. *झाडे*
----------------------------------
वाटेत भेटलेल्या झाडांच्या
फुलांमागील कोष
तो निरखायचा
रंगांवरून त्याला
कधीच कळले नाही
कशी असतील
फुलांनंतर बहरलेली फळं
'झाडांना तर वाचाच नसते'
हा त्याचा विचार खोटा होता
कारण झाडांची भाषा त्याला
समजत नव्हती.
त्यांनं हुंगून पाहिली फुलं
'सुवासिक फुलांच्या पोटी
नसतात रसाळ फळं'
हाही समज अर्धसत्य मांडणारा
'आकार फुलांचा देत असेल
फळांना जन्म'
या तर्कातून बाहेर पडायला
कित्येक दिवस लागले
अखेर झाडांकडूनच त्याला कळलं
सगळीच झाडं देत नाहीत
रसाळ, मधुर फळं
किंवा सुगंधित फुलं
काही हिरवीकंच पानं देतात,
सावली देतात,
बहुतेक सर्व हिरवी झाडं
निदान प्राणवायू देतातच
अंगाखांद्यावर
खोडांवर काहींच्या
पोसले जातात परजीवी आर्किड
काहींच्या वठलेल्या फांद्यांवर अल्पकालीन, मोसमी शेवाळ
काही करतात आपल्या देहाचं प्रत्यार्पण इमारत-सामान-अवजारांसाठी
आणि टाकाऊ म्हणून
लोक ज्यांना हिणवतात
चिरनिद्रा घेतल्यानंतर
अखेरच्या विश्रांतीसाठी
तीच शय्या बनून राहतात
आयुष्य नाही लागलं सार्थकी
ही खंत राहू नये मनात म्हणून
हे त्याला उमगलं तेव्हा
फाऽऽऽर... उशीर झाला होता.
© *रमेश*
No comments:
Post a Comment