Sunday, 23 May 2021

बाळाच्या प्रतिक्रिया आणि संरक्षणात्मक हालचाली

नमस्कार,
गर्भ : वय २७ आठवडे.
बाळाच्या प्रतिक्रिया आणि संरक्षणात्मक हालचाली
आपले बाळ आता २७ आठवड्यांचे झाले आहे. त्याची लांबी साधारण साडे दहा इंच (२६ सेमी) आणि वजन सुमारे सव्वा किलो आहे.
बाळाचा मुख्य भर आता वजन वाढीवर आहे. शरीराच्या वजना बरोबर इतर अवयव व मुख्यतः मेंदू देखील वाढत आहे.
बाळाला आता फारशा कसरती करता येतील एवढी जागा उरलेली नाही, तरी अद्याप ते, हात पाय ताणणे, लाथा मारणे, नाळे बरोबर खेळणे, या गोष्टी करीतच आहे.
शरीर आता प्रमाणबद्ध दिसू लागले आहे. मेंदूचे आकारमान वाढतेच आहे, पण त्याच बरोबर, मेंदूला 'वळ्या' पडू या लागल्या आहेत. या वळ्या जेवढ्या अधिक तेवढा मेंदूच्या 'कॉर्टेक्स' (cerebral cortex) या भागाच्या पृष्ठभागाचे क्षेत्र (surface area) अधिक मोठे होते.
अर्थात, 'न्यूरॉन्स' च्या 'जोडण्या' Neural connections) वाढत राहतात.
बाळाला आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही संवेदना व्यवस्थित जाणवू लागल्या आहेत व त्याला ते प्रतिसाद देऊ लागले आहे.
हे पंच ज्ञानेंद्रीयांचे अनुभव जेवढे व जसे असतील तेवढ्या व तशा प्रकारच्या न्यूरॉन्सच्या जोडण्या (Neural circuits / assembly)  तयार होत असतात.

प्रतिक्रिया आणि संरक्षणात्मक हालचाली
Reactive and Defensive motions

बाळ एखाद्या 'निर्जीव पेटी'मध्ये वाढत नसते, तर ते आईच्या शरीरामध्ये वाढते. वातावरणामध्ये होणारी 'प्रक्षुब्धता', अनुकूल वा प्रतिकूल बदल, हे किती मोठ्या प्रमाणात, आणि किती सहजपणे, बाळाच्या 'अनुभव क्षेत्रात' उलथापालथ करू शकतात, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
वातावरणातील बदलांना गर्भाशयस्थ बाळ हे माते इतकेच, किंबहुना मातेपेक्षा अधिकच संवेदनशील असते.

यासंदर्भात काही अविश्वसनीय अशी उदाहरणे मी आता सांगणार आहे.

●  एका मनोरुग्ण पतीने, आपल्या गर्भवती पत्नीचा, तिला मारण्यासाठी पाठलाग केला होता. त्या प्रसंगानंतर, अभ्यासकांनी बाळाच्या हालचाली व त्याच्या ह्रदयाची गती यांची जी निरीक्षणे नोंदवली, त्यावरून असे आढळले की, माता व गर्भाशयस्थ बाळ, दोघेही बराच काळपर्यंत 'अस्वस्थ' व क्षुब्ध मनस्थितीत होते. त्यानंतर या उदाहरणाशी साधर्म्य असणाऱ्या, बऱ्याच घटनांच्या अभ्यासामधून, अगदी अशाच प्रकारचे निष्कर्ष काढले गेले.

● क्वचितच आढळेल अशा एका दुर्मिळ उदाहरणात, एका चार महिन्यांच्या गर्भिणीला, इस्त्री करत असताना, विजेचा झटका बसला (जवळजवळ दोनशे वीस व्होल्टस्) त्यानंतरच्या  सोनोग्राफीवरील निरीक्षणात आढळले की, गर्भाशयातले बाळ, गर्भाशयात काहीही हालचाल न करता, 'बसलेल्या अवस्थेत', पुढचे तब्बल ४८ तास स्तब्ध, निश्चल राहिले होते. कोणत्याही प्रकारच्या भौतिक, शारीरिक, किंवा यांत्रिक उत्तेजनांना ते प्रतिसाद देत नव्हते, आणि या संपूर्ण  काळात, त्याच्या हृदयाचे ठोके, अतिशय जलद वेगाने चालू होते. शेवटी तिसऱ्या दिवशी ते बाळ हळूहळू आपल्या मूळ स्थितीत येऊ लागले व हालचाली करू लागले.

● इटलीच्या याच अभ्यासकांनी, १९८० मध्ये भूकंपामुळे 'भीतीग्रस्त' (Panic) झालेल्या २८ गर्भिणींचा अभ्यास केला. त्यांच्यापैकी एकाही गर्भिणी ला कोणतीही 'शारीरिक' इजा झाली नव्हती. परंतु सर्वच्या सर्व मातांची गर्भाशयातली बाळे, पुढचे जवळजवळ 'आठ तास' पर्यंत, कमालीची 'क्रियाशील व अस्वस्थ' होती. त्यापैकी बरीच बाळे, पुढचे दोन ते तीन दिवस, एकदम माघार घेतल्याप्रमाणे, अगदी विरुद्ध स्थितीत, म्हणजे, हालचाल न करता, स्वस्थ, स्तब्ध, निपचीत पडून होती असे आढळले. मातांना वाटलेली 'भीती व मानसिक धक्का' यांचा परिणाम मातांपेक्षा पोटातल्या बाळांवर खूप जास्त झाला होता, व तो कितीतरी अधिक काळपर्यंत टिकून राहिला होता.

● यापुढचे उदाहरण, पेशंट आणि काही डॉक्टरांना देखील सावध करणारे असे आहे.

यामध्ये सोळा गर्भिणींचा अभ्यास केला गेला. त्यांच्या,अगदी क्षुल्लक अशा, काही ना काही छोट्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना जेव्हा वेलीयम (Valium, = Diazepam..डायझेपाम) नावाचे झोपेचे औषध दिले गेले, तेव्हा त्यांच्या बाळा वर झालेला परिणाम अत्यंत अनपेक्षित, आश्चर्यकारक, आणि भीतीदायक होता.

पाच मातांच्या बालकांनी औषध दिल्यापासून तीन मिनिटात, हालचाल करायची बंद केली. आणि पुढचा अर्धा तास ते तीन तास एवढा काळ ती बाळे तशा निश्चल अवस्थेत, अत्यंत स्तब्ध, हाालचाल न करता राहिली होती. तर उरलेल्या अकरा बाळांना, चक्क आकडी (Convulsions) आलेली दिसून आली. ही आकडी काही मिनिटांपासून, एक तासापेक्षा अधिक काळ टिकून होती.
हे त्वरित दिसणारे परिणाम होते. मेंदूवर होणारे, व कालांतराने लक्षात येणारे, असे किती आणि काय परिणाम असू शकतील याची कल्पनाच केलेली बरी !
छोट्या छोट्या तक्रारींसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या, औषधे खाणे, हे, बाळाचे भवितव्य किती प्रमाणात बिघडवू शकते याचा यावरून साधारण अंदाज येऊ शकतो.
गर्भिणी माता जेव्हा औषध उपचार घेते किंवा छोट्या किंवा मोठ्या ऑपरेशनला तोंड देते तेव्हा तिच्या पोटातले मुलही त्या परिस्थितीला तोंड देत असते आणि त्यामुळे त्याला, पुढे भविष्यात किती 'अनिष्ट' व 'अनपेक्षित' परिणामांना तोंड द्यावे लागू शकेल हे सांगणे खरोखर अवघड आहे.
गर्भावस्थेत घेतली गेलेली अशी अनेक औषधे, तंबाखु, अल्कोहोल (दारु) इत्यादीमुळे, पोटातील बालकांना, भविष्यात, 'शारीरिक' किंवा /आणि 'मानसिक' दृष्ट्या, 'अधू' बनवतात असे सिद्ध करणारी कितीतरी संशोधनात्मक निरीक्षणे जगभरात अनेक ठिकाणी केली गेली आहेत.

या सगळ्या नकारात्मक गोष्टी ऐकल्यावर, आयुर्वेदीय पद्धतीचा आहार विहार आणि औषधे यांचा सकारात्मक परिणाम कसा होत असावा याची साधारण कल्पना आपण करू शकतो.
दुर्दैवाने या बाबतीत आधुनिक पद्धतीचे संशोधन (Modern research methodology) फारसे झाले नसल्याने, हा भाग दुर्लक्षित राहिला आहे. पण जे काही थोडेफार संशोधन झाले आहे त्याविषयी पुढील लेखांमधून शक्य तेवढी माहिती देणारच आहे. आणि आमच्या स्वतःच्या अनुभवावरून आयुर्वेदिक औषधे आहार-विहारात्मक गर्भिणी परिचर्या, प्राणायाम,आसने, ध्यान, ओंकार,संगीत, मंंत्र, यांच्या बाळाला होणाऱ्या फायद्याविषयी आमच्या मनात मात्र तिळमात्रही शंका नाही असे स्वानुभवामुळे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो. 

(क्रमशः..)

ही लेखमाला आपल्याला आवडत असेल तर कृपया Like करा, आपल्या मित्र-मैत्रीणींना, व ज्यांना याचा उपयोग किंवा गरज असेल, किंवा यात रस / कुतूहल असेल अशांना जरूर share करा, आवर्जून प्रतिक्रिया द्या आणि पेजवर 'Reviews' मध्ये comment नक्की करा.
धन्यवाद

डॉ विनायक लेले
MD (ayu)
स्त्रीरोग- प्रसूतीतज्ञ 

https://www.facebook.com/drleleprenatal

No comments:

Post a Comment