. *परिपूर्ण इतिहास*
इतिहास बगळ्यांचा असतो
गरुडांचा असतो
बदकांचा असतो तसा
राघू, मैना, चिमण्या
आणि कावळ्यांचाही असतो
संघर्ष करावाच लागतो जीवनात
जगण्यासाठी, अस्तित्वासाठी
सुख-दु:ख, आनंद-भीती,
शौर्य-डरफोकपणाचा मक्ता
नसतोच कुणा एकट्याच्या
भाळी लिहिलेला
मात्र जे लिहितात
त्यांचा उजागर होतो
बाकी कालौघात लुप्त होतो
आकाशात निर्माण झालेले
ढग विरावेत तसा
काही घटना-संदर्भ
झाकोळून जातात.
काही दुर्लक्षिले जातात
जाणूनबुजून
अशा अव्यक्त इतिहासाचे साक्षीदारही
लपवितात काही थोडा
असती कला त्यांच्याही हातात
तर शत्रूच्या छाताडावर
विराजमान होऊन
नरडीचा घोट घेणारी शिल्पेही
बघितली असती पुढच्या
कित्येक नवनव्या पिढ्यांनी
या सर्व नोंदी तटस्थतेने होतील
ज्या बखरींत
त्या नक्कीच प्रमाण असतील
परिपूर्ण इतिहासाच्या
---------------- *रमेश*
खूप छान शब्द रचना आणि कवीच्या भावना समजल्या, वंचिताचा,दुर्लक्षितांचा,दुबळ्या शोषित घटकांचा आणि पराभूतांचा सुद्धा इतिहास लिहिला पाहीजे तो समाजासमोर आणला पाहिजे...समाजाने सुध्दा इतिहास हा व्यापक ,चौफेर असतो हे समजून घेतल पाहिजे ...
ReplyDeleteवंचितांचा इतिहास,मक्ता नसतोच कुणाचा इतिहासात.. इतिहासाची समर्पक मांडणी कवितेतून.ऊ
Delete