Tuesday, 1 December 2020

नाट्यछटा : ऑनलाईन शिक्षण

कसली मजा आणि कसलं काय ?
घरात बसून कंटाळा आलाय नुसता 
क्रिकेट नाही भोवरा नाही लगोरी नाही की लपाछपी नाही 
साध्या गोट्यांनीसुद्धा खेळता येत नाही 
म्हणे घरात बसून पत्ते खेळा, बुद्धीबळ खेळा 
आणखी किती दिवस चालणार हे असं 
कुणास ठाऊक ?
आँ, आई आली वाटतं 
आता तिची नुसती कटकट 
हे करू नको, ते करू नको
असंच कर, तसंच कर
वैताग आहे नुसता
आलीच हाक 
आलो आलो गं आई 
..... ..... 
काय नाही गं 
अभ्यासाची पुस्तकं शोधत होतो 
म्हणजे माझं दप्तर शोधत होतो 
परवा शनिवारी सफाई करताना
तायडीनं कुठं ठेवलंय 
कुणास ठाऊक ?
ये तायडे माझं दप्तर कुठे आहे ?
... ...
काय ठेवलं असेल तिथं 
अगं, तिथं नाही 
म्हणून तर विचारतोय तुला.
चल लवकर शोधून दे 
आठ वाजले 
बापरे आज सोमवार गणिताचा तास.
ऑनलाईन तासाची वेळ झाली 
आणि हो तायडे 
तुझा मोबाईल 
पण दे मला तासभर
... ...
वा रे वा 
म्हणे माझा फोन आहे 
कोणाला देणार नाही 
तो काय तुझ्या एकटीसाठी आणलाय ?
बाबांनी काय सांगितलंय
"ज्याचा तास असेल त्यांनी घ्या" 
समजतंय ना तुला ?
अगोदर मोबाईल दे मला.
... ...
काय म्हणालीस 'मुळीच नाही'
'ए आई  ही तायडी 
मोबाईल पण देत नाही बघ.
... ...
हं आता कशी वठणीवर आलीस 
चला तासाला जॉईन होऊ या.
गेली रेंज 
आणि असली तरी 
सरांचं एक वाक्य ऐकू येतं दुसऱ्या गायब 
कसा होणार अभ्यास 
आता काय करायचं
... ... 
वाय फाय ?
ते आणि कुठे शोधायला जाऊ ?
... ...
आपल्या गच्चीवर 
तू तिथेच बसतेस का ?
... ...
थँक्यू तायडे,
अरेरे पण काय तायडे 
चार्जिंग सगळं संपवलंस
लाईटही नाही 
तुला कळत कसं नाही 
युट्युब वर कार्टून बघत बसली असशील ना 
मग कसं उरणार चार्जिंग !
आई पाॅवर बँक कुठाय गं ?
... ...
कुठं ?
बाबांच्या टेबलवर 
ठीक आहे घेतो 
हा, पण तास संपल्याबरोबर
म्हणजे पावणे नऊ वाजता 
मला नाश्ता पाहिजे हाँ
... ... 
काय पावभाजी !
वाह रे वा !
मजाच आहे मग आज
काय घमघमीत 
वास सुटलाय मसाल्याचा
माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय.
पण पास आणि अभ्यास झाल्याशिवाय नाही मिळणार खायला 
आई म्हणजे एक नंबर खडूस 
असू दे 
नंतर तर मिळेल ना 
... ...
ए तायडे 
मला चिडवू नकोस 
तुझा तास लवकर असतो म्हणून

चला...
मोबाईल हवा मज 
मोबाइल हवा
अभ्यास करायला 
गेम खेळायला
पिक्चर बघायला 
रोज रोज नवा.
मोबाईल हवा मज 
मोबाइल हवा.
      *चंद्रकांत*

No comments:

Post a Comment