अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट व काकडी आहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.

अपूर्णविराम (:) (इंग्रजीत Colon) : जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात. उदा० मुरव्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.

अर्धविराम ( ; ) (इंग्रजीत Semi Colon) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते० उदा० १. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. २. इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.

उद्गारचिन्ह ( ! ) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा! किती सुंदर फुले आहेत! अभिनंदन! अशीच प्रगती करा. अनेकदा एकापाठॊपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.

प्रश्नचिन्ह ( ? ) : एखद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

एकेरी अवतरणचिन्ह(‘…’) : एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी दोन उलट-सुलट एकेरी अवतरणचिन्हे वापरतात. जसे — मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात. उच्चारलेला शब्द मुळाबरहुकूम-जशाच्या तसा लिहून दाखवायचा असेल तर त्या शब्दाआधी व नंतर एकेरी अवतरणचिन्हे असतात. ही चिन्हे उलट-सुलट स्वल्पविरामांसाखी दिसतात.

दुहेरी अवतरण चिन्ह(“…”) : बॊललेले वाक्या मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी विराम चिन्ह' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे"असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.

संयोग चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पति-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.

'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते. उदा० १). ४-५ (चार ते सहा/चार किंवा पाच). २). कालावधी दाखविण्यासाठी. उदा० १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.

तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा० दिनांक ७-५-२०२० रोजी.

अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात.) हे (– )एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी वापरतात. उदा० सुमेध आज एक चित्र काढणार होता. पण –– ?

शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ०.

जुन्या काळी संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कॊल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, अप्पासाहेबसाठी अप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.

'किंवा' या शब्दाऐवजी (/) (तिरपा डॅश) वापरतात. उदा० प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.

विराम चिन्हांखेरीज छापलेल्या मजकुरात काही 'छपाई' चिन्हे आढळतात; त्यांपैकी काही चिन्हे ही :

'एकेरी खंजीर' नावाचे चिन्ह (†) मजकुरातल्या एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण जेव्हा पानाच्या तळाशी देतात, तेव्हा त्या शब्दालागून वापरतात. याच कारणासाठी दुहेरी खंजीर (‡), तारा (*), (¶ - पिलक्रो=परिच्छेद चिन्ह) यांचाही उपयोग करतात.

वगैरे, वगैरे.

No comments:

Post a Comment