Sunday, 17 October 2021

गाढव मुख्याध्यापक, गाढव शिक्षक

।।जय गुगल ट्रान्सलेटर।।
या लेखाचे शीर्षक वाचून थोडे अचंबित व्हाल पण गेल्या महिन्यात घडलेली सत्य घटना.
        शासनाच्यावतीने विविध प्रशिक्षणे आणि माहितीचे संकलन होत असते. अगदी सोपा जवळचा व कमी वेळेत पूर्तता होणारे माध्यम म्हणून गुगल फॉर्मची निवड केली जाते. विशेषता शिक्षण विभागात अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आणि माहिती संकलनाचे फॉर्म दररोज येत असतात. अशा फॉर्मची पूर्तता करणे ही कार्यालय प्रमुखाची जबाबदारी असते. 
       एके दिवशी दुपारी तालुक्याच्या ग्रुपवर एका मुख्याध्यापकांनी एक लिंक शेअर केली व फॉर्म भरून घेण्यास सांगितले. तीच लिंक केंद्रप्रमुखांनी त्याच ग्रुपवर टाकली व लिंक लवकरात लवकर भरायला सांगितले. थोड्या वेळाने त्या तालुक्याचे प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी यांनी ती लिंक टाकून मुख्याध्यापकांनी शिक्षकांची माहिती भरावी असे आवाहन केले.
         आणखी काही वेळाने तालुक्याचे मा. उपशिक्षणाधिकारी यांनी तीच लिंक ग्रुप वर टाकली व माहिती शक्य तितक्या तात्काळ, इंग्रजीमध्ये भरावी असे आवाहन केले.  (असे बऱ्याचदा होते, कारण पाठविलेल्या पोस्ट PDF स्वरूपात असतात. त्या डाऊनलोड व ओपन केल्याशिवाय वाचता येत नाहीत. तेवढे तसदी न घेता वरून आले ते पुढे ढकलण्याचा सपाटा लावल्यामुळे, एकच पोस्ट तीन-चार वेळा ग्रुपवर पडून कचरा साठत असतो. तरी बरे फक्त पदाधिकारी व अधिकारी यांनाच एडमिन करून *"मेसेज सेंड ओनली ॲडमिन"* पर्याय निवडला आहे नाहीतर एकच पोस्ट पन्नास वेळा पडली तरी चकित व्हायला नको. पुढे ढकलण्याचा स्पर्धेत कोण पहिला येतो या अहमहमिकेतून असे घडत जाते. हा कचरा टाळण्यासाठी प्रथम आलेल्या पोस्ट बघून नंतर पोस्ट पाठवायला पाहिजेत.)
           लिंकमधली माहिती महत्वाची व लवकरात लवकर उपलब्ध करावयाची होती त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांनीही तात्काळ ही लिंक ओपन करून शिक्षकांची माहिती भरून फॉर्म सबमिट करावा असा मेसेज ग्रुप वर आला.
त्या वेळी मी एका प्रशिक्षणात असल्यामुळे ग्रुपवरील मेसेज पाहिले नव्हते. पाच वाजता प्रशिक्षण संपल्याबरोबर शाळेच्या लिपिकाचा फोन आला, 'सर तालुका लिंकवर एक फॉर्मची लिंक आली आहे. ती लवकरात लवकर भरावयाची आहे. शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने शिक्षकांना दिलेल्या कोविड प्रतिबंधक लसीची माहिती विचारली आहे. शिक्षकांची ही माहिती त्यामध्ये द्यायची आहे आणि फॉर्म इंग्रजीमध्ये भरायचा आहे.'
 शक्य तितक्या लवकर फॉर्म भरून सबमिट करावयाचा आहे.'
          मी लागलीच लिंकवरून फॉर्म ओपन केला शाळेचा यु डायस नंबर टाकला दरम्यान इंग्रजीमध्ये जनरेट केलेला हा फॉर्म मराठी भाषेत ओपन झाला अत्यावश्यक माहिती भरल्यानंतर पुढील पर्याय शिक्षकाचे नाव असा होता आणि त्यानंतर पद या प्रश्नाच्या उत्तरासाठी आलेले पर्याय
मुख्याध्यापक 
गाढव.मुख्याध्यापक 
शिक्षक 
गाढव.शिक्षक असे होते.
मला या पर्यायांचे काही आकलन होईना म्हणून फॉर्मचा स्क्रीन शॉट घेऊन तो जिल्हा मुख्याध्यापक संघाचे तालुका प्रतिनिधी, तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आणि तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक ग्रुपवर पाठवला व "हा काय प्रकार आहे?" असे विचारले. तेव्हा बराच वेळ कोणी उत्तर दिले नाही. अर्ध्या एक तासानंतर दोन-तीन अधिकाऱ्यांचे फोन आले. "हा फॉर्म कोठे आहे? कशाचा आहे?" वगैरे वगैरे मी त्या फॉर्मचा संदर्भ देताच, तो फॉर्म जिल्ह्यातील एका संस्थेकडून जनरेट झाल्याचे समजले पण "तो फॉर्म इंग्रजीमध्ये जनरेट केला आहे व इंग्रजीमध्येच भरायचा आहे." असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मला मात्र *गाढव.मुख्याध्यापक, गाढव.शिक्षक* हे कोडे उलगडत नव्हते काही वेळाने तालुक्यातील अधिकाऱ्यांचा फोन आला, "सर, तुम्हाला हा फॉर्म कोठे मिळाला? कोठे ओपन झाला? कोणी पाठवला? कसा ओपन झाला? सुरुवातीला आमच्याकडे टाकायचा!" परंतु हे घडले कसे कोणाच्याही लक्षात आले नव्हते आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते; तेव्हा मी पुन्हा त्याच लिंकवरून फॉर्म ओपन केला मात्र तेव्हा इंग्रजी भाषा निवडली. फार्म ओपन झाल्यानंतर प्रश्नावली बघत असताना असे लक्षात आले, की ज्यांनी फॉर्म डेव्हलप केला आहे त्यांनी 
मुख्याध्यापक,
सहायक मुख्याध्यापक
शिक्षक व 
सहायक शिक्षकांसाठी
अनुक्रमे
Headmaster
Ass.Headmaster
Headmaster
Ass.Teacher
असे पर्याय दिले आहेत. पर्यायांचे मराठी भाषांतर करताना गुगल ट्रान्सलेटर बाबांनी Ass चे गाढव करून दिले होते. वास्तविक सहायकाचा शॉर्टफॉर्म Asst. देण्याऐवजी चुकून Ass पडला व गुगल बाबानी Ass चा गाढव करून आमच्या पुढे टाकला.
इतिहासात ध चा मा झाल्याने, धरुन आणावे ऐवजी मारून आणाले हे माहीत होते. आता Ass चे मराठी ट्रान्सलेशन गाढव केले यात गुगलबाबाची तरी काय चूक?

No comments:

Post a Comment