Monday, 14 December 2020

नका...

अगोदर मुलांना शिकवा सोजी, आटा, रवा आणि मैदा यातला फरक.

ती मुलं ओळखू देत मूग, मसूर, हरभरा, उडीद, मटकी आणि तूर कशी असते.

त्यांना समजून घेऊ द्या ताक, दही, लोणी, तूप, खवा, चीज, पनीर यातला भेद.

आले-सुंठ, हळकुंड-हळद, द्राक्षे-बेदाणे, खजूर-खारीक, नारळ-खोबरे, कांदा-लसूण धान्ये-डाळी-पीठ म्हणजे काय हेही कळू दे.

मुलांना कैरी-आंबा-आमरस, जिरा-बडीशेप-शहाजिरे, रातंबा-आमसूल-कोकम, तीळ-कारळे-कोरडा, हे ओळखायला शिकवा.

दाखवा त्यांना ज्वारी, बाजरी, भात, गहू, मका, ऊस, सोयाबीन, गवत यांची रोपटी आणि भेंडी, गवार, वांगे, टोमॅटो, मिरचीसह मेथी, पोकळा, पालक, शेपू, करडा, चुका, कोबी, फ्लाॅवर, चाकवत, मोहरी, कडीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा कसे ? कुठे ? केव्हा ?उगवतात-वाढतात-फुलतात-फळतात.

वरणा, पडवळ, दोडका, भोपळा, कारले, तोंडली यांच्या वेली आणि जंगलात वाढणारी पिंपळ, पळस, हुंबर, ऐन, सिसवाची झाडे बांधावरच्या बोरी-बाभळी, आंबा, रस्त्याकडेचा कडुनिंब, चिंच, वड, ओढ्याकाठची करंजी, जांबूळ पाहू दे ना!
फळा-फुलांनी लगडलेल्या झाडांच्या बागा, मंद वाऱ्यासोबत दरवळणारा त्यांचा सुगंध हुंगू देत मुक्तपणे. 

कळू दे त्यांना गाय-बैल-म्हैस, घोडा-गाढव-खेचर, शेळी-मेंढी यातला फरक.

दाखवा त्यांना धार कशी काढतात, शेताला पाणी कसे पाजतात, गूळ कसा रांधतात आणि पिकांची मळणी कशी करतात.

पडून-लोळून माती-चिखलात, पावसात भिजून, उकाड्याने शिजून शेतात राबताना घाम कसा निथळतो तेही अनुभवू दे.

शिकवा वडीलधाऱ्यांच्या सहवासात सौजन्याचा पाठ, मावशी-काका-काकी, मामा-मामी, आजी-आजोबांच्या कुशीत गुजगोष्टी, आई-बाप, बहीण-भावाबरोबर घरातील कामास लावू दे हातभार मित्रांच्यासोबत पाहू देत पाने-फुले, पशु-पक्ष्यांची चित्रे, वाचू देत चिऊ-काऊच्या गोष्टी, निदान करू दे खेळासह मस्ती.

हे सारं विसरून बछड्यांना कोडींग शिकवू पाहात आहात; मग ती समस्यांचा डोंगर बनणार नाहीत तर दुसरं काय ?

काळ्या, निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या हॅटची घाई कशाला !

कोडींगही शिकू देत, पण अगोदर डिकोडींग समजू दे आपल्या परिसरातले...
मनसोक्त हुंदडायला राखून ठेवा,
नका कोमेजू अथवा मारू त्यांचं बालपण...

                               *रमेश*

(डॉ अतुल अग्रवाल, बाल/शिशु रोग विशेषज्ञ यांच्या हिंदी कवितेचा मुक्तानुवाद)

No comments:

Post a Comment