Monday, 12 April 2021

माडगं पुराण

आमच्या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत एकेक अशा तुकड्या आहेत. शाळेत नवीन दाखल झालेल्या मुलांची ओळख व्हावी या हेतूने मी इयत्ता पाचवीसाठी हिंदी विषयाचे अध्यापन स्वीकारले आहे. जी मुले पाचवी सहावी सातवी प्राथमिक शाळेत असतात ती आठवीच्या वर्गात प्रवेश घेतात. याही वर्गातील नव्या मुलांची ओळख व्हावी म्हणून अधून मधून संधी मिळेल तेव्हा मी आठवीच्या वर्गात जात असतो. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी खूपच निरागस, भाबडे, प्रेमळ, धाडशी... तासावर जायला दोन मिनिटांचा उशीर झाला तर थेट ऑफिसमध्ये येऊन, हाताला धरून "चला, आमच्या वर्गावर तास आहे." म्हणायला कचरत नाहीत. आठवणीतले मात्र थोडे शिष्ट बनलेले असतात तो त्यांच्या वयाचा परिणाम मुली तर अधिकच लाजऱ्याबुजऱ्या. त्यामुळे आठवीच्या वर्गात अभ्यासाशिवाय अवांतर गप्पा कमी होतात हीच मुलं मुंबईत आल्यावर थोडे अधिक जवळ येतात दहावीचे दादा लोक अभ्यासात मग्न असतात तिथं अवांतर विषय घेता येत नाहीत त्यामुळे नववीचा वर्ग गप्पांसाठी योग्य आणि सुरक्षित वाटतो. 
इयत्ता नववीच्या वर्गात एकदा सहज चर्चा करत असताना माडग्याचा विषय निघाला. माडगं ही काय भानगड आहे हे कोणाच्याही लक्षात येईना त्यांच्या चेहऱ्यावरून तसं जाणवलं; तेव्हा मी अधिक चौकशी करत विचारलं पन्नासपैकी एकाही मुलानं किंवा मुलीनं आपल्याला माडग्याची माहिती आहे असं म्हटलं नाही. तसा तो गुगलच्या बापालाही माहित नाही कारण माडगं हे अस्सल मराठी आणि काही दशकांपूर्वीच मिष्ठान्न आहे; त्यामुळेच मी माडगं असं व्हॉईस टायपिंग करत असताना मारगं लिहिलं जातंय. म्हणजे सर्व या विषयापासून अनभिज्ञ. चला मग ठरलं या आठवड्यात माडगं करायचं. 
माडगं म्हणजे काय? ते कसं करतात? याची सविस्तर माहिती मी त्यांना तोंडी सांगितली. मुलांनी लगेच आपापसात विभागणी करून माडग्याचा बेत आखला तसा तो शनिवारीच नियोजित होता परंतु विकेंडमुळे एक दिवस पुढे ढकलला आणि सोमवारी माडगं करायचं असं निश्चित झालं.
शुक्रवारी काही मुलांनी तुर काय मुलाने उडीद थोड्या मुलांनी गुळ असे पदार्थ आणले जमतम चारशे ग्रॅम धान्य जमले पण पन्नास विद्यार्थ्यांना माडगं करायचं तर किमान एक किलो धान्य हवं पण काही इलाज नव्हता आज-काल ग्रामीण भागात सुद्धा शेतकऱ्यांच्या घरी तूर किंवा उडीद ही कडधान्ये मिळणे दुरापास्त झाले आहे. मग शहरात बाजारला जाणाऱ्या एका मित्राला अर्धा किलो उडीद आणायला सांगितले ते तो घेऊन आला आईने मुलांचे जमलेले कडधान्य आणि बाजारातून आणलेले उडीद नीट करुन भाजून घेतले. हे पदार्थ भाजतानाच खमंग वास सुटला आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले. त्यानंतर खरंतर हे कडधान्य जात्यावर दळायला हवं होतं पण नव्या बंगल्यात जात्याला थारा नाही आणि सूनबाईंनी सुुुुुुचविलेला  मिक्सरवर मला पीठ करायचं नव्हतं मध्यम मार्ग म्हणून घरगुती चक्की चा आधार घेतला आणि कालच त्याचं पीठ तयार करून आणलं.
आज सकाळी शाळेत पोहोचल्या बरोबर भेटलेल्या नववीच्या मुलांनी "माडगं-माडगं" असा कल्ला केला. मी सोबत नेलं तुर आणि उडदाचं पीठ तसेच तांदूळ दाखवले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.
काही मुलांना घेऊन साडेआठ वाजता शाळेच्या किचनशेडमध्ये पोहोचलो. अशोक (शिपाई)च्या मदतीने पातेल गॅसवर ठेवून त्यात अंदाजे साठेक प्लेट होतील एवढं पाणी उकळायला ठेवलं पाण्यात अर्धा किलो तांदूळ शिजायला टाकले. तोवर मुलांनी आणलेला गूळ किसून बारीक केला सात एक मिनिटांत तांदूळ टाकलेलं पाणी चांगलंच उकळलं. तांदुळांचे पोट फुटेपर्यंत पाणी उकळू दिलं. पातेल्यातलं थोडंसं पाणी तूर व उडिदाच्या पिठात ओतून ते पीठ सरबरीत करून घेतलं. 

गॅसवरच्या पातेल्यातलं तांदळाचं आदण हलवत हलवत हळूहळू पाण्यात कालवलेलं पीठ ओतत राहिलो. संपूर्ण पीठ त्या आदणाशी एकजीव होऊन गेलं. त्यानंतर बारीक केलेला गूळ गॅसवरच्या  पातेल्यात टाकला. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत पुन्हा एक उकळी आणली तेव्हा खूपच खमंग वास दरवळत होता. किचनपासून अगदी नववीच्या आणि दहावीच्या वर्गापर्यंत तो पोहोचला होता. पातेले गॅसवरून खाली उतरले थोडावेळ थंड होऊ दिले साडेनऊ ची छोटी सुट्टी झाली. यावेळी दोन-तीन मुलांच्या मदतीने लेटा व ते माडग्याचं पातेलं नववीच्या वर्गात नेलं. सर्वांना प्लेट मधून मााडगं दिलं. या नव्या पदार्थावर मुलांनी यथेच्च ताव मारला. 

No comments:

Post a Comment