Saturday, 13 March 2021

शोध भुताचा


भुताचं दर्शन झालं आणि ...
   दरवर्षी प्रमाणे ' शोध भूतांचा ' या उपक्रमांतर्गत आज *श्री नवनाथ हायस्कूल पोहाळेच्या* मुलांनी शिवाजी मराठा हायस्कूलच्या मुलांसोबत पोहाळे येथील स्मशानभूमीत शाळेतील ७० मुले सहभागी झाली. माणसाच्या भीतीतून आणि अज्ञानातून निर्माण झालेली भुताची भीती निघून जावी. मुलांनी प्रत्येक घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहावे. विचार करावा हा या उपक्रमामागील हेतू.
    माणसाच्या आयुष्यात भूत ही संकल्पना कशी आली याचे विवेचन *मिलींद यादव* यांनी केले. त्यानंतर सर्पमित्र *दिनकर चौगले* यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटना मुलांना खुलवून सांगीतल्या.  "आयुष्यात प्रत्येक गोष्टीला का ? विचारायला शिका.' असे त्यांनी यावेळी मुलांना आवाहन केले .
    यानंतर वेळ होती, जेवण करून  मध्यरात्री स्मशानात फिरून भूतांचा शोध घेण्याची. जेवण करून मुलं झोपी जाणार इतक्यात स्मशानाच्या दुसऱ्या बाजुच्या भिंतीमागून घंटीचा आवाज  ऐकायला येऊ लागला. मुलांच्या चेहऱ्यावर भीती जाणवू लागली. ''सर , तिथं भिंतीमागं कोणतरी दिसतय बघा." घाबऱ्या सुरात कोणीतरी भिंतीकडे बोट केले. तिथं सर्वजण पाहतोय तोवर दुसऱ्या उंच भिंतीवरून एक बाई चालत गेली. सर्वजण तिकडे जातोय तोवर स्मशानाच्या शेडमागील झाड जोरजोरात हलू लागले. आमच्यातल्या सुमित धाडसाने त्या भिंतीमागील झाडाकडे गेला व ' ये ... कोण रे तू ?' म्हणत त्या बाईच्या अंगावर धावून गेला खरा पण ती बाई फिरून भिंतीवरून डोळे मोठे करत अंगावर धावून आली तसा सर्व मुलांबरोबर सुमितही पळून गेला. सारी मुलं घाबरून गाडीत जाऊन बसली.
   काही क्षणातच सर्वांना समजले की समोर आलेलं भूत नसून अंगाभोवती साडी नेसलेला सुनिल पाटील हा पोहाळे गावातील तरूण आहे. पूर्वनियोजनानुसार तो साडी गुंडाळून आला होता. हे समजल्पावर सर्वांच्या जीवात जीव आला .
    यामुळे मुलं इतकंच शिकली की, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता आपण घाबरलो तर भुतासारख्या अंधश्रद्धा आपल्या मनात पक्क्या होत जातात .
     या उपक्रमासाठी अनेकांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment