Monday, 1 November 2021

आकाशकंदील

.   *आकाशकंदील*

विद्यार्थी
हे बिरूद
अभिमानाने
लावण्याइतका
शहाणपणा मेंदूत
शिल्लक राहत नाही
तेव्हा...

तरुणाई
नागवी होऊन 
ढुंगणाचं सोडून
डोक्याला गुंडाळते 
तेव्हा ...

दूध
आईचं
ओठांवरलं
सुकण्या आधी
मोठे झालो समजून
बेधुंद, धडपडणारी जमात
रस्त्यावर उतरते तेव्हा...

रांग
आणि
अवहेलना
तशी उपेक्षा
जन्माआधीच
ज्यांच्या नशिबी
लिहिली जाते त्या
कळ्यांचे नि:श्वास ऐकू
येतात तेव्हा ...

कापड
फाटलेल्या
वा उसवल्या
ठिकाणचं अंग
झाकण्यासाठी दोन
टाके घालण्याऐवजी
नवे कपडे, नको त्या
जागी मुद्दाम फाडून
अथवा शिवताना
'तश्शीच फॅशन
आहे' म्हणत
घर नि रस्ते
झाडण्याचं
कंत्राट
घेतात
तेव्हा...

आयुष्य
जिच्या वेदनांनी
सुसह्य होत जातं
त्या सहचारिणीला
गुलाम समजात तेव्हा ...

चांदीसारखे
चमकते केस
मिरवणारे माय-बाप 
आणि आजी-आजोबां 
यांची काठी होण्याऐवजी
त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात
तेव्हा ...

काही लिहावंसं वाटणं
हा गुन्हाच तर
नाही ना!

*© रमेश*

1 comment: