Monday, 10 January 2022

गृहीत धरलं जातं.

शाळा सुटली. घरी चाललो. सध्या रस्त्याचे बाजूपट्टी भरणी व डांबरीकरणाचे काम चालू होते. त्यामुळे एका बाजूला रस्ता उकरलेला होता, तर दुसर्‍या बाजूला बाजूपट्टीची भर करण्यासाठी मुरुमाचे ढीग टाकले होते. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. वेळ सायंकाळची असल्याने थोडी-फार गर्दी होती. एकेरी वाहतूक झालेल्या रस्त्याच्या एका टोकावरून आलेला एक सायकलस्वार काही क्षणांत रस्ता पार करणार इतक्यात समोरून एक कार आली. त्या कारमध्ये चांगले उच्चशिक्षित तरुण जोडपे होते.
त्या अरुंद रस्त्यावर सायकल थांबली आणि कारही थांबली. कार मधील त्या तरुणाने सायकलस्वारास सायकल खाली घेण्यासाठी नजरेने इशारा केला. तो प्रौढ सायकलस्वार नाही म्हणाला, अडून राहिला. समोर सायकलस्वार काही क्षणांत रस्ता पार करतोय हे दिसत असूनही आपल्यासाठी त्याने सायकलवरून उतरून, खडी पसरलेल्या रस्त्यावरून चालत जाऊन रस्ता पार करावा व आपल्याला रस्ता खुला करून द्यावा अशी त्या तरुणाची अपेक्षा.
त्या सायकलस्वाराने रस्त्यावरुन खाली उतरायला नकार दिल्यामुळे त्या तरुण कारवाल्याच्या अंगाचा तिळपापड झालाा. तेव्हा सायकलस्वार म्हणाला, "बाबा रे, माझ्या समोरून भरलेली उसाची बैलगाडी जात असती तर मी नक्कीच त्या बैलगाडीला वाट दिली असती. एखादा मनुष्य चालत निघाला असता तरीही मी वाट दिली असती. परंतु तुम्ही कारवाले आपल्यासमोरील पायी चालणारे, सायकलस्वार, मोटरसायकलवाले यांनी आपल्याला रस्ता द्यावा असे गृहीतच धरता म्हणून मी रस्त्यावरुन खाली उतरणार नाही."
त्या सायकलस्वाराचा हा सत्याग्रही अवतार बघून शेवटी काहीतरी पुटपुटत तो कारवाला तरुण रस्त्यावरुन खाली उतरला आणि पुढे गेला.
वास्तविक सायकलस्वाराने पायी चालत जाणार्‍याचा, मोटरसायकलवाल्याने सायकलस्वाराचा, कारवाल्याने मोटरसायकलचा प्रथम रस्ता पार करण्याचा हक्क स्वीकारला पाहिजे; पण असे होताना दिसत नाही. प्रत्येक वेळी छोट्या वाहनाला आणि माणसालाही तुच्छ लेखून गृहित धरले जाते. वादाचे प्रसंग उद्भवतात. लोक एकमेकांचे बाप काढतात. 
फक्त आपली गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाते. समोरच्या माणसाची अडचण दुर्लक्षित केली जाते.
जीवनाच्या वाटेवरही सामान्य माणसाला असेच गृहीत धरले जाते. आणि कुठे कशाला वाद करायचा? एका मिनिटांनी काय फरक पडणार आहे? असे समजून सामान्य माणूस माघार घेतो; नव्हे त्याला अशी माघार घ्यायची सवय जडते आणि सगळे त्याला त्याच्या हक्काच्या रस्त्यावरुन खाली उतरायला भाग पाडून, मागे टाकून पुढे निघून जातात. 

No comments:

Post a Comment