Tuesday, 25 May 2021

एके दिवशी

एके दिवशी
तोही जन्मला होता
ट्याऽऽऽ करत
कुणी म्हटलं तो 'कोऽऽऽहं'
म्हणत होता
तर कुणी 'सोऽऽऽहं'
असाही मंत्र
त्यांच्या कानात फुंकला
याने तरीही आयुष्यभर 
विड्या फुंकताना
काडी नाही चावली
गणपत वाण्यासारखी
त्याला कुणीही 
नाही म्हटलं
सॅलोमन ग्रँडी
जरी त्याच्यावर 
सोम, मंगळ... रवि
याच क्रमाने 
संस्कार झाले
एक दिवस
तो जाईल 
चारचौघांसारखाच
"तिरडीवर माझ्या मुठी
उघड्या ठेवा" म्हणायला
तो थोडाच नेपोलियन आहे!
हारच नशिबी घेऊन
तो जन्मला असावा
असे म्हणायला
मुळी वावच नाही.
कारण खूप सराईतपणे
तो चाला-बोलायला...
हसा-खिदळायला
शिकला होता
जन्मानंतर...
मात्र या भूतलावर
त्याचा हात
प्रेमाने हाती घेणारा
'हम तुम्हारे साथ है।'
म्हणणारा
पाठीवर शाबासकीची
थाप देणारा
वेळीच कान पिळणारा
तुमच्यासारखा
एखादा मित्र 
त्याला होता की नाही
हे मला
मुळीच माहीत नाही

_______*रमेश*

2 comments: