Sunday, 27 June 2021

विरामचिन्हे-2

_*विरामचिन्हे*_
         वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.
         भाषाभाषांत थोड्याफार फरकाने नियम सारखेच असतात. संस्कृत भाषा देवनागरी लिपीत लिहिताना केवळ दंड (।) या व्याकरण चिन्हाचा वापर केला जाई. मोडी लिपीत ऱ्हस्व-दीर्घ नसायचे तशी व्याकरण चिन्हेही नसायची.
         मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थाॅमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विराम चिन्हे ही अक्षराला चिकटून येतात; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर एक जागा सोडूनच पुढचा शब्द (असल्यास) लिहितात.
         बोलली जाणारी कोणतीच भाषा अशुद्ध नसते. भाषा लेखनाला मात्र काही वैश्विक परिमाणे असतात. थोड्याशा सजगतेने वाचन केले तर ती लक्षात येतात. नियम पाठच करायला हवेत असे नाही.
         आपण जेव्हा बोलतो त्यावेळी आपले बोलणे ऐकणाऱ्याला अचूकपणे कळते. ते लिहिताना मात्र प्रमाणलेखनात असावे. कारण वाचणारा दुनियेच्या कुठल्याशा कोपऱ्यात असतो हे आपल्याला माहीत असतेच असे नाही. शिवाय प्रमाणलेखन भाषेचे/लिपीचे सौंदर्य वाढवत असते. वाचताना थांबायचे कुठे, किती वेळ आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा उपयोग होतो. वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळवाव्यात यासाठीही ते आवश्यक वाटते.

       

No comments:

Post a Comment